Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीMukesh Ambani : महाराष्ट्रातील 'ही' कंपनी आता मुकेश अंबानींच्या ताब्यात

Mukesh Ambani : महाराष्ट्रातील ‘ही’ कंपनी आता मुकेश अंबानींच्या ताब्यात

शाळकरी मुलांमध्ये प्रसिद्ध असलेली ८२ वर्षे जुनी कंपनी

नाशिक : महाराष्ट्रात सुमारे ८२ वर्षांचा इतिहास असलेली एक कंपनी रिलायन्स उद्योग समूहाचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी विकत घेतली आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने रावळगाव शुगर फार्मचा (Ravalgaon Sugar Farm Ltd) मिठाई व्यवसाय खरेदी केला आहे. यासाठी रिलायन्सने २८ कोटी रुपये मोजले आहेत. करारानुसार या कंपनीचे ट्रेडमार्क, पाककृती आणि बौद्धिक संपदा हक्क आता रिलायन्सकडे आले आहेत.

रावळगाव कँडी विशेषतः शाळकरी मुलांमध्ये फार प्रसिद्ध होती. मात्र, अलिकडच्या काळात कंपनीला व्यवसाय टिकवणे कठीण झाले. या उद्योगातील वाढलेल्या स्पर्धेमुळे कंपनीचा बाजारातील हिस्सा कमी झाला. तसेच साखरेच्या किंमतीत झालेली वाढ आणि ऊर्जेचा आणि मजुरीचा जास्त खर्च यामुळे कंपनीचा नफा कमी झाला. कोविड आणि लॉकडाऊनमुळे शाळा आणि कार्यालये बंद झाली आणि कंपनीची विक्री या काळात कमी झाली. त्यामुळे या कंपनीने रिलायन्ससोबत डील केले. रावळगाव शुगर फार्म यांनी काल एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली.

एफएमसीजी (Fast-moving consumer goods) कंपन्यांमध्ये बाजारपेठेतील जास्तीत जास्त हिस्सा मिळविण्याची स्पर्धा सुरू आहे. अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते इतर कंपन्यांचे अधिग्रहण करत आहेत. मात्र, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने या डीलबाबत कोणतेही स्टेटमेंट जाहीर केले नाही.

काय आहे रावळगाव कंपनीचा इतिहास?

उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी १९३३ मध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील रावळगाव गावात साखर कारखान्याची स्थापना केली. सुरुवातीला साखरेचे काम सांभाळणारी ही कंपनी १९४० पासून मिठाई व्यवसायात उतरली. १९४२ मध्ये या कंपनीने रावळगाव ब्रँड अंतर्गत टॉफी बनवण्यास सुरुवात केली. या कंपनीचे पान पसंद, मँगो मूड आणि कॉफी ब्रेक यांसारखे नऊ ब्रँड आहेत. या कंपनीच्या एकूण विक्रीपैकी ५०% विक्री महाराष्ट्रातून होते. ही कंपनी अनेक दशकांपासून विविध उत्पादने तयार करत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -