मायभाषा: डॉ. वीणा सानेकर
मराठीचे अध्ययन हा आपल्या समाजात आस्थेचा विषय अजिबातच नाही. मात्र मातृभाषेचे अध्ययन नि आकलन नीट झाले, तर दुसरी भाषा शिकणे सोपे होते. भाषाग्रहण या विषयाचे महत्त्व पालक आणि शिक्षक यांनी समजून घेणे गरजेचे आहे. पण अनेकदा हा मुद्दा गांभीर्याने पाहिला जात नाही. वास्तविक मेंदूआधारित संशोधनाच्या अंगाने या विषयाचा जागतिक स्तरावर सखोल अभ्यास झाला आहे.
लहान मुलांमध्ये भाषा शिकण्याची अमर्याद क्षमता असते. तिचा सर्जक उपयोग लहानपणापासून करून घेणे, मुलांना त्यांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर भाषानुभव देणे हे आवश्यक आहे. मात्र आपल्या शिक्षणव्यवस्थेत तसे घडते का? या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर एका नावीन्यपूर्ण भाषासमृद्धी प्रकल्पाची सुरुवात होतेे आहे. या प्रकल्पाकरिता तीन संस्था एकत्र आल्या आहेत. रचनावादी पद्धतीच्या शिक्षणात पथदर्शी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व गेली अनेक वर्षे शिक्षणात काम करणाऱ्या ‘ग्राममंगल’ या संस्थेने याकरिता पुढाकार घेतला आहे. ‘मराठी अभ्यासकेंद्र’ ही संस्थाही या प्रकल्पात सहभागी झाली आहे. २००७ पासून मराठीशी निगडित प्रश्नांवर मराठी अभ्यासकेंद्र काम करीत आहे. संशोधन आणि प्रश्नांसाठी चळवळ अशा दोन्ही अंगांनी ही संस्था काम करते.
पुण्यातील ‘अखिल भारतीय बालकुमार मराठी साहित्य संस्था’ मुलांकरिता विविध उपक्रम राबवत असते. भाषासमृद्धी प्रकल्पात सहभागी झालेली ही तिसरी संस्था. हा प्रकल्प पालघर जिल्ह्यातील शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत प्रथम प्राथमिक शाळांमधील मराठीच्या अध्ययन-अध्यापनावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. पालघर हा आदिवासी वस्तीचा भाग आहे. आजमितीला या भागातील बहुसंख्य विद्यार्थी मराठी शाळांमध्ये शिकतात. हे विद्यार्थी दैनंदिन जीवनात त्यांच्या त्यांच्या बोलींमध्ये व्यवहार करत असतात. शालेय शिक्षणाच्या कालावधीत, प्रारंभी त्यांना शिक्षणाकरिता त्यांच्या बोलींकडून प्रमाण मराठीकडे वळवणे हे फार मोठे आव्हान असते. त्यामुळे शिक्षकांना मराठीच्या अध्यापन प्रक्रियेत कोणत्या अडचणी येतात आणि शिकताना मुलांना कोणत्या अडचणी येतात, अशा दोन मुद्द्यांवर भर देऊन काम करावे लागणार आहे. पालघर जिल्ह्यामधील मराठीच्या शिक्षकांचे अनुभव यादृष्टीने महत्त्वाचे ठरतील. शिक्षकांना या प्रकल्पाच्या माध्यमातून काय अपेक्षा आहेत आणि मुलांकरिता कोणते उपक्रम राबवणे गरजेचे आहेत, ही या बैठकीतली चर्चा दिशादर्शक ठरणार आहे.
प्राथमिक स्तरावर मराठीचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांची आखणी या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे. मराठीची अभिव्यक्ती करण्याच्या नवनवीन संधी मुलांना कशा देता येतील व त्यातून भाषाविकास कसा साधता येईल, यादृष्टीने विविध उपक्रमांची आखणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्राला रचनावादी शिक्षणाची ओळख करून देणारे रमेश पानसे सर यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयीन मराठीकरिता काम करणारे संतोष आगरे, मराठी शाळांच्या लढ्यातील कार्यकर्ते सुशील शेजुले, डॉ. वीणा सानेकर, ग्राममंगलच्या ऐना व विक्रमगड येथील शाळांचे शिक्षक हा नावीन्यपूर्ण भाषासमृद्धी प्रकल्प साकारण्याकरिता अभ्यास व आखणी करीत आहेत.
दुसऱ्या बाजूने बोलीभाषांतील शब्दसंग्रह मराठीच्या बृहद्कोशात समाविष्ट करून घ्यायला हवे आहेत. खरे तर हा प्रकल्प रमेश पानसे यांनी राज्य मराठी विकास संस्थेकडे सादर केला होता. त्याचे पुढे काहीही झाले नाही. ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून मराठीच्या विकासासाठी काम करायला हवे, ते दूर राहते. आमच्या शासनाने मराठीला ‘ग्लोबल’ करण्याचा ध्यास घेतल्याने विश्व साहित्य संमेलनासारखे उत्सवी उपक्रम तातडीनेही घेता येतात. पण स्थानिक पातळीवरील मराठीच्या विकासाचा दीर्घकालीन अनुशेष भरण्याचे काय???