Monday, May 12, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Sameer Wankhede : ‘ईडी’कडून मनी लाँड्रिंगप्रकरणी वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल

Sameer Wankhede : ‘ईडी’कडून मनी लाँड्रिंगप्रकरणी वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली : एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) आता ईडीच्या रडारवर आले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगानेच ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने वानखेडे आणि इतरांविरुद्ध कार्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी भ्रष्टाचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.


बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ऑक्टोबर २०२१ मध्ये अमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र कालांतराने त्याला क्लीन चीट देण्यात आली होती. या प्रकरणानंतर वानखेडे यांच्यावर मात्र अनेक आरोप केले जात होते.





याप्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने मागील वर्षी मे महिन्यात गु्न्हा दाखल केला होता. त्यानंतर आता ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर समन्स पाठवून त्यांना चौकशीसाठीही बोलवण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. ईडीच्या या कारवाईविरोधात समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे समजते.


कॉर्डेलिया क्रूज शिपवर रेव्ह पार्टी सुरू असताना तिथे अंमली पदार्थ असल्याची माहिती वानखेडेंच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून त्यांनी या शिपवर धाड टाकली होती. ऑक्टोबर २०२१ मध्ये कार्डिलिया क्रूजवर छापा टाकला गेला त्यावेळी समीर वानखेडे मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मध्ये झोनल डायरेक्टर या पदावर कार्यरत होते. यावेळी आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणातून मुक्त करण्यासाठी त्यांनी शाहरुख खानकडे लाच मागितल्याचा आरोप असून समीर वानखेडे यांच्यासह आणखी चार जणांवर ठपका ठेवण्यात आला होता.


सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात समीर वानखेडे यांची आधीच चौकशी झाली आहे. वानखेडे यांनी सीबीआयचे आरोप फेटाळून लावले होते. सीबीआयकडून कारवाई न होण्याबाबत याअगोदरच उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा दिलेला आहे. मात्र आता ते ईडीच्या रडारवर आले आहेत.

Comments
Add Comment