
लाहोर : पाकिस्तानात राष्ट्रीय संसदेसह विधानसभा निवडणुकांची (Pakistan Elections 2024) मतमोजणी अजूनही संपलेली नाही. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाने दावा केला आहे की त्यांचा पक्ष केंद्रासह खैबर पख्तूनख्वा आणि पंजाबमध्ये सरकार स्थापन करणार आहे. इम्रान खान यांनी एआय व्हिडिओ जारी करत निवडणुका जिंकल्याचा दावा केला आहे. तसेच विरोधी पक्षांवर देखिल घणाघाती टीका केली आहे. आतापर्यंतच्या निकालावरून खान यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्याचे दिसत आहे. मात्र, बहुमताचा आकडा अजूनही दूर आहे. बहुमतासाठी १३३ जागा आवश्यक आहे. अशा परिस्थितीत सरकार कुणाचे येणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
मतमोजणीचे आतापर्यंत हाती आलेले निकाल पाहिले तर नॅशनल अॅसेम्ब्ली निवडणुकीत खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पक्षाला सर्वाधिक ९७ जागा मिळाल्या आहेत. तर नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाला ७२ आणि बिलावल भुट्टो यांच्या पीपीपी पक्षाला ५२ जागा मिळाल्या आहेत. उर्वरित ४२ जागांवर अपक्ष आणि अन्य लहान पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
पाकिस्तानच्या विधानसभा निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाला पंजाब प्रांतात ११६, सिंधमध्ये १२, बलुचिस्तानात ० आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात ७९ जागा मिळताना दिसत आहेत.
पाकिस्तान पीपुल्स पार्टीला पंजाब प्रांतात १०, सिंधमध्ये ८२, बलुचिस्तानात ९ आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात ४ जागा मिळतील असे दिसत आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग-एन पक्षाला पंजाबमध्ये १३४, बलुचिस्तान ९ आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात ५ जागा मिळण्याची शक्यता आहे.
पीटीआय अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी रात्रीपासून निकाल येण्यास सुरुवात झाली होती. या निकालांवरून स्पष्ट होत आहे की पीटीआय केंद्र, खैबर पख्तुनख्वा आणि पंजाब प्रांतात स्पष्ट आघाडी मिळवत आहे. निवडणुकीत गडबडी करणाऱ्या लोकांनी तर आधीच मतमोजणीची प्रक्रिया संथ केली. नंतर निकालातही छेडछाड करण्यासाठी मतमोजणीच थांबवण्यात आली. पीटीआय उमेदवार आघाडी घेऊन जिंकण्याच्या स्थितीत होते पण सकाळी मात्र ते पराभूत झाले. पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या, असा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, काल मतमोजणीआधीच गोंधळाला सुरुवात झाली होती. मतमोजणी बराच काळ बंद होती. त्यामुळे निकालाची माहिती प्रसारमाध्यमांना मिळत नव्हती. इम्रान खान यांनीही निकालाचे अपडेट त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून दिले नव्हते. या गोंधळात दोन तास निघून गेले. त्यानंतर आयोगाने निकाल देण्यास सुरुवात केली. काल इंटरनेटही बंद करण्यात आले होते.