महाराष्ट्र राज्य सरकारने नुकताच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शिवजन्मभूमीच्या अर्थात शिवनेरीच्या पायथ्याशी बिबट सफारी प्रकल्प राबविण्याचा घेतलेला निर्णय खरोखरीच स्तुत्य आहे. बिबट सफारीच्या निमित्ताने राज्यभरातून तसेच देशाच्या कानाकोपऱ्यांतून पर्यटक बिबटे पाहण्यासाठी शिवजन्मभूमी परिसरात येतील. बिबट सफारीसोबत शिवजन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला पाहतील. अष्टविनायकातील ओझर, लेण्याद्री हे दोन विनायक जुन्नर तालुक्यात आहेत, त्यांचेही दर्शन घेतील. खोडदच्या दुर्बिणीची जागतिक पातळीवर चर्चा आहे. साखर उद्योगात असलेला अग्रणी विघ्नहर साखर कारखाना आहे, त्यालाही भेट देतील. सोबत पर्यटकांना साद घालणारा माळशेज घाटही अवघ्या काही मिनिटांवर असल्याने तेथेही पर्यटक जातील. शिवकालीन नाणेघाट हा तर गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांसाठी आकर्षणाची बाब आहे. एकंदरीत बिबट सफारीसाठी आलेल्या पर्यटकांना पर्यटनाच्या माध्यमातून देवदर्शन, भौगोलिक माहिती, जुन्नर परिसरातील लेण्यांचे दर्शन, घाटांतील भ्रमंती असे एकाच दगडात अनेक पक्षी मारता येतील.
बिबट सफारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनावणे, जिल्हा परिषद भाजपाच्या सदस्या आशा बुचके या सर्वांचेच परिश्रम आणि योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. जुन्नर तालुक्यातील बिबट सफारीने पर्यटन वाढेल, पर्यटकांना बिबटे मोठ्या प्रमाणावर पाहावयास मिळतील, पण आजमितीला जुन्नर तालुका बिबट्यांचे माहेरघर बनला आहे. पाळीव कुत्र्यांपासून, पशुधनापासून मानवी जीवितावर धोक्याची टांगती तलवार आजही कायम आहे.
पुणे जिल्ह्यातील घडामोडींवर विशेषत: जुन्नर, आंबेगाव, खेड आणि काही प्रमाणात जुन्नरलगतच्या नगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये बिबट्याचा हल्ला ही बाब आता नित्याचीच झाली आहे. या परिसरामध्ये दररोज कोठे ना कोठे बिबट्याच्या उपद्रवाच्या घटना घडतच आहेत. बिबट्याचा मानवी वस्तीत प्रवेश ही गेल्या काही वर्षांतील नित्याचीच घटना झाली आहे. बिबट्याने येऊन शेळ्या, मेंढ्या, कुत्री, कोंबड्या फस्त करणे, यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान होणे आता रोजचेच झाले आहे. एकेकाळी कुत्रा घराच्या उंबरठ्यावर असला म्हटल्यावर तो घराची व पिकाची राखण करेल हा बळीराजाचा विश्वास असायचा. कुत्रा अंगणात असल्यावर चोर तर सोडा, पाहुणे मंडळीही घरात येण्यापूर्वी आवाज देऊन घरातल्यांना उंबऱ्यावर बोलवत असायची. पण आता घराची, शेताची राखण करणाऱ्या कुत्र्याचीच बिबट्यापासून राखण करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. बिबट्याच्या उपद्रवामुळे गावागावांतील कुत्र्यांची संख्या कमी होत चालली आहे. कुत्र्यांच्याच संरक्षणासाठी लोखंडी पिंजरे बनवून रात्र झाल्यावर कुत्र्यांना त्या लोखंडी पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून घ्यावे लागत आहे. शेळ्या, मेंढ्या, गाई-म्हशी, बैल यांचे गोठेही आता बंदिस्त होऊ लागले आहेत. एकेकाळी गोठ्यामध्ये राहणारी ही दुधदुभत्याची जनावरे आता सिमेंटच्या भिंतीमध्ये अथवा लोखंडी कंपाऊंडच्या पिंजऱ्यांमध्ये बंदिस्त होऊ लागली आहेत. उसामुळे बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
वनविभागाने बिबटे बंदिस्त करून परिसरातून घेऊन गेले तरी बिबट्यांची संख्या कमी होत नाही, उलट वाढतच चालली आहे. उसामुळे बिबट्यांना आश्रय मिळणे सुलभ झाले आहे. बॉयलर पेटल्यावर एकीकडचा ऊस तुटून गेल्यावर बॉयलर बंद होईपर्यंत पहिला तुटलेला ऊस वाढतो, त्यामुळे बिबट्यांना आश्रयासाठी धावपळ करावी लागत नाही. शेतामध्ये फिरणे बिबट्यांमुळे एकट्या-दुकट्याचे काम राहिलेले नाही. दुचाकीवरून जाणाऱ्यांना बिबटे महाराज सोडत नाहीत. हल्ला करतात. अंधार पडल्यावर दुचाकीस्वार दुचाकीवरून जाणे टाळतात. हल्ल्याच्या वाढत्या घटनांनी गावागावांत बिबट्यांची दहशत वाढली आहे. बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. अन्य भागांच्या तुलनेत जुन्नर-आंबेगाव तालुका, तर बिबट्यांचे माहेरघर बनला आहे. शहरी भागात मुले रोजगारासाठी गेल्यावर ग्रामीण भागात केवळ वयोवृद्ध मातापिताच आता घराघरात पाहावयास मिळत आहेत. रात्री-अपरात्री मोबाइल वाजला तरी शहरातील मुलांच्या मनात प्रथम धडकी भरते. गावाला काही घडले तर नाही ना, अशी शंका मनामध्ये निर्माण होते. गावागावांत आता सीसीटीव्ही लावण्याचे प्रमाण याचमुळे वाढीस लागले आहे.
