
नवी दिल्ली : आमच्या कार्यकाळात अनेक रिफॉर्म झाले असून हे सर्वकाही गेमचेंजर ठरले आहे. २१ व्या शतकाचा मजबूत पाया यामुळे घातला गेला आहे. एका मोठा बदलाच्या दिशेने, देश वेगाने पुढे गेला आहे. यामध्येही सभागृहातील सर्व सहका-यांनी खूपच चांगले मार्गदर्शन केले. मला आनंद आहे की, आपल्या अनेक पिढ्या ज्या गोष्टींची वाट पाहत होत्या, अशी बरीच कामे या १७ व्या लोकसभेच्या माध्यमातून पूर्ण झाली आहेत. त्यामुळेच नव्या संकल्पांसह १८व्या लोकसभेच्या कामकाजाची सुरुवात आम्हीच करणार असल्याचे आत्मविश्वासपूर्वक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शनिवारी लोकसभेत १७ व्या लोकसभेतील शेवटचे भाषण पार पडले. अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते. यानंतर महिन्याभरात १८ व्या लोकसभेची निवडणूक होणार आहे. संसदेत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ व्या लोकसभेत झालेली कामे, योजना आदींचा लेखाजोखा मांडला. यामध्ये नवीन लोकसभा बांधण्यापासून ते राम मंदिर बांधण्यापर्यंत मोदींनी मुद्दे मांडताना त्यांनी आमच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अनेक पिढ्यांची प्रतीक्षा संपली असे म्हटले आहे.
संसदेने कलम ३७० हटवून संविधानाला पूर्ण रुप दिले आणि त्याचे प्रगतीकरण झाले. ज्या ज्या महापुरुषांनी संविधान बनवले, त्यांची आत्मा आपल्याला आशीर्वाद देत राहणार. ७५ वर्षांपासून आपण इंग्रजांनी दिलेल्या दंड संहितेत जगत आलो. पण आता आपण गर्वाने पुढील पिढीला सांगू की ७५ वर्षे भलेही आम्ही दंड संहितेत जगलो, पण आता पुढची पिढी ही न्याय संहितेत जगेल. १७ व्या लोकसभेनं अनेक नवे मापदंड ठेवले. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याचा आपण उत्सव साजरा केला. या कालखंडात जी-२० परिषदेची अध्यक्षता भारताला मिळाली. संसदेचे नवे भवनही याच कार्यकाळात झाले, अशा शब्दांत मोदींनी गेल्या पाच वर्षांच्या कामाची माहिती दिली.
येणारी २५ वर्षे देशासाठी महत्वाचे आहेत. राजकारण, महत्वाकांक्षा आपल्या जागी, परंतु देशाच्या अपेक्षा आकांक्षा या पूर्ण होत आहेत. हा देश इच्छित परिणाम पूर्ण करणार. महात्मा गांधींनी मीठाचा सत्याग्रह केला. खूप छोटी घटना वाटत होती. घोषणा दिली तेव्हा देशाच्या लोकांना एक शक्ती देऊन गेला. आज देश अशाच वाटेवर आहे, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. तरुणांसाठी ही पाच वर्षे खूप महत्वाची ठरली आहेत. व्यवस्थेत पारदर्शीपणा आला आहे. ज्या गोष्टी तरुणांना चिंतेत टाकत होत्या त्यावर कठोर कायदे केले आहेत, असे मोदी म्हणाले.
१७ व्या लोकसभेला देव आशिर्वाद देत आहेत. राम मंदिर उभे राहिले. नवीन लोकसभा बांधण्यासाठी सगळेच चर्चा करत होते. खासदारांनी कोरोना काळात आपल्या वेतनातून ३० टक्के वेतन कपात करण्यात निर्णय घेतला, असे मोदी म्हणाले.
दहशतवादाविरोधात कठोर कायदे केले. काश्मीरचा ३७० हटविला. तिहेरी तलाक कायदा महिला शक्तीला मुक्ती देऊन गेला सर्व खासदार ज्यांचे विचार काहीही सांगत असतील. परंतु ते कधी ना कधी सांगतील नारी शक्तीला सक्षम केले गेले. हे सर्व काम १७ व्या लोकसभेने केले असल्याचे मोदी म्हणाले.