नक्षत्रांचे देणे: डॉ. विजया वाड
डॉ.जयंत नारळीकर यांचे नाव उभ्या बुद्धिमंत जगात सर्वश्रुत आहे. त्यांचे आई-वडील, सौ. सुमतीताई आणि रँगलर विष्णुपंत नारळीकर हे थोर गणिती यांची दूरदर्शनवर मुलाखत घेण्याची सोन्यासारखी संधी आकाशानंद या प्रोड्यूसरनी मला दिली हे माझे सद्भाग्य. त्यावेळी जयंत राव इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबई (कुलाबा)चे सर्वेसर्वा होते. अत्यंत निगर्वी नि निश्चयबद्ध कार्यक्रम. या बुद्धिमान शास्त्रज्ञांनी सारी संस्था मला हिंडून दाखविली. केवढा वेळ दिला. माझ्यासोबत इयत्ता ९वी, १०वीची मुले होती. त्यांचे शंकानिरसन खुलेपणाने केले. मुलांचा धीर चेपला. कितीतरी शंका नि दिलखुलास उत्तरे. मी स्तिमित झाले ते ऐकून, पाहून. तर ताई नि रँगलर विष्णुपंत! मी दोन वेळा त्यांच्या कुलाब्याच्या घरी रिहर्सलसाठी गेले. एकदा मंगलाताई नि एकदा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंतराव यांनी सोबत केली बसस्टॉपपर्यंत.
मंगलाताई माझ्या बरोबरच्या. थोड्याशा सीनियर. एमएस्सी फर्स्टक्लास फर्स्ट. नंतर कळले की, त्यांच्या सासूबाई कोल्हापूर विद्यापीठात पहिल्या आल्या होत्या. (उगाच का सुपुत्र जन्मा घातले?) यजमान रँगलर नि पत्नी तोडीस तोड प्रतिभाशाली! मंगलाताई राजवाडे (माहेरच्या) यांचे दु:खद निधन झाले नि मन खूप हळहळले. आपलीही वेळ आली असे वाटून निराशा गडद झाली. जगण्याची किती अभिलाषा ना? पण जगावेसे वाटणे, यातच तर जगण्याचा अर्थ दडला आहे असे मला मनापासून वाटते. या दोन मुलांना वाढविताना कधी तरी मार दिला का? यावर सुमतीताई म्हणाल्या, “मी आत्मक्लेष करीत असे. स्वत:ला खोलीबंद करीत असे. मग मुले बंद दाराशी विनवण्या करीत. ‘नाही गं भांडणार’ असे म्हणत. मी मगच दरवाजा उघडत असे.”
किती शिकण्यासारखे आहे ना? (मी तेव्हापासून माझ्या मुलींना कधीही मारले नाही. अर्थात त्या होत्याच शहाण्या माझ्या) प्राजक्ता M.S. झाली भारतात. MD झाली अमेरिकेत. २२ लोक एमडी झाले. पण एकट्या ताईची निवड युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये डॉ. रसेल मायर यांनी केली. तसे जाहीर केले. मी ते ऐकून आनंदले किती, याला मोजमाप नाही. माईक बोलत होता. मी ग्राऊंडवर ऐकत होते. “या २२ एमडींमधून, डॉ. प्राजक्ता देशपांडे यांना मी फॅकल्टी मेंबर म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये आमंत्रित करतो.” कान तृप्त तृप्त झाले. तर मंगलाताई नारळीकर! हुशार, स्मार्ट, बुद्धिमती, चपलमती, तरीपण निगर्वी. पुणे हे त्यांचे निवासस्थान. ते, डॉक्टरसाहेब आणि त्यांच्या मुली. सारेच सात्त्विक, निगर्वी, आल्या पाहुण्यांचा सत्कार करणारे. त्यांना अवघड वाटू नये असा बर्ताव करणारे! बुद्धीचे वैभव त्या घरात ओसंडून वाहत होते. सारे मानाचे किताब ‘आतल्या’ खोलीत मांडून ठेवलेले! प्रदर्शन अजिबात नाही. पण सन्मान तेवढाच. निगर्वी पण अगत्यमय. नारळीकरसाहेब विश्वकोश मंडळाचे सदस्य होते. “एक विनंती करायची होती.” अशी सुरुवात करून बोलणे! “अहो, तुम्ही आज्ञा करा सर.” मी म्हणे. “आपण पर्यावरणावर विश्वकोश करूया काय?”
“करूया की. तुमच्या आधिपत्याखाली करूया.”
“मी डॉ. हेमचंद्र प्रधान आणि डॉ. मगर यांची नावे सुचवितो.”
“सर, कबूल का? प्रधान सर, मगर सर!”
“कबूल. कबूल.”
नि वर्षभरात पर्यावरण कोश तैय्यार! तर नारळीकर सरांचे जग असे योजनाबद्ध, शिस्तीचे नियमिततेचे आहे. असाधारण नैमित्य. नियमितता. व्यासंग, चौफेर वाचन आणि आत्यंतिक शिस्तबद्धता. डॉ. जयंत नारळीकर यांचे मुलांसाठी चरित्र लिहिण्याची संधी मिळाली नि मी भाग्यवंत ठरले. चरित्र हातोहात संपले. पुनरावृत्ती काढावी लागली पण अनेक वाचकांचे जीवन समृद्ध झाले ना ते वाचून? निगर्वी वृत्ती कशी काय असावी याचे असाधारण दर्शन त्यांच्या जीवन चरित्राकडे पाहिले की जाणवते. लक्षात येते. १५ मिनिटांत गणिताचा सारा पेपर सोडविणारा मुलगा कोण? अहो जयंतराव! दुसरे कोण? ‘आयुष्य केवढे हे? आले भरून मेघ! चिरदाह वेदनेचा! तू ज्ञानयज्ञ सांग! अशी तपस्वी व्याख्या त्यांच्या आयुष्याची मला करता येईल.
थोर गणिती पिता, बुद्धिमती निगर्वी माता ज्यांना लाभली त्या थोर शास्त्रज्ञाचे घर बघण्याचे भाग्य मला लाभले. हा माझ्या आयुष्यातील सुयोग आहे. मंगलाताई गेल्या. सारे सुनसान झाले जग. एक दिवस आपणही जाणार. या सुंदर जगाचा निरोप घेणार. पण आहे तो प्रत्येक क्षण अर्थपूर्ण जगूया की! डॉ. नारळीकरांकडे असामान्य बुद्धिमत्ता आहे. आपणाकडे एखादा कोनाडा ज्ञान आवडीचा आहे तो जपूया. वाढवूया. मंगलाताईंना माझे नमन. सखी, स्वर्गातही सुखी राहा. आनंदी राहा. आम्ही तुझ्या साहेबांना जपू बरं!