Trees : झाडांचे फायदे


  • कथा : प्रा. देवबा पाटील


झाडे प्रदूषणाचे कण शोषून घेतात व प्रदूषण कमी करतात, पण त्याव्यतिरिक्त झाडे उष्णता शोषून घेतात व थंड हवा देतात. वातावरणातील जवळपास ४० टक्के बॅक्टेरिया झाडे शोषून घेतात व रोगजंतू कमी करतात. झाडांमुळे शहरातील गोंगाटही १५ डेसिबल्सने कमी होतो, त्यामुळे ध्वनिप्रदूषणाचा त्रास कमी होतो.



mलग १७ दिवसांपासून सरांचे विद्यार्थ्यांना खेळीमेळीत दररोज ‘आपल्या पृथ्वीचे वातावरण’ हे प्रकरण शिकवणे सुरू होते. आता ते प्रकरण शिकण्याचा अठरावा दिवस उजाडला. त्या दिवशी देशमुख सर वर्गावर आले नि सारी मुले आनंदित झाली. सरांनी पहिल्याच तासाला मुलांना प्रश्न विचारण्याची मुभा दिलेली होतीच. तसेही सरांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे मुलांच्या मनात सरांबद्दल आदर होता; परंतु भीती मात्र नव्हती. त्या दिवशीसुद्धा सरांचे शिकवणे सुरू होताक्षणीच...



“हरितगृह परिणाम म्हणजे काय असतो सर?” वीरेंद्राने प्रश्न केला.



“पृथ्वीवरून सूर्याची उष्णता परावर्तित होत असते. त्यातील बरीचशी उष्णता आकाशामध्ये विरून जात असते; परंतु हवेत वाढत्या कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामुळे कार्बन डायऑक्साईडचा जाडसा थर वातावरणात निर्माण होतो. हा जाड थर हरितगृहातील काचेसारखे काम करतो. त्यामुळे पृथ्वीवरील उष्णता बाहेर न जाता ती हा थर आणि पृथ्वी यामध्ये कोंडली जाते. त्यामुळे पृथ्वीचे तापमान हे नेहमीच्या सरासरीपेक्षा जास्त वाढते. त्यालाच “हरितगृह परिणाम” असे म्हणतात. ते वाढते तापमान
आपणास जास्त त्रासदायक ठरते.” सरांनी सांगितले.



“झाडांचे काय काय फायदे आहेत सर?” मंदाने प्रश्न केला.



“झाडे प्रदूषणाचे कण शोषून घेतात व प्रदूषण कमी करतात हा तर महत्त्वाचा फायदा आहेच, पण त्याव्यतिरिक्त झाडे उष्णता शोषून घेतात व थंड हवा देतात नि उन्हाळ्यात आपले गाव, शहर वा नगर वातानुकूलित ठेवण्याचे कार्य करतात. त्यासाठी एसीसारखे कोणतेच महागडे विद्युत उपकरण लागत नाही व विजेचा खर्चही काहीच लागत नाही. वातावरणातील जवळपास ४० टक्के बॅक्टेरिया झाडे शोषून घेतात व रोगजंतू कमी करतात. झाडांमुळे शहरातील गोंगाटही १५ डेसीबल्सने कमी होतो. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाचा त्रासही कमी होतो. मोठ-मोठ्या झाडांची मुळे जमिनीत खूप खोलवर जातात नि त्याद्वारे पावसाचे पाणी जमिनीत खोलवर मुरते व विहिरींना पाणी येऊन पाणीटंचाई कमी होते. झाडांमुळे गावाचे, शहराचे, नगराचे सृष्टीसौंदर्यही वाढते की, त्यामुळे मन नेहमी प्रसन्न राहते.” सरांनी उत्तर दिले.



“सर, झाडे ढग कसे अडवतात? ढग तर झाडांपेक्षाही जास्त उंचावर असतात.” जयेंद्राने विचारले.



