Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणNarayan Rane : ‘माझ्यावर टीका करतात, ठाकरेंनी सिंधुदुर्गसाठी काय केले ते सांगावे’

Narayan Rane : ‘माझ्यावर टीका करतात, ठाकरेंनी सिंधुदुर्गसाठी काय केले ते सांगावे’

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन

सिंधुनगरी : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतात व माझ्यावर टीका टिपणी करून जातात पण त्यांनी या जिल्ह्यासाठी काय केले! जिल्ह्याच्या विकासासाठी काय धोरण राबविले ते त्यांनी सांगावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिले आहे.

सिंधुनगरी येथील शरद कृषी भवनामध्ये केंद्रीय खादी ग्रामोद्योग मंत्रालयामार्फत नवउद्योजक व बचत गटांना मार्गदर्शन करणारी कार्यशाळा केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत शनिवारी झाली. त्यावेळी श्री. राणे बोलत होते.

कोकणी वैभव असलेला सिंधुदुर्ग जिल्हा काही वर्षांपूर्वी दरडोई उत्पन्नात फारच मागे होता. आताची परिस्थिती पाहता दरडोई उत्पन्नामध्ये सिंधुदुर्ग पुढे गेला आहे. जिल्ह्यातील एक तृतीयांश जमीन शेती बागायती खाली आहे. परंतु दोन तृतीयांश जमीन पडीक आहे. पडीक जमिनीचा वापर करून उद्योजकांनी केरळ, आसाम राज्यातील उद्योग व्यवसायाप्रमाणे उद्योग करावेत. स्वतःचे उत्पन्न वाढविताना येथील उद्योग व्यवसायाला चालना देऊन सिंधुदुर्ग जिल्हा श्रीमंत करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन या निमित्ताने नारायण राणे यांनी केले.

मी राजकारणात असलो तरी ९०च्या दशकापासून माझा सुरू केलेला साधा हॉटेल व्यवसाय आता पंचतारांकित हॉटेलपर्यंत पोचविला आहे. माझे स्वतःचे व्यवसाय सांभाळत असतानाही या जिल्ह्यातील नागरिकांनी मला प्रेम दिले, आदर केला. राजकारणात विविध पदावर काम करण्याची मला प्रेरणा दिली. याच कृतज्ञतेच्या भावनेतून पुण्या मुंबईसारख्या शहरात हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, इंजिनियर कॉलेज सुरु न करता या जिल्ह्यात सुरू करून जिल्ह्यातील नागरिकांना महत्त्वाच्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या.

आपण मुख्यमंत्री असताना या जिल्ह्यात एकाच वेळी २८ पुल निर्माण करून नागरिकांना मोठी सुविधा निर्माण केली होती. हा जिल्हा कायमचा टँकर मुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील धरणांवर विशेष लक्ष देत ती कामे पूर्ण झाली व हा जिल्हा कायमचा टँकर मुक्त केला. हे या जिल्ह्यातील नागरिकांसाठी मी केलेले काम आहे, असेही नारायण राणे म्हणाले.

भाडोत्री माणसांकडून टीका म्हणजे मर्दानगी नव्हे

भास्कर जाधव सारखे भाडोत्री माणसे आणून टीका करणे म्हणजे मर्दानगी नव्हे! भास्कर जाधव जेव्हा निवडणुकीला उभे होते तेव्हा निवडणुकीसाठी माझ्याकडे पैसे मागितले व त्यावेळी मी त्यांना पंधरा लाख दिले. तेही त्यांनी मला परत न करता माझ्यावरच टीका करणे हे अति झाले आहे. त्याचा बंदोबस्त आपण करूच, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -