अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत कॉंग्रेस कारभारावर चौफेर हल्ला
नवी दिल्ली : यूपीए सरकारची राजवट दिशाहीन आणि नेतृत्वहीन होती. त्यावेळी सोनिया गांधी ‘सुपर पीएम’ म्हणून काम करत होत्या. नेतृत्व ही महत्त्वाची बाब आहे. दिशाहीन, नेतृत्वहीन नेतृत्व हे यूपीएच्या गलथान कारभाराचे केंद्रस्थान होते. सोनिया गांधी या राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षा म्हणून सुपर पंतप्रधान होत्या. त्यांच्यावरच सगळ्या गोष्टींचे निर्णय अवलंबून असल्याचे सांगत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत काँग्रेस आणि यूपीए काळातील सरकारवर चौफेर हल्ला चढवला.
लोकसभेत श्वेतपत्रिकेवरील चर्चेला उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी २००४ ते २०१४ या काळात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए आणि त्यानंतरच्या भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार यांच्यातील अर्थव्यवस्थेची तुलना करुन दाखवली आणि काँग्रेसवर हल्ला चढवला.
निर्मला सीतारामन यांनी २०१३ मधील एका घटनेबाबत काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. मनमोहन सिंग सरकारमध्ये राहुल गांधींनी फाडलेल्या प्रस्तावित अध्यादेशाचा आणि राहुल गांधींनी तो अध्यादेश कसा फाडला याचा संदर्भ अर्थमंत्र्यांनी दिला. त्यावर बोलताना सीतारामन यांनी राहुल गांधींचा उल्लेख ‘अहंकारी’ असा केला आणि त्यांची ही कृती त्यांच्याच पंतप्रधानांचा अपमान करणारी असल्याचे म्हटले.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी १० वर्षे प्रयत्न केल्यानंतर आज आपण ‘फ्रेजाइल ५’ मधून पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. आधीच्या सरकारच्या कारकिर्दीत गैरव्यवस्थापन आणि नेतृत्वातील त्रुटींमुळे अडचणी आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.