सर म्हणाले, “झाडे ढग अडवतात म्हणजे ज्या भागात झाडे जास्त असतात, त्या भागात झाडांच्या पानांतून बाष्पीभवनाची क्रिया सतत सुरू असते. ती तयार झालेली वाफ वातावरणात जाते व झाडावरील वातावरणातील उष्णता कमी होते म्हणून हवेत गारवा जास्त राहतो. त्या गारव्यामुळे पुढे निघून जाणाऱ्या ढगांचा वेग खूप कमी होतो व ते तेथे पाऊस पाडतात. त्यामुळे ते झाडे ढग अडवतात असे म्हणतात; परंतु पर्वतांची उंची जास्त असते व ढग त्यांपेक्षा कमी उंचीवरून वाहत असतात. साहजिकच पर्वतांवरील झाडांची उंची ही ढगांपेक्षाही जास्त असते. ती झाडे मात्र ढगांना नक्कीच अडवतात. तसेच झाडांच्या पानांमधून होणाऱ्या बाष्पीभवनामुळे वाफ जास्त जमते. त्या वाफेचेही पावसात रूपांतर होते. म्हणून जेवढी झाडे जास्त तेवढे पावसाचे प्रमाण जास्त असते.”



“सर येत्या वसंत पंचमीला संत तुकाराम महाराजांच्या जयंती दिनी आपल्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या गावात वृक्षारोपण करूया का?” वीरेंद्राने सरांना म्हटले. “जरूर, जरूर.” सर आनंदाने म्हणाले, “आपण संत तुकाराम महाराजांचे स्वप्न पूर्ण करू. त्यांनी म्हटलेच आहे की, “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे.” आजच्या आजच आपण त्या कामाला लागू. मी आत्ताच हा तास संपला की, आपल्या मुख्याध्यापकांना भेटतो व आजच शाळा सुटली म्हणजे त्यांना घेऊन आपल्या गावच्या सरपंचाकडे जातो. सरपंचांना भेटून तुमच्यासाठी झाडांच्या रोपट्यांची व्यवस्था करतो व गावात कोणकोणत्या चौकात, किती व कोठे कोठे झाडे लावायचीत त्या जागाही निश्चित करतो. ठरले मग?” सरांनी साऱ्या मुलांकडे बघत प्रश्न केला.



“हो सर.” सारी मुले आनंदाने एकसुरात ओरडली.



“उद्याचा शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे आपला शेवटचा सव्वाचार वाजेचा तास आहे. आता मात्र उद्याच्या तासाला आपण आपले हे प्रकरण पूर्णच करू. थोडा उशीर झाला तरी चालेल. तुम्ही सायंकाळी तुम्हाला थोडा उशीर होईल असे समजून व घरी तशी सूचना देऊनच उद्या सकाळी शाळेला या.” एवढे बोलून व वर्गाकडे एक नजर टाकून सर वर्गाबाहेर पडू लागले.



मुलांनीही सरांना जाता जाता एकसुरात “हो सर.” असे उत्तर दिले.

Comments
Add Comment

साबणाचे फुगे कसे निर्माण होतात?

कथा : प्रा. देवबा पाटील त्या दिवशी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर सीता व नीता या दोन्हीही बहिणी खूपच उत्साहाने घरी

कावळा निघाला शाळेला...

कथा : रमेश तांबे एक होता कावळा. त्याला एकदा वाटलं आपणही शाळेत जावं. माणसांची मुलं शाळेत जातात. तिथं जाऊन मुलं काय

ट्रोल

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ साधारण दहा वर्षं मागे पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की ‘ट्रोल’ हा शब्द मी अलीकडे

निंदा वाईटच

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मनुष्य सामाजिक प्राणी आहे. समाजात राहण्यासाठी परस्परांचा आदर, समजूत,

चिमणीची गोष्ट...

एक होती चिमणी ती एका झाडावर राहायची. तिचा शेजारी होता कावळा. तो होता थोडासा बावळा. काव काव करायचा अन् चिमणीला

समुद्राचे पाणी निळे का दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील रोजच्यासारखे सीता व नीता या दोघी बहिणींनी संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर आपला गृहपाठ