Saturday, July 13, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनदुग्धव्यवसायातील नवलाई : ‘नवलबेन’

दुग्धव्यवसायातील नवलाई : ‘नवलबेन’

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

आपल्या आजूबाजूला असे अनेकजण असतात ज्यांना उद्योग-व्यवसाय का करत नाही, असे विचारल्यावर असंख्य कारणे तयार असतात. त्यातील काही कारणं म्हणजे उद्योगधंदा सुरू करायला पैसा पाहिजे. आता ते वय नाही, तरुणपणात सुरू करायला हवं होतं. जागा नाही. कोणता बिझनेस करावा हेच माहीत नाही. अशी कारणे आपल्यापैकी अनेकांनी ऐकली असतील. ही कारणं त्या बाईला कदाचित ठाऊक नसतील म्हणूनच ती शून्यातून उद्योगधंदा उभारू शकली. तेसुद्धा वयाच्या साठीमध्ये. लोकांना अडथळा वाटणारी सगळी कारणे तिने मोडीत काढली. ती प्रेरणादायी उद्योजिका म्हणजे नवलबेन दलसंगभाई चौधरी.

गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील नागला गावात राहणाऱ्या नवलबेनसाठी डेअरी उद्योग सोपा नव्हता. जेव्हा तिने पहिल्यांदा फर्म सुरू केली, तेव्हा तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. लोकांचे टोमणे खावे लागले, काहीजण हसलेसुद्धा. पण तिने जिद्द ठेवली, मेहनत केली आणि यशस्वी होण्याचा निर्धार केला. नवलबेनच्या चिकाटीला फळ मिळाले. तिची कंपनी हळूहळू भरभराटीला येऊ लागली. नवलबेन कधीही शाळेतही गेली नाही. मात्र आज ती लाखो रुपये महिन्याला कामावते. कारण तिला व्यवसायाची उत्तम जाण आहे. कोणासोबत कसे वागावे, कसे बोलावे हा स्मार्टनेस आहे. दुग्ध व्यवसायातले बारकावे नवलबेनने आत्मसात केले. सुरुवात छोट्यापासून केली. पण चिकाटी, सातत्य आणि कठोर मेहनत या गुणांच्या जोरावर तिने यश मिळवले.

बनासकांठा जिल्ह्यातील नागाना गावातील असलेल्या नवलबेनने आपल्या जिल्ह्यात अक्षरशः एक दुग्धक्रांती सुरू केली. नवलबेन यांनी गेल्या वर्षी स्वतःच्या घरात डेअरी सुरू केली. आता तिच्याकडे ८०हून अधिक म्हशी आणि ४५ गाई आहेत. आसपासच्या अनेक गावांतील दुधाची पूर्तता नवलबेनची डेअरी करते. दुधाच्या दर्जामध्ये कुठलीच तडजोड केली जात नाही. दुभत्या जनावरांना उत्तम दर्जाचा पौष्टिक असा चारा दिला जातो. त्यामुळेच नवलबेनच्या डेअरीमधील दुधाची गुणवत्तादेखील उत्तम आहे. नवलबेनने व्यवसाय सुरू करून पाच वर्षे झाली, पण खूप कमी कालावधीत तिने यशाचं शिखर गाठलं. नवलबेनने २०२० मध्ये १.१० कोटी रुपयांचे दूध विकून दर महिन्याला ३.५० लाख रुपयांचा नफा मिळवून विक्रम केला आहे. २०१९ मध्ये तिने ८७.९५ लाख रुपयांचे दूध विकले होते.

६२ वर्षीय नवलबेनला चार मुलगे आहेत. पण ते तिच्यापेक्षा खूपच कमी कमावतात. नवलबेन म्हणते, “मला चार मुलगे आहेत जे शिकलेले आहेत आणि शहरात काम करतात. मी गावाकडे ८० म्हशी आणि ४५ गाईंची डेअरी चालवते. दुग्ध व्यवसायात मी जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर होते.” नवलबेनचा दिवस पहाटे सुरू व्हायचा. वयाच्या साठीमध्ये सुद्धा ती स्वत: आपल्या गाई-म्हशींची काळजी घ्यायची. दूध काढण्यापासून ते शेण काढण्यापर्यंत सगळी कामे ती करायची. पाच वर्षांच्या मेहनतीमुळे चित्र पालटलं. रोज सकाळी स्वत: गाईंचे दूध काढणाऱ्या नवलबेनकडे आता तिच्यासाठी डेअरीमध्ये १५ कर्मचारी काम करतात. तिच्या दूध विक्रीच्या कामगिरीला बनासकांठा जिल्ह्यात दोन लक्ष्मी पुरस्कार आणि तीन वेळा उत्कृष्ट पशुपालक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

खरं तर आपल्याकडे माणसांना पन्नाशीनंतर निवृत्तीचे वेध लागतात. मधुमेह, रक्तदाबसारख्या आजारांचं शरीर माहेरघर बनते. म्हातारपणामुळे विविध व्याधी जडतात. त्याच वयात साठीतील नवलबेन उद्योग सुरू करते आणि फक्त सुरू करत नाही, तर त्याची उलाढाल कोटींच्या घरात जाते हे खरंच कौतुकास्पद आहे. व्यवस्थापनाचे धडे गिरवणाऱ्या तरुणांनादेखील जमत नाही ते नवलबेनने आपल्या साठीमध्ये केले. नवलबेनसारखी ‘लेडी बॉस’ कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला, स्त्री-पुरुषाला प्रेरणादायी आहे. ‘हे आपण करू शकतो’ हा आत्मविश्वास नवलबेन नकळत प्रत्येकाच्या मनात रुजवतात. ‘लेडी बॉस’ या शब्दाची व्याख्या नवलबेनसारख्या उद्योजिका सार्थ ठरवतात.

theladybosspower@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -