- प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा तसेच मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्याचा भाग बनूया. मराठीतून लेखन केले पाहिजे, मराठीतून वाचन केले पाहिजे, मराठी कार्यक्रमांना हजेरी लावली पाहिजे, आदी माध्यमांतून मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी केले पाहिजे.
“कम फास्ट, अरे कार्यक्रम चालू होतोय. चल… चल…”
“येतो येतो… टू मिनिट्स.” राकेश.
“आत्ता बाबांचा फोन होता, ते डॉक्टरकडे चाललेत.”
“बापरे काय झालं रे, ऑल वेल?” विनय.
“तसं टेन्शन घेण्याचे काही कारण नाही, रुटीन चेकअप.”
“मग ठीक आहे रे, आजकाल असले रोग वाढलेत. पैशाचे सोर्स कमी झालेत आणि खर्चाचे सोर्स वाढलेत. अर्धा पैसा तर डॉक्टरकडेच जातो.”
“एनीवेज, चल निघूया. नाहीतर तिथे पोहोचेपर्यंत कार्यक्रमाचा द एंड झाला असेल.”
“येस डियर, जरा ही बॅग पकड. मी सँडल घालतो.”
***
हा संवाद होता दोन मित्रांचा. हा वाचताना कुठे खटकलं का, मला सांगा.
हे वाचल्यावर परत एकदा वरचा संवाद वाचा. यातील प्रत्येक वाक्यात एकतरी इंग्रजी शब्द आहे. तो संवाद आपल्याला खटकत तर नाहीच; परंतु अतिशय नॉर्मल वाटतो. यामागचे कारणच हे आहे की, आपली आजची भाषा ही अशीच झाली आहे. प्रत्येक शब्दासाठी मराठी शब्द इथे वापरणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. कदाचित आपण मराठी शब्द वापरून हा संवाद लिहिलात, तर कदाचित तो अनैसर्गिक वाटेल. इथे मला अजिबात मराठी शब्दांना डावलून इंग्रजी शब्द वापरलेत याविषयी कौतुक नाही; परंतु आजच्या काळात असा संवाद हा सहजसंवाद वाटतो. असा संवाद जर कथा-कादंबऱ्यांमधून असेल, तर फारच थोड्या प्रमाणात मराठी वाचणारा तरुण वाचक या वाचनात टिकून राहील.
कधी कधी काही जागी मराठी शब्द शोधूनही सापडत नाहीत किंवा ते शब्द वापरलेला संवाद, सहजसंवाद असत नाहीत. इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात वाढली आणि जगभरातील माणसे मोठ्या प्रमाणात त्या भाषेत कामकाज करतात. ती त्यांची व्यवहाराची भाषा झालेली आहे. कारण त्यांनी जगभरातील अनेक भाषांमधील शब्दांना आपल्यात सामावून घेतलेले आहे. आपणही मराठी भाषेत इतर भाषांना जर सामावून घेतले, तर मराठी भाषा वाढीला लागेल, असे मला वाटते.
आज-काल वैद्यकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक या क्षेत्रामध्ये मराठीतून शिक्षण द्यावे, अशी मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागलेली आहे, ही अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. पण या मराठी भाषेत असलेल्या शिक्षणामध्ये जर काही इंग्रजी शब्द असतील किंवा आकडेमोड इंग्रजीत असेल, तर त्याला तसेच ठेवल्यास ते विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठीही सोयीचे होईल, असे मला वाटते.
मराठीसाठी मराठी माणसांनी नेमकेपणाने काय करावे? हा आजच्या काळातील गहण प्रश्न आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचा भाग बनूया. मराठी टिकवून ठेवण्यासाठी खरंच काहीतरी केलं पाहिजे. मराठीतून लेखन केले पाहिजे, मराठीतून वाचन केले पाहिजे, मराठी कार्यक्रमांना हजेरी लावली पाहिजे, मराठी कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन आपला सहभाग नोंदवला पाहिजे, मराठी साहित्यिक संस्थांची वर्गणी भरली पाहिजे, मराठी साहित्यिक संस्थांच्या कार्यक्रमांना अधूनमधून देणगी दिली पाहिजे, मराठी पुस्तके विकत घेऊन वाचली पाहिजेत.
छोटे-छोटे गट करून मराठी साहित्याचे वाचन किंवा वाचलेल्या पुस्तकांची चर्चा घडवून आणली पाहिजे, मग तो एखादा अतिशय छोटासा घरगुती कार्यक्रम का असेना. कोरोना काळानंतर मराठी वर्तमानपत्र वाचणे कमी झाले आहे, तर परत एकदा एखादे तरी मराठी वर्तमानपत्र नियमित घेणे चालू केले पाहिजे. ही यादी खूपच मोठी आहे.
अलीकडच्या तांत्रिक विभाग युगात मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर म्हणजे यूट्यूबवर मराठी साहित्यिकांच्या गाठीभेटी, मुलाखती, चर्चासत्र, पुस्तक परिचय, कथा-कविता सादरीकरण इ. केले जाते, अशा सगळ्या चॅनेल्सना आपण स्वतःहून सबस्क्राइब केले पाहिजे. याला अजिबात पैसे लागत नाहीत. मराठी भाषेला किंवा मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या सर्व माणसांना, चॅनल्सना आपण प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांचे चॅनल्स हे मोठ्या प्रमाणात शेअर केले पाहिजे.
आणखीही काही आपल्या मनात असेल, तर आपण शेअर करा. माझ्याबरोबर असंख्य वाचकांपर्यंत “मराठी भाषेचे संवर्धन” याविषयी अधिकची माहिती मिळेल.
राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा तसेच मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, या हेतूने दरवर्षी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” १४ ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. या भाषेच्या अभियानामध्ये आपापल्या पद्धतीने आपणही सहभागी होऊया!
pratibha.saraph@ gmail.com