प्रासंगिक: ऊर्मिला राजोपाध्ये
वातावरण बदलतेय. आतापर्यंत आपण आल्हाददायी थंडीचा अनुभव घेतला. यंदा फारशी थंडी पडली नसली तरी काही दिवस नक्कीच गारठलेले होते. अजूनही हवेतील हवीहवीशी ऊब सुखावत आहे. ऐन थंडीचा काळ मागे सरला असला तरी अद्याप उन्हाचे घर तापलेले नाही. त्यामुळे अजूनही पहाटेच्या उन्हातील कोवळीक टिकून आहे. प्रकाश भगभगीत नाही तर सौम्य आहे. तरल हवा अंगात चैतन्य निर्माण करत आहे. अशा रम्य काळात येणारा माघ महिना पावित्र्य, मांगल्य आणि चैतन्याचे आगळे अधिष्ठान मांडतो. म्हणूनच आपण त्याची विशेष दखल घेतो. दुसरे म्हणजे अलीकडेच अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले गेले असून त्यात मोठ्या थाटामाटात रामलल्ला विराजमान झाले आहेत. सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन खुले झाले असल्यामुळे अनेकजण प्रभूदर्शनाचा लाभ घेण्यास आतुर आहेत. शरयूमध्ये दिवे सोडून रामचरणी नतमस्तक होण्याची अनेकांची मनीषा आहे. या सर्व भक्तगणांसाठी माघ महिना एखाद्या पर्वणीपेक्षा कमी नाही.
माघ महिन्यातील प्रत्येक दिवस शुभ असतो. शास्त्रपुराणांमध्ये माघ पौर्णिमेचे विशेष महत्त्व सांगितले आहे. माघ पौर्णिमा हा एक उत्सवी दिवस म्हणून साजरा केला जातो. हा पूर्ण महिनाच भगवान विष्णूला समर्पित आहे. पण त्यातही पौर्णिमेच्या दिवशी विष्णू गंगाजलात निवास करतात, अशी श्रद्धा आहे. पुराणांंमध्ये तसा उल्लेखही आहे. म्हणूनच या दिवशी गंगाजलाचा स्पर्शदेखील स्वर्गप्राप्ती देतो, असे भाविक मानतात. पुराणानुसार या दिवशी व्रत, उपवास आणि दान आदी कृत्यांमुळे विष्णू प्रसन्न होतात तसेच इच्छित वरप्राप्ती होते. या कारणासाठीच माघी पौर्णिमेला गंगास्नानाचे महत्त्व अतीव आहे. पण प्रत्येकालाच हा शुभयोग साधता येत नाही हे लक्षात घेता या पूर्ण महिन्यात कोणत्याही नदीमध्ये अभ्यंगस्नान केल्यास गंगास्नानाची पुण्यप्राप्ती होते असे सांगितले जाते. म्हणूनच घराघरांतील ज्येष्ठ अगदी नदीत जमले नाही, तरी या संपूर्ण महिन्यात अभ्यंगस्नानाचा नियम पाळतात. पहाटे सूर्योदयाच्या आधी स्नान करण्याची ही परंपरा आजही भक्तिभावाने पाळली जाते.
धार्मिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या माघ महिन्यात यज्ञ, तप आणि दानाचेही विशेष महत्त्व आहे. या महिन्यात विष्णूच्या प्रतिमेची पूजा केली जाते. त्यानिमित्ताने उपस्थितांना भोजन दिले जाते. वस्त्र, गूळ, कापूस, तूप, फळं, शिधा आदींचे दान पुण्यदायक समजले जाते. या महिन्यात काळ्या तिळांचे हवन आणि पितरांना तर्पण याचेदेखील विशेष महत्त्व आहे. एकंदरच, या महिन्यात तिळाच्या दानाला महत्त्वपूर्ण स्थान दिल्याचे दिसते. थंडी कमी होऊ लागली असली तरी अद्यापही वातावरणातील गारवा पूर्णपणे संपलेला नसतो. असे असताना उष्णतावर्धक तिळाचा लाभ मिळावा या हेतूनेच या दानाचे महत्त्व असावे. काहीजण या महिन्यात सत्यनारायणाची पूजा करतात. ही भगवान विष्णूचीच पूजा असते. पंचामृताने कृष्णरूपी विष्णूप्रतिमेवर अभिषेक केला जातो. सत्यनारायणाला नैवेद्य म्हणून फळांबरोबरच गव्हाच्या रव्याचा शिरा केला जातो. भक्तिभावाने प्रसादाचं सेवन होतं. काही ठिकाणी कणिक भाजून बनवलेल्या चुरम्याचा नैवेद्य दाखवला जातो. या पूजेनंतर लक्ष्मी, महादेव आणि ब्रह्मदेवाची आरती करून त्यांचेही आशीर्वाद घेतले जातात.
या संपूर्ण महिन्यात जागोजागी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले दिसते. त्यातीलच एक भव्य सोहळा सजतो प्रयागमध्ये… अशीही या तीर्थक्षेत्री भाविकांची सतत वर्दळ असते. पण या महिन्यात प्रयागला एक मोठा मेळा भरतो. एक प्रकारे ही अाध्यात्मिक जत्रा म्हटली तरी वावगे ठरणार नाही. या मेळ्याला ‘कल्पवास’ म्हणून संबोधले जाते. या कल्पवासात विविध प्रथा-परंपरांचे पालन होते. यानिमित्त अनेक श्रद्धाळू संगमावर येऊन स्नानाचे पुण्य मिळवतात. त्याचप्रमाणे अनेक धर्मकृत्ये पार पाडतात. इथे सतत दान, पूजापाठ, यज्ञ यांसारखे विधी सुरू असतात. सुख-सौभाग्य, धन-संपत्ती आणि पुण्यप्राप्तीसाठी दूरदूरवरून लोक ही सुवर्णसंधी साधण्यासाठी येतात. आधी सांगितल्याप्रमाणे हा महिना आणि माघी पौर्णिमेची तिथी महालक्ष्मीच्या आराधनेसाठी शुभदायी सांगितली आहे. म्हणूनच या तिथीला महालक्ष्मीचीही उपासना केली जाते. तिची कृपा असेल, तर आयुष्यात कशाचीच कमतरता राहात नाही. हे लक्षात घेऊनच तिला प्रसन्न करण्यासाठी रात्री १२ वाजल्यापासून तयारी सुरू होते. माघी पौर्णिमेला मध्यरात्री १२ वाजता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या प्रतिमेची पूजा केली जाते. त्यांच्या स्वागतासाठी मुख्य द्वारावर तुपाचा दिवा प्रज्वलित केला जातो. या स्वागतामुळे प्रसन्न झालेली लक्ष्मी घर सोडून जात नाही, असा भाविकांचा विश्वास आहे.
हे सगळे उपचार करण्यामागे आध्यात्मिक प्रेरणा आहेच. पण बदलत्या ॠतूला सामोरे जाण्याची सिद्धतादेखील दिसते. या दिवसांत थंडी कमी होऊ लागते. सकाळ आणि संध्याकाळची वेळ वगळता हवेतला गारवा कमी होऊ लागतो. दुपारच्या वेळी काहीशा उष्ण झळा जाणवू लागतात. वसंताचे आगमन झाल्यामुळे पर्णहीन झाडांवर कोवळी पालवी फुलू लागलेली असते. विविधरंगी सुगंधी फुलांचे ताटवे फुलत असतात. अशा या रम्य काळात शरीरही सज्ज व्हायला हवे. कारण आगामी काळ उष्णतेच्या प्रकोपाचा असतो. दिवसेंदिवस ऊन तापणार असते. या बदलाला सामोरे जाण्यासाठीच सकाळच्या थंड पाण्याच्या स्नानाचे महत्त्व सांगितले असावे.
सकाळचे स्नान शरीराला मजबुती देते. जलोपचार हा अनेक व्याधींवरील रामबाण उपाय आहे. शिवाय स्नानासाठी नदीवर जाण्याचा उपाय योजल्यास निसर्गाचे बदलते रंगही सहज टिपता येतात. हा बदल मानसिक शांततेसाठी उपयुक्त ठरतो. आजच्या काळात भावना आणि श्रद्धेचा भर न ठेवता विचार करायचा झाल्यास या प्रथा-परंपरांचा अशा प्रकारे अन्वयार्थ लावता येईल. शेवटी पुण्यप्राप्ती, स्वर्गारोहण या सगळ्या भावनिक संकल्पना आहेत. प्रत्यक्षात वृत्ती प्रसन्न आणि समाधानी असल्या, तर इहलोकात स्वर्ग निर्माण करणे फारसे अवघड नाही.
माघ महिन्यात नर्मदा, गंगा, यमुना, सरस्वती आणि कावेरीसह जीवनदायी नद्यांमध्ये स्नानाचा योग साधावा, असे पुराण सांगते. महाभारतातदेखील माघी स्नानाच्या पुण्यप्राप्तीचा उल्लेख आढळतो. पद्मपुराणात याबाबतच्या लाभांची चर्चा केली आहे. आजच्या काळात सुयोग्य ठरतील, असे याचे संदर्भ लावत असताना आपल्याला नदीस्नानाबरोबरच नदीसंवर्धनाकडे लक्ष द्यावे लागेल. पुराणानुसार गंगेचे नाव घेऊन बादलीतल्या पाण्याने आंघोळ केली तरी गंगास्नानाचे पुण्य प्राप्त होते, असे म्हणतात. मग हाच नियम ध्यानी ठेवून आपापल्या शहरातले, गावातले पाणवठे स्वच्छ करण्याचा वसा घेतला, तर काय हरकत आहे? दारातल्या दिव्याने महालक्ष्मी प्रसन्न होत असेल, तर गावातल्या स्वच्छतेने का होणार नाही? हे सगळे कालसुसंगत विचार मनी ठेवून आचरण केले, तर माघच नव्हे तर येणारा प्रत्येक मास वेगळी ऊर्जा देऊन जाईल, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
आज आपण प्रथा-परंपरा पाळतो, पण त्यातील मथितार्थ लक्षात घेत नाही, या उपचारांमध्ये दडलेल्या प्रतीकांचा शोध घेत नाही. आज आपल्या जगण्याचे संदर्भ बदलले आहेत यात शंकाच नाही. पूर्वी नदीवर जाऊन स्नान करणे हा रोजचा रिवाज होता. पुरुष-महिला नदीवर अनवाणी जाऊन स्नान करत असत. ती तेव्हाची गरज होती. निसर्गाच्या आधाराने राहणारा माणूस पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून होता. म्हणूनच निसर्ग त्याचे रक्षणही करत होता. गवतावर अथवा मातीवर अनवाणी चालल्याने तळव्यांवरील अॅक्युप्रेशर पाॅइंट्स दाबले जाऊन आरोग्यरक्षण साधते, हा आजच्या वैद्यकशास्त्राने मानलेला सिद्धांत आहे. तसेच पहाटे प्रदूषणविरहीत हवेत फिरायला जाण्याचे आणि चालून आल्यावर थंड पाण्याने स्नान करण्याचे लाभही आपल्यापासून लपून राहिलेले नाहीत. मग याच संदर्भाने या उपचारांकडे पाहण्यास काय हरकत आहे? आज आपण निसर्गापासून फारकत घेतली असली तरी त्याच्यावरील अवलंबित्व संपलेले नाही.
आजही आपल्या जगण्याच्या नाड्या त्याच्याच हातात आहेत. म्हणूनच पुराणकथांकडील या प्रथा-परंपरांकडे मागास अथवा कालविसंगत म्हणून न पाहता आजच्या काळाशी त्याची सुसंगती लावण्याचा प्रयत्न करणे अधिक संयुक्तिक ठरेल. शेवटी काळ कोणता का असेना, आनंदी वृत्ती जोपासणे आणि प्रत्येक दिवसाचा आनंद लुटणे हे जगण्याचे मर्म आहे. रोजच्या धकाधकीमध्ये आपण ते विसरतो. अशा काही तिथी, काही दिवस हे मर्म स्मरणात आणून देतात, तेव्हा त्यांचे आभार मानायला हवेत. जगणे आनंददायी करणाऱ्या अनेक थेरपी अवलंबत असताना ही आपलीच प्राचीन थेरपी का मागे ठेवावी? ती अंगीकारण्याचे अनेक लाभ आहेत. बदलत्या ऋतूंच्या निमित्ताने ते दिनचर्येत बदल करून ते अनुभवू या आणि जगण्याचा निखळ आनंद घेऊ या.