जनावरांचे गोठे, घरातील उंबरठे, घरासभोवतालचा परिसर आता सीसीटीव्हीच्या नजरेत सामावू लागला आहे. बिबट्यांच्या दहशतीमुळे ग्रामस्थ एका वेगळ्याच भीतीच्या छायेखाली वावरू लागले आहेत. गावात कुत्र्यांची संख्या कमी होत चालली आहे. बिबट्यांच्या हल्ल्यामुळे शेतात कोणी एकटे-दुकटे काम करण्यास धजावत नाहीत. सकाळच्या वेळी गावात दध घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वारांवरही बिबटे हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काम करायचे कधी, स्वत:ला सांभाळायचे की, घरातील कुत्र्यांसह अन्य दुधदुभत्या जनावरांना सांभाळायचे? घरातील लहान मुलांना शेतात तर सोडा, घराच्या आवारातही एकट्याला खेळण्यासाठी सोडता येत नाही. बिबट्याच्या हल्ल्यामुळे दगावल्यावर सरकार आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेते. पण हेच सरकार बिबट्यांनी हल्ला करू नये, जनावरांचे तसेच नागरिकांच्या जीविताचे काही बरवाईट होऊ नये यासाठी सरकार ठोस उपाययोजना का राबवित नाही, असा संताप गावागावांतील शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बिबट्यांचा वेळीच बंदोबस्त न झाल्यास गावागावांतील शेतकरी आता स्वत:ला व स्वत:च्या जनावरांना जगविण्यासाठी शिकारी बनलेले पाहावयास मिळतील, असे चित्र नजीकच्या काळात निर्माण होण्याची भीती आहे.
सतत बिबट्यांच्या दहशतीखाली किती काळ वावरायचे असा सूर आता गावागावांत आळविला जावू लागला आहे. सरकारने बिबट्याच्या समस्येवर वेळीच तोडगा न काढल्यास जुन्नर-आंबेगावचा परिसर शिकाऱ्यांचे आकर्षण बनलेला दिसून येईल. कारण जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. बिबट्यांच्या हल्ल्यामुळे जनजीवन भयभीत व विस्कळीत होऊ लागले आहे. आपल्याला जगायचे असेल तर बिबट्याला संपवावे लागेल, अन्यथा हा बिबट्या आपल्यासह आपल्या जनावरांना संपवेल, असा विचार आता गावागावांत प्रबळ होऊ लागला आहे. जंगलामध्ये शिकार शोधणारे शिकारी आजही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहेत, शिकारीचे थ्रील हे जणू त्यांचे व्यसनच बनले आहे. त्या तुलनेत जुन्नर-आंबेगाव तालुक्यामध्ये बिबटे हे सहज पाहावयास मिळतात. त्यामुळे माणसांच्या आणि बिबट्यांच्या अस्तित्वासाठी सरकारनेच आता ठोस उपाययोजना करायला पाहिजे. कारण जगण्यासाठी आणि अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष सुरू झालाय. आज मानवी जीवन बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असले तरी भविष्यात मानवामुळे बिबट्याचेच अस्तित्व संपुष्टात येऊ नये म्हणजे झाले. बिबट सफारीचा निर्णय सरकारने घेतलाच आहे, तर बिबट्यांच्या समस्येवर तोडगा काढण्याची जबाबदारीही सरकारचीच आहे. त्यामुळे बिबट्यामुळे कोणी मेल्यावर आर्थिक मदतीसाठी सरकारने पुढाकार घेण्याऐवजी, जीवितहानी टाळण्यासाठी सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुके हे बागायती शेतीसाठी ओळखले जातात. जुन्नर, आंबेगाव, खेड, मुळशी, हवेली, पुरंदर यांसह अन्य भागही बारमाही पाण्यामुळे शेतीच्या बाबतीत सुजलाम, सुफलाम म्हणून ओळखला जातो. बागायतींमध्ये फळभाज्या व पालेभाज्यांची शेती हा गेल्या तीन-साडेतीन दशकांपासून जुगार म्हणून कृषी क्षेत्रात संबोधला जात आहे. एका पिकामध्ये उत्पन्न मिळाले, तर पुढच्या पाच-सहा पिकांमध्ये गुंतवलेलेदेखील वसूल होत नसल्याने बळीराजाला कर्जबाजारी व्हावे लागले आहे. त्या तुलनेत ऊस हा कमी कष्टाचा व हमखास उत्पन्न देणारा पर्याय शेतकऱ्यांनी स्वीकारल्यामुळे साखर कारखानदारांना सुगीचे दिवस आले. ऊस मुबलक उपलब्ध झाला, साखर उद्योगाला चालना मिळाली. शेतकऱ्यांचे कष्टही कमी झाले; परंतु त्यातून बिबट हे जीवघेणे संकट जुन्नर – आंबेगाव तालुक्यात निर्माण झाले. बिबट्याला उसात निवाऱ्यांची आणि पशुधनामुळे उदरनिर्वाहाची सोय उपलब्ध झाली आहे. आज जुन्नर-आंबेगाव-खेड तसेच नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांवर बिबट्याच्या दहशतीखाली आपली जनावरे, घरातील माणसे सांभाळत शेती करण्याची जीवघेणी वेळ आली आहे.
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…