कोकणी बाणा: सतीश पाटणकर
विरार रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला डोंगरावर जीवदानी माता वसली आहे. जीवनदानी मातेचं मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या प्राचीन आहे. या मंदिराची निर्मिती पांडवांनी वनवासात असताना केल्याची आख्यायिका सांगितली जाते. येथील एका गुफेत पाच पांडवांनी देवीची स्थापना केली होती. हे स्थान ‘पांडव डोंगरी’ सदृश बनवलं गेलं. हे स्थान योगी, संत आणि ऋषी यांचं निवासस्थान होतं. आजही अनेक योगीपुरुष आणि ऋषी देवदर्शनादरम्यान मंदिर परिसरात निवासाला असतात. जीवदानी देवी ही हिंदू देवी आहेत. नवरात्रोत्सव म्हणजे देवीचा उत्सव! या दिवसांमध्ये अनेक जण आदिमाया, आदिशक्ती असलेल्या देवीचे दर्शन घेतात. महाराष्ट्रातील अनेक शक्तिपीठांपैकी एक असलेली विरारची जीवदानी देवी भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. उंच डोंगरावर कडेकपारीत वसलेल्या या देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रिघ लागते. केवळ वसई तालुक्यातच नव्हे, तर राज्यभरात या देवीची ख्यातकीर्त असून शेकडो भाविक या देवीच्या दर्शनासाठी दररोज येत असतात.
महाराष्ट्रातील विरारमध्ये देवीचे मुख्य मंदिर एका डोंगरावर आहे. हा डोंगर चंदनसार, नारिंगी व विरार या गावांच्या परिसरात आहे. विरार पूर्वेला नारिंगी परिरातील अन्नपूर्णाबाई तांत्रिक महाविद्यालयासमोरील पाऊलवाटेने व जीवदानी रस्त्याने गडाच्या पायथ्याशी असलेल्या श्री गणेश मंदिराकडून जाणाऱ्या सिमेंटच्या पायरी वाटेने, अशा दोन मार्गांनी गडावरील मंदिराकडे जाता येते. देवीची पूजा म्हणजे शक्तिपूजा. दक्षाने केलेल्या यज्ञात आत्माहुती केलेल्या सतीच्या कलेवराचे श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने ५१ तुकडे केले. ज्या ज्या ठिकाणी हे तुकडे पडले तेथे देवतांची शक्तिपीठे तयार झाली. भारताबाहेर नेपाळ व बलुचिस्तान येथेही शक्तिपीठे आहेत. महाराष्ट्रात असलेल्या १८ शक्तिपीठांपैकी जीवदानी हे एक शक्तिपीठ आहे. जीवदानीच्या या डोंगरावर १७व्या शतकाच्या सुमारास जीवधन नावाचा किल्ला होता. आजही या ठिकाणी तटाच्या बांधकामाचे कोरीव दगड भग्नावस्थेत आढळतात. चिमाजी आप्पांनी हा किल्ला ३१ मार्च १७३९ रोजी जिंकून घेतला. या गडावर पांडवकालीन दगडात कोरलेल्या गुंफाही आहेत.
या देवस्थानाबाबत आणखीही काही आख्यायिका सांगितल्या जातात. जीवदानी मातेच्या मंदिराचा पाया सतराव्या शतकात रचला गेल्याचे म्हटले जाते. मंदिरापर्यंत जाण्यासाठी भाविकांना १४०० पायऱ्या चढून जावे लागते. जीवदानी मातेचे मंदिर पूर्वी खूपच लहान होते. पायऱ्याही चढणीच्या होत्या. मात्र वेळेनुसार यात अनेक बदल करून भाविकांच्या सोयीनुसार त्यांची निर्मिती केली गेली आहे. १९४० ते १९५६ या काळात बारकीबाय नावाची भक्त रोज गडावर जाऊन नेमाने देवीची पूजा करीत असे, असं सांगितलं जातं. त्यानंतर १९५६ मध्ये देवीच्या भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. सौम्य शीतल, प्रसन्न अशा या मूर्तीच्या डाव्या हाती कमलपुष्प आहे, तर उजव्या हाताने माता भाविकांना आशीर्वाद देत आहे. त्यापूर्वी देवीची लाकडी मूर्ती होती.
दसऱ्याच्या दिवशी जत्रा भरते, ज्यात हजारो लोक हजेरी लावतात. या किल्ल्याला पर्यटक वारंवार भेट देतात. देवीच्या मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार झाला असून पांढऱ्या संगमरवरी देवीची सुंदर मूर्ती आहे. नवसाला पावणारी देवी म्हणूनही या मंदिराची ख्याती आहे. देशभरातील देवीभक्त या ठिकाणी दर्शनाकरिता येतात. आपल्या दु:खांचं निवारण व्हावं, आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून आईला साकडं घालतात. या मंदिरात दरदिवशी शेकडो भाविक येत असतात. मात्र नवरात्रीतील नऊ दिवस आणि अन्य उत्सवादरम्यान ही संख्या लाखोंच्या घरात असते. पवित्र मनाने मनोकामना करणाऱ्या भक्तांची प्रत्येक इच्छा आई पूर्ण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. (लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)