- शिदोरी : डॉ. स्वाती गानू
मला नेहमी हे जाणवतं की, जी मुलं ॲकॅडमिकली म्हणजेच शालेय, महाविद्यालयीन शिक्षणात बरीच मागे पडतात, त्यांच्याबाबत शिक्षक वैतागलेले असतात. वर्गात त्यांचा रेमेडोक्याचे, ढगोळे, नर्मदेतले गोटे असा उद्धार होत असतो. ही मुलं वर्गात फार अबोल असतात. आपण काही बोललो की ते चुकणारच. आपली अक्कल निघणार, मुलं जोरजोरात आरडाओरड करणार, मुली फिदी फिदी हसणार. आपल्याला खूप वाईट वाटणार, पण रडतासुद्धा येणार नाही. कितीही राग आला तरी त्या रागाला कोणी किंमत देणार नाही. या विचारांनीच खरं तर ते मिटून जातात. अशा मुलांना कोणी मित्र नसतात. ते खूप एकटे पडतात. शाळेची, अभ्यासाची, शिक्षकांची त्यांच्या मनात भीती बसते, वर्गात केवळ मुले-मुली नव्हेत, तर शिक्षकही त्यांना बुली करतात. प्रोगेस कार्ड, पॅरेन्टस टीचर्स मीटिंग ही तर त्यांच्यासाठी मोठी संकटं असतात.
मुलं मनातल्या मनात तुटत जातात, जखमी होतात. स्वतःला काही करता येईल, याचा विश्वासच गमावून बसतात. सतत आपल्यात काहीतरी कमी आहे ही भावना त्यांना प्रगती करू देत नाही. जे त्यांना कळत नाही, जमत नाही, लक्षात राहत नाही ते त्यांना का करावंसं वाटेल? कशी इच्छा होईल. जी गोष्ट आपल्याला येत नाही ती करण्यासाठी तुम्ही त्यांना कितीही प्रेशराईज केलं तरी ते अशा मुलांना जमत नाही. नापास होणं, लाल रेघ किंवा काठावर पास होणं हे भाग्य आपण कपाळी घेऊन आलेलो आहोत असं ते मान्यच करून घेतात. उरलेलं काम पालक, शिक्षक आणि नातेवाईक, समाजातील शहाणे लोक टोमणे मारून पूर्ण करतात. मला वाटतं बिचारी म्हणून त्यांची कीव करण्यापेक्षा किंवा त्यांना स्लो लर्नर म्हणण्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे हे समजलं, तर हे आईस ब्रेकिंग खूप सक्सेसफूल होईल.
त्यांना लेबलिंग करणं, शिक्के मारणं सहानुभूती दाखवणं हे या प्रश्नाचं उत्तर नाही. सर्वसामान्य मुलांकडून अभ्यास करून घेणं हे एक आव्हानच असतं हे खरंय पण मग हे करायचं कसं? तर…
- सगळ्यात प्रथम मुलांची अभ्यासातील अपेक्षित गती समजून घेणं, ते ॲक्सेप्ट करणं.
- त्यांची लक्षणं, कारणं, आव्हानं समजून घेणं.
- अभ्यासक्रम तयार करताना अभ्यासकांनी काही उद्दिष्टं ठरवलेली असतात. त्यातील ज्ञान, आकलन, उपयोजन, मूल्यमापन यापैकी सगळ्यात महत्त्वाचं असतं उपयोजन. जे जगताना आवश्यक असतं. मुलं जे शिकणार आहेत त्या गोष्टी त्यांना एक्झिक्यूट करता येणं याच्यावर लक्ष केंद्रित करायचं.
- असा मुलगा, मुलगी जर तुमच्या मुलाच्या ग्रुपमध्ये असेल, वर्गात असेल, तर तुमच्या मुलामार्फत त्याला अभ्यासात काय मदत करता येईल, ती आपण करायचीच.
- ही मदत हस्ताक्षर सुंदर करणारी, परीक्षेचा अभ्यास करतानाच्या सोप्या पद्धती सांगणारी, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास कसा करायचा, पास होण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न तयार करायचे आहेत यासाठीची तयारी करून घेता येऊ शकते.
मी माझ्या शाळेत वर्गशिक्षक, मुख्याध्यापक होते, तेव्हा हुशार मुलांशी बोलून विशेषतः गणित, इंग्रजीच्या तासांकरिता त्यांच्या शेजारी ही मुले बसतील अशी व्यवस्था केली होती. तसंच मोठ्या वर्गात, तर शाळा सुटल्यावर किंवा ऑफ तासांना मागे पडणाऱ्या मुलांना हुशार मुले चक्क वर्गात या मुलांचा एक-एक टाॅपिक तयार करून घ्यायची.
- जेव्हा मुलं शिकवायची त्यावेळी हुशार मुलांचीही त्या टाॅपिकची तयारी व्हायची. खरं तर शिकवण्याची जबाबदारी आल्याने मुलं आपल्यापेक्षा किती सोपं आणि तरीही क्रिएटिव्ह करून शिकवतात हे कळायचं. एक प्रकारची चुरसच लागायची. या बाल शिक्षकांचं आम्ही असेंब्लीत कौतुक करायचो. हे एकप्रकारे मॅच्युअर्ड होणंच असतं.
अभ्यासात मागे पडणारी मुलं लहान असली, तर त्यांच्यासाठी रंग, वस्तू, पदार्थ, ॲक्टिव्हिटीवर आधारित अभ्यास, म्युझिक थेरपी, लेगोज किंवा चिकनमाती, पपेट शो, मुखवटे, अभिनय, दम शेराज, मूकाभिनय अशा खूप गोष्टींचा उपयोग करता येतो. - वयाने मोठे, वरच्या वर्गातील मुलांबाबत मात्र तुला येतंय, फक्त थोडी मदत लागणार आहे, तू अजिबात कमी नाहीस, आपण एकत्र प्रयत्न करणार आहोत, असा विश्वास द्यावा लागतो. छोट्या-छोट्या अचिव्हमेंट्सचं कौतुक करावं लागतं. मुलांना इनफिरिअरिटी काॅम्प्लेक्समधून एकदा का बाहेर काढलं की, मग खूप मोठा अडथळा दूर होतो.
- या मुलांचं अभ्यासाचं टाइम टेबल विचारपूर्वक तयार करावं लागतं. यात सोपा विषय-कठीण विषय, कधी ऐकणं, तर कधी वाचन, कधी लेखन, तर कधी आकृत्या रेखाटन, कधी पाठांतर असे वेगळेपण असले की मुले कमी कंटाळतात. मधूनच एखादी अपूर्ण गोष्ट पूर्ण करण्याचा म्हणजेच विचार करण्याचा, अमुक प्रसंग आला तर काय करशील, काय निर्णय घेशील असाही एक्सरसाईज घेता येईल.
आम्ही मुलांशी, पालकांशी बोलून मागे पडणाऱ्या मुलांच्या अभ्यासातल्या अडचणी लेखी स्वरूपात घेतल्या होत्या. शिक्षक तर अशा मुलांना ॲक्च्युअल दत्तक घ्यायचे.
आता आणखी एक महत्त्वपूर्ण भाग पाहू या.
ही मुलं इनकाॅम्पिटन्ट नसतात. मात्र ते पुरेसं हार्ड वर्क करत नाहीत म्हणून ते मागे पडतात असं आपल्याला वाटतं. खरं म्हणजे तुमच्या मदतीमुळे त्यांचं आयुष्य सोपं होतं. मुलं का मागे पडतात? काय कारणं याची, तर…
१) डेव्हलपमेंटल कारणे –
ही मुलं डेव्हलपमेंटच्या माइलस्टोनबाबत मागे पडतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, प्रत्येक मुलाची एक गती असते कन्सेप्ट, अभ्यास समजून घेण्याची. काहींची जलद तर काही स्वतःचा असा वेळ घेतात. हे डम्ब नसतात. पण त्यांना खूप वेळेस घटवून घ्यावं लागतं. यांची स्मरणशक्ती कमजोर, बोलणं सुरू व्हायला उशीर, लर्निंग डिसऑर्डर असू शकतात.
२) सोशल कारणे –
इंटरॲक्शन ही मुलं टाळतात, कारण ते पीआर ग्रुपशी कनेक्ट करण्यात यशस्वी होत नाहीत. रिझर्व्ह, शांत राहतात.
३) पर्सनल कारणे –
ही मुलं आपल्या राग, ताण, काळजी, निराशा या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टींनी डिस्टर्ब होतात. आत्मविश्वास गमावून बसतात. यांचा सेल्फ एस्टीम, काॅन्फिडन्स, इमोशनल इन्स्टेबिलिटी हा मुख्य प्रश्न असतो.
४) एज्युकेशनल कारणे –
त्यांना वर्गात जे शिकवले जाते ते प्रोसेस करायला, समजून घ्यायला वेळ लागतो.
असं का होतं?
जर मुलं नैसर्गिक, शारीरिक, मानसिक, भावनिक संकटातून गेली असली किंवा प्रीमॅच्युअर बर्थ, ब्रेन, नर्व्हस सिस्टीम डिसीज, ओव्हर पॅम्परिंगमुळेही हे होते.
या मुलांना कशी मदत करायची, तर…
मोटिव्हेशन देऊन, रिवॉर्ड देऊन, छोटी टार्गेट्स ठरवून, शिक्षक, केअर गिव्हर, पार्टनर यांच्याशी बोलून, रिअलिस्टिक अपेक्षा ठेवून खूप मदत होते.
त्यांच्या डोळ्यांसमोर तक्ते, कॅलेंडर, नोट्स, रिमांयडर्स, ऑडिओ, व्हिज्युअल गोष्टी वापरण्यासाठी असल्या, तर त्यांना प्रेरणा मिळेल आणि तेही प्रगतीची वाट हळूहळू पण योग्य दिशेने नक्कीच चालू लागतील.