Sunday, July 21, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यचिंता नको, बिनधास्तपणे परीक्षा द्या...

चिंता नको, बिनधास्तपणे परीक्षा द्या…

रवींद्र तांबे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे या स्वायत्त संस्थेच्या वतीने नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी आणि बारावीच्या वर्षातून दोनदा परीक्षा घेतल्या जातात. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी (कोकण) ही नऊ विभागीय मंडळे आहेत. फेब्रुवारी – मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षांचा विचार करता सध्या बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून २० फेब्रुवारीला संपतील. त्यांनतर बारावीची २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत
लेखी परीक्षा होईल.

दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा शनिवार १० फेब्रुवारी सुरू होत असून त्या २९ फेब्रुवारीपर्यंत चालतील. त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत असणार आहे. त्यासाठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनातील चिंता आपोआप दूर होईल. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा संभ्रम मनात निर्माण करू नये. यासाठी वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल, तर कोणत्याही प्रकारचे दडपण विद्यार्थ्यांच्या मनावर येणार नाही. तेव्हा हसत हसत मनमोकळेपणे बोर्डाच्या परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. या वेळच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षा केंद्रांवर अर्धा तास अगोदर यावे लागणार आहे. म्हणजे वेळेच्या अगोदर अर्धा तास विद्यार्थ्यांनी येणे बंधनकारक करण्यात आले आहे. याची संबंधित विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी. त्यामुळे पेपर लिहिण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आराम मिळेल.

परीक्षा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षेच्या शेवटी दहा मिनिटे अधिक वेळ दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर जावे लागणार आहे. तशी आगावू पूर्ण माहिती विद्यार्थ्यांना परीक्षा मंडळाकडून दिली जाणार आहे. यावेळी वेगवेगळ्या शाळेतील किंवा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी एकत्र बसविण्यात येणार आहेत. एकाच शाळेतील किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी एकत्र बसविले जाणार नाहीत. जरी मागे-पुढे इतर शाळेतील अथवा महाविद्यालयातील विद्यार्थी असले तरी घाबरण्याचे मुळीच कारण नाही. कारण आपण वर्षभर अभ्यास केलेला असतो. तेव्हा प्रश्नपत्रिका हातात आल्यावर वेळेकडे लक्ष देत वेळेत प्रश्नपत्रिका सोडवावी. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड करू नये. आपली ज्या विषयाची परीक्षा असेल त्याची रंगीत तालीम वर्षभर झालेली आहे. त्यामुळे एकूण किती गुणांची प्रश्नपत्रिक आहे? प्रश्नांचे स्वरूप कसे असेल? प्रत्येक प्रश्नांला किती गुण असलीत? किती शब्दांत उत्तर लिहावे? अपेक्षित उत्तर काय लिहावे? उत्तरांची मांडणी कशी करावी याविषयी पूर्ण माहिती शिक्षक व मार्गदर्शक विषय तज्ज्ञांनी दिलेली आहे. याचा पुरेपूर फायदा घेत बोर्डाच्या परीक्षेला कोणत्याही प्रकारचे टेन्शन न घेता जायला हवे. ते सुद्धा कॉपीमुक्त परीक्षा देण्यासाठी.

बऱ्याच वेळा एकाच शाळेचे किंवा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे नंबर एका पाठोपाठ आल्याने एकमेकांचे बघून लिहिणे किंवा सांगणे असे प्रकार होऊ शकतात. त्यासाठी सरमिसळ विद्यार्थ्यांना बसविण्यात येणार आहे. त्यामुळे नकळत कॉपी केसला सुद्धा आळा बसेल असे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते. तेव्हा कॉपी केस मुक्त परीक्षा घेणे तसेच परीक्षेला विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मानसोपचार तज्ज्ञांची व्याख्याने, त्याचप्रमाणे त्यांचे विद्यार्थ्यांना व्यक्तिगत मार्गदर्शन देणे गरजेचे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करता दहावी आणि बारावीच्या प्रत्येक केंद्रावर मानसोपचार तज्ज्ञांची परीक्षा कालावधीत नियुक्ती करावी. म्हणजे विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या अचूक आधार मिळेल.

सध्या बोर्डाच्या परीक्षा तोंडावर आल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर अभ्यासाचा ताण वाढला आहे. त्याचमुळे ६ फेब्रुवारीच्या रात्री परभणीतील सेलू शहरातील १२ वी विज्ञान शाखेची विद्यार्थ्यांनी पूनम पवार हिने आत्महत्या केली. त्यामुळे मला तर व्यक्तिश: वाटते की, प्रत्येक विद्यालयात मानसोपचार तज्ज्ञांचे किमान तीन महिन्यांतून एकदा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन द्यावे. म्हणजे विद्यार्थ्यांचा ताण कमी होईल; परंतु जे विद्यार्थी तणावाखाली वावरत असतात त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढण्याला मदत होईल.

काही विद्यार्थी असे असतात की, वर्षभर व्यवस्थित अभ्यास करतात. मात्र वार्षिक परीक्षेची तारीख जवळ आली की, दबावाखाली दिसतात. आपण वर्षभर अभ्यास चांगला केला. वर्षभरातील ज्या परीक्षा घेण्यात आल्या त्यामध्ये चांगल्या प्रकारे गुण मिळविले. आता काही दिवसांवर परीक्षा आलेली आहे. प्रश्न कोणते विचारले जातील? कठीण प्रश्न तर विचारले जाणार नाहीत ना? मी वेळेत प्रश्नपत्रिका सोडवू शकेन काय? असे अनेक प्रश्न मनात निर्माण होत असतात. यासाठी मोकळेपणाने वागले पाहिजे. अभ्यासाबरोबर खेळ आणि टीव्हीवरील एखादा आपल्या आवडीचा कार्यक्रम पाहावा. चांगल्या मित्रांच्या सहवासात थोडा वेळ गप्पा-गोष्टी कराव्यात म्हणजे आपल्या मनावरील दडपण कमी होण्यास मदत होते. तेव्हा दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेची विद्यार्थ्यांनी चिंता न करता बिनधास्तपणे परीक्षा दिली पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -