Monday, July 15, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनआयुष्य फेसबुक लाइव्हवर नको, प्रत्यक्ष जगूया...

आयुष्य फेसबुक लाइव्हवर नको, प्रत्यक्ष जगूया…

दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम

हे खरंय की पूर्वीच्या काळी म्हणजे खूप जुन्या काळी फारशा सोयी-सुविधा नव्हत्या. माणूस पुढारलेला नव्हता. छोटसं घर, त्याच्याभोवती छोटीशी शेती, पशुपक्षी आणि तो, त्याचं कुटुंब असा तो जगत असे. त्याची दिनचर्यासुद्धा खूप मर्यादित स्वरूपाची एक साधीशी असे. त्याच आयुष्य अत्यंत साधे होते; परंतु त्या काळी मनुष्य खूप सुखी होता असं आत्ताच्या आधुनिक पुढारलेल्या काळामध्ये म्हटलं जात आहे. याचं कारण वेगवेगळ्या प्रकारची भौतिक सुखं मनुष्याच्या आजूबाजूला हात जोडून उभी आहेत, अर्थात याला कारणही माणसाने केली वैज्ञानिक भौतिक प्रगती हे आहेच, त्यांनी लावलेले वेगवेगळे शो, सुखासाठी शोधलेले नवनवे मार्ग, याच्यामुळे माणूस आज सुखी झाला आहे. मात्र तो समाधानी झाला आहे का? हा प्रश्न नेहमीच पडतो. हा प्रश्न पडण्याची कारण सुद्धा गेल्या काही वर्षांपासून समोर येतात. त्यातच आपापसातील हेवेदावे, वाढणारा हिंसाचार, एकमेकांचा जीव घेणे, स्वतःचा जीव देणे अशा घटना त्याच्या तीव्रतेसह सातत्याने वाढताना दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घटना आजूबाजूला आपण घडताना पाहतो, बघतो त्या पाहता खरंच मनुष्य सुखी आहे का? समाधानी आहे का? हा मोठा प्रश्न निर्माण होतो. पूर्वीच्या काळातील वातावरण, पूर्वीच्या काळातील सामाजिक चौकट, कौटुंबिक चौकट ही मर्यादित स्वरूपाची होती. एका घरात अनेक माणसं राहत असत. मात्र ते घर आनंदाने, एकोप्याने नांदत असे. पण ज्यावेळी मनुष्याच्या भौतिक सुखाच्या परिभाषा बदलल्या, तेव्हापासून घरातीलही सुख समाधानाचे चित्र बेरंगी होऊ लागलं. मनुष्याने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ याची व्याख्या खरं तर करून ठेवायला पाहिजे.

सुख म्हणजे भौतिक सुख असतं का? घरासमोर चांगली चारचाकी गाडी, टुमदार घर, घरामध्ये फर्निचर, सगळ्या प्रकारच्या सोयी-सुविधा, बँकेमध्ये भरगच्च बॅलन्स, वाटेल तेव्हा पैसे खर्च करण्याची मुभा म्हणजे सुखी समाधानी जीवन आहे का? हा प्रश्न आहे. कारण हे सगळं मिळवण्यासाठी आज मनुष्य ज्या पद्धतीने धावतोय, स्पर्धा करतोय ते पाहता ते सुखसुद्धा त्याला अनेकदा उपभोगता येतं नाहीय. मग तो उद्योजक असू दे, व्यावसायिक असू दे, नोकरदार असू दे अगदी विद्यार्थी असू दे प्रत्येकजण आज स्पर्धेमध्ये कुणालातरी मागे टाकण्यासाठी धावत आहे. आज मला याच्यापुढे जायचे असं म्हणून तो स्वतःच्या आयुष्याला वेग देतो अर्थात हे धावणं आज अपरिहार्यता झालेली आहे, ही गोष्ट गरजेचे झाली आहे. आजच्या काळामध्ये जर तुम्ही धावला नाहीत, तर तुम्ही संपलात ही साधी सहज आणि सोपी व्याख्या जीवनाची बनली आहे. तुम्हाला जगायचंय असेल, तर तुम्हाला धावलच पाहिजे अन्यथा तुम्हीच प्रत्येक आघाड्यांवर अपयशी होताना दिसून येता. शाळेमध्ये केजीपासून पीजीपर्यंत स्पर्धा आहे.

करिअरमध्ये स्पर्धा आहे, नोकरी मिळवताना स्पर्धा आहे, उद्योग-व्यवसाय करताना स्पर्धा आहे. अशा वेळी आयुष्यात येणारे ताणतणाव हे मनुष्याच्या वैयक्तिक जीवनावरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम करताना दिसतात. त्याच्यातली प्रेम, सहानुभूती, दया या भावना हळूहळू नष्ट होताना दिसत असून तो जास्त क्रूर होताना दिसत आहे. तो सतत अस्वस्थ असलेला दिसू लागला आहे. मन अस्थिर असलेले अनेकजण आजूबाजूला आपण पाहत असतो. अशा वेळेला, या प्रचंड प्रवाहात वाहून जाताना मनुष्याला कुठे थांबायचं आहे हे माहीत नसतं आणि ज्याला हे माहीत नसतं, तो या प्रवाहाचा एक भाग होतो. जिथे कुठे अडथळा येईल तिथे तो धडकून आपटतो. त्यावर त्या अडथळ्यांवर, अडचणींवर मात करण्याच्या ऐवजी तो तिथेच पराभूत होतो आणि संपतो. हीच आजच्या आयुष्याची एक दशा झालेली पाहायला मिळते आहे.

वास्तविक आपण जे काम करतो त्यामध्ये समाधानी असणे गरजेचे आहे. स्पर्धा ही आजच्या काळातली अपरिहार्यता असली तरीही आपणच आपल्याभोवती एक चौकट घालून ठेवली, तर आपल आयुष्य सुखी होईल. मन अस्वस्थ आहे, अनेक विचार आजूबाजूला घोंगावू लागले आहेत, त्यावर मात करण्याऐवजी, त्यातून मार्ग काढण्याऐवजी मनुष्य अशा त्रासदायक विचारांपासून सुटका करून घेताना दिसतो. अशा वेळी त्याला सोशल मीडिया जास्त जवळचा वाटू लागला आहे. सुखाच्या नावाखाली आजच्या वेगवेगळ्या सोयी-सुविधा आपल्याला उपलब्ध झाल्यात त्यामध्ये सोशल मीडिया ही एक खरंच गरजेची आहे का?, असा प्रश्न निर्माण करणारी सोय आणि सुविधा आहे.

आपण अनेकदा खूप दूरवरच्या लोकांशी सहज संपर्क साधतो, त्यांच्याशी थेट बोलू शकतो यासाठी खरं तर याचा वापर होणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा याचा गैरवापर करतानासुद्धा आपल्याला दिसतो. सोशल मीडियावरून चांगलं, प्रबोधनात्मक काम अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यापेक्षा त्यातून अनेक हिंसक गोष्टी घडताना दिसू लागल्या आहेत. अनेक सीसीटीव्ही कॅमेरे वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आपल्याला दिसतात. पण त्यामध्ये एखादं समाधान देणारं सकारात्मकता पसरविणारे कार्य आपल्याला दिसत नाही, तर अपघात, दरोडा, खून अशा प्रकारचे अनेक चित्रफिती वेगवेगळ्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात.

फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून प्रत्यक्ष खून, मारामाऱ्या, आत्महत्या अशा घटना समोर येतं आहेत. सोशल मीडियावरून सातत्याने एकमेकांवर आरोप, एकमेकांबद्दलची असूया खूप वाढताना दिसते आहे. कुणाला तरी संपवण्याची भाषा सातत्याने वाढू लागली आहे. हे इतक्या प्रचंड वेगाने प्रत्येकाच्याच समोर मोबाइलच्या माध्यमातून येत असल्यामुळे हा नकारार्थी गोष्टींचा आवेग, वेग नियंत्रणात आणणं मनुष्याला कठीण झाल आहे. खरं तर अशा काळामध्ये मनुष्यानं आपल्या मनावर नियंत्रण ठेवणं, आपल्या भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची निरंतर आणि प्रचंड आवश्यकता आहे आणि हे इतक्या प्रचंड वेगाने प्रत्येकाच्याच समोर मोबाइलच्या माध्यमातून येत असल्यामुळे हा नकारार्थी गोष्टींचा आवेग, वेग नियंत्रणात आणणं मनुष्याला कठीण झालं आहे. खरं तर अशा काळामध्ये मनुष्यानं आपल्या मनावर नियंत्रण ठेवणं, आपल्या भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची निरंतर आणि प्रचंड आवश्यकता आहे.

कारण असं म्हणतात भारताकडे महासत्ता होताना त्याच्या गाठीशी खूप मोठ्या प्रमाणातली युवा ताकद आहे. आज या युवा ताकदीच्या हातात मोबाइल आहे. त्या मोबाइलवर जे त्याच्या समोर येतेय, ते त्याला त्याच्या वैचारिक वाढीसाठी, विकासासाठी खरंच उपयोगी पडते का? हा विचार केला पाहिजे. आजचा युवा वर्ग जे समोर बघतो, पाहतो त्यावरून तो त्याची मते तयार करतो. त्यामुळे आपली ही युवा पिढी पुढे कोणता विचार घेऊन आपला देश चालवणार आहे, यावर गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. आज आपल्याला या प्रवाहात कुठे थांबायचं आहे याचा विचार करणे गरजेचे आहे, तरच आपल्या सुखी नावाच्या आयुष्यात समाधान नावाची गोष्ट नक्की येईल. त्यासाठी फेसबुक लाइव्हवर जगण्यापेक्षा खरं आनंदी जगणं महत्त्वाचं आहे.

anagha8088@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -