शिशिर शिंदे(माजी आमदार)
ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलाचा तो कोविड वॉर्ड. एका विशेष खोलीत तत्कालीन शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतेच दाखल केले होते. कोविड, चार दिवस अंगावर काढल्यामुळे श्वास जोरात लागला होता. दोन निष्णांत डॉक्टर्स अनुभवी नर्सेससह वैद्यकीय उपकरणांच्या सहाय्याने प्राणवायू पातळी, ब्लड प्रेशर, ताप, हार्ट रेट आदी नोंदी घेत होते. डॉक्टरांनी तातडीने ऑक्सिजन मास्क, पेशंट एकनाथ शिंदेंच्या तोंडावर लगबगीने चढवला. जेमतेम १० मिनिटे झाली होती. डाव्या हाताला सलाईन होते. तेव्हढ्यात, चळवळ्या शिवसैनिक एकनाथजीने उजव्या हाताने तोंडावरचा O_{२} मास्क डॉक्टरांचा विरोध डावलून बाजूला केला. स्वीय सहाय्यक व एकनाथजींची सावली ठरलेल्या प्रभाकर काळे यांना लगेच पाचारण केले गेले. प्रभाकर काळे, बेडरपणे धावत त्या खोलीत शिरला. एकनाथजींनी शरीरातील असलेला शिल्लक जोर लावला, पण आवाज नाजूक होता.
कोविड वॉर्डातील त्या बेडवर हळुवार पण ठाम आवाजात ऑर्डर सुटली. “प्रभाकर त्या प्रवीण तांबेच्या आई-वडिलांना ॲडमिट केले आहे. त्यांना मदत कर. राजेश देसाईची बहीण खूपच सीरिअस आहे. राजेशच्या घरी ६ इंजेक्शने तसेच पैसे पोहोचव. कोपरीतल्या कॅटररचे १० दिवसांचे बिल बाकी आहे, ते लगेच पोहोचव. भांडुपला पन्नालाल कंपाऊंमधील सेफ लाइफमधून निदान ३०० रेमडिसीवीर घेऊन ये. नरेश म्हस्केला सांगून डॉक्टरांकडे वाटप कर. आपल्या चारही ॲम्ब्युलन्सच्या डिझेल टाक्या पूर्ण भरून घ्या…” यादी संपत नव्हती. पेशंट शिंदे हे तापाने लालभडक झालेले होते. खोकल्याची वाढलेली उबळ सुरू झाली. परत श्वास लागला. डॉक्टरांनी जबरदस्तीने पुन्हा ऑक्सिजन मास्क एकनाथजींच्या तोंडावर चढवला व त्यांना थोडे दटावत बोलण्यास बंदी केली. इथे निडर छातीचा प्रभाकर काळे व सोमनाथ साळवी फक्त तोंडाला मास्क लावून बेधडकपणे शिंदेंच्या कोविड रूममध्ये घुसले होते.
कोविड पेशंट एकनाथजींची प्रकृती गंभीर होती, पण त्याही अवस्थेत कार्यकर्ते म्हणजेच श्वास समजणारे एकनाथ शिंदे स्वतःच्या प्रकृतीपेक्षा कार्यकर्त्यांचीच काळजी वाहताना ज्युपिटरच्या स्टाफने पाहिले. समाजसेवेचा अंगार त्यांच्या डोक्यात फुललेला होता. त्याच्यापुढे बाकी सर्व गौण होते. कोविड काळात ठाण्याहून मुलुंडच्या प्लॅटिनम हॉस्पिलला येत होतो. वाटेत टिपटॉप प्लाझासमोर चार मोठे ट्रक झेंडे लावून उभे होते. टिपटॉपचे मालक रोहित शहा एका ट्रकला खेटून रस्त्यावरच ७/८ शिवसैनिकांच्या गराड्यात दिसले. मी रोहित शहांना भेटलो. त्यांनी बाजूला घेतले. म्हणाले, “शिशिरभाई या चारही ट्रकमध्ये आटा, बटाटे, तांदूळ, कांदे व तेलाचे डबे आहेत. टीप-टॉपचे पाचही किचन १८-१८ तास सुरू असतात.
एकनाथ शिंदे साहेबांनी गेले तीन हफ्ते आमची पाचही किचन बुक केली आहेत. ढोकाळी, लोकमान्य नगर, घोडबंदर रोड, कोपरी, आनंद नगर, वागळे इस्टेट या सर्व भागांत रोज दीड लाख पाकिटांत जेवण पॅक करून शिंदेसाहेबांच्या शिवसैनिकांद्वारे गरीब कुटुंबांना तसेच रिक्षावाले, बंद गॅरेजवाले यांना घरपोच पाठविले जात आहेत.” माझ्या तोंडाचा ‘आ’ वासला गेला. ते म्हणाले, “ही फक्त टिपटॉपची बात आहे. ठाण्यातील ६ वेडिंग हॉलची अशीच बिझी परिस्थिती आहे. मायग्रंट प्रवासी कामगारांनाही वडापाव, पाण्याच्या बाटल्यांचे हायवेवर रोज दुपारी, संध्याकाळी वाटप होते.” रोहितभाई पुढे म्हणाले, “आजपर्यंत खूप राजकीय नेते पाहिले, पण गरिबांसाठी एव्हढे काम करणारे हे लोकनेते शिंदेसाहेब एकमेवच. रोहितभाई भावनाशील झाले होते. माझे डोळेपण एकनाथजींच्या संवेदनशीलतेने डबडबले होते.”
धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या तालमीत तयार झालेले, त्यांचे पट्टशिष्य एकनाथजी शिंदे राजकीय जीवनात अनेक पदावर स्वार झाले. पण हा राजकीय नेता मनाने अत्यंत संवेदनशील व दयाळू आहे. मुख्यतः त्यांचे हात इतरांच्या मदतीसाठी तत्पर असतात. सांगली, कोल्हापूरला पूरस्थितीत त्यांनी तब्बल चार दिवस कोल्हापुरात मुक्काम ठोकला. जेवण वाटप केलेच, पण पुराच्या पाण्यात सर्वस्व गमावलेल्या कुटुंबांना लाखभर चादरी, सतरंजींचे वाटप केले. नगरविकास मंत्री शिंदेंमधील ढाण्या शिवसैनिक, छातीचा कोट करून संकटांचा सामना करणारा शिवसैनिक उभ्या महाराष्ट्राने पाहिला. संवेदनशीलता आणि ठाम निर्णय घेण्याचा एकनाथजींचा विशेष गुणविशेष आहे. या शिवसेना नेत्याला झोप, विश्रांती, माहीतच नाही. संकट छातीवर झेलण्याचा त्यांचा स्वभाव आहे. प्रवासाचा मुळीच कंटाळा नाही. पायाला भिंगरी, छातीत ऊर्जा आणि मनात फायर… संकटाला ताकदीने भिडण्याची एकनाथ शिंदेंची शूर छबी उभ्या महाराष्ट्राने अनुभवली. बुलढाण्यात समृद्धी मार्गावर झालेला भीषण बस अपघातात कोळसा झालेले प्रवासी, नातेवाइकांचा आक्रोश शिंदेंनी धाव घेत समक्ष अनुभवला व मदतकार्य वेगाने सुरू झाले.
धुवांधार पावसात ईर्शाळ गडावर वेगवान वाऱ्यांशी झुंज देत हा बहाद्दर गिर्यारोहक जीव धोक्यात घालून प्रत्यक्ष अपघातस्थळी पोहोचला. अख्खा महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या भात्यासारख्या हलणाऱ्या भरदार छातीचा, पण धीरोदत्त राहिलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा अभिमान बाळगू लागला. संपूर्ण देशाने या पराक्रमाची नोंद घेतली. कौतुक केले. मराठी जनता धन्य झाली. (मुख्यमंत्र्यांच्या या वेड्या साहसाने मात्र लाखो शिवसैनिकांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी देव पाण्यात ठेवले होते). सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुर्घटनेची बातमी आली की, मुख्यमंत्र्यांचा फक्त पाहणी दौरा नसतो, तर ते माहिती घेऊन दुर्घटना स्थळी आवश्यक त्या यंत्रसामग्रीसह मनुष्यबळासोबत तातडीने धाव घेतात. महाराष्ट्राने हे चित्र पहिल्यांदाच पाहिले. सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी व संपूर्ण प्रशासन ते अगदी मदत कार्यकर्ते, कामगार त्यापासून स्फूर्ती घेऊ लागले.
महाराष्ट्र शासनाने शिवसेना-भाजप युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली अनेक कल्याणकारी ऐतिहासिक निर्णय घेतले. विकासकामांसह सभोवती कायम गर्दी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण पाहात असतो. गरिबांबद्दलची आस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त तोंडी व्यक्त केली नाही. प्रत्यक्ष कृतीने आदर्श निर्माण केला. ठाण्याला स्वतःच्या आईच्या नावाने उभे केलेले भव्य मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल अत्याधुनिक आहे. अत्यंत अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स व निष्णांत डॉक्टर्स तेथे आहेत. गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल लाखो रुपयांचे बिल आकारणारे कॉर्पोरेट हॉस्पिटल नव्हे, तर खऱ्या अर्थाने धर्मादाय हॉस्पिटल आहे. गरिबांना आधार आहे.
धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे स्मारक उभारण्यात सर्वोच्च शिवसेना पक्षश्रेष्ठींचा पाठिंबा तर नव्हताच, पण विरोध होता. पण धर्मवीरांच्या कट्टर शिष्यांनी एकनाथजींच्या नेतृत्वाखाली ठाण्यात दिघे साहेबांचे प्रेरणादायी शक्तिस्थळ जिद्दीने व परिणामांची पर्वा न करता उभारले. आज हजारो घराघरांत शिंदेसाहेबांच्या प्रतिमा अभिमानाने, भक्तिभावाने लावलेल्या दिसतात. शेताच्या मातीत राबणारा हा शेतकरी नेता महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून २१व्या शतकाशी नाळ जोडून आहे. समृद्धी महामार्ग, मुंबई, पुणे येथील मेट्रो विस्तार, कोस्टल रोड, अटल सेतू, नियोजित थीम पार्क हे महाराष्ट्राचे वैभव आहे. महिला शक्तीला विशेष चालना मिळाली.
फायर ब्रिगेड मुख्यमंत्रीजी, कायम गर्दीत असता तुम्ही… सतत गराडा असतो तुमच्याभोवती… विश्रांती मिळतच नाही. तुम्ही कार्याने भारलेले व सदैव चार्ज असणारे व न थकणारे नेते आहात. पण माणूस आहात… कामाचा अतिरेक करू नका. प्रकृती अत्यंत महत्त्वाची आहे. पंढरपूरची वारकऱ्यांची गर्दी अलोट असते. अखंड असते. पण रात्री मंदिरांचे दरवाजे बंद होतात. जो नियम देव पाळतात, तो तुम्ही पण पाळायला हवा. वयाला रिमोट कंट्रोल नसतो. २४ तासांत काही तास सक्तीची विश्रांती घ्या. ताजेतवाने होऊन पुन्हा कामाला लागा. महाराष्ट्राच्या मातीचे पांग फेडण्याची तुमची जिद्द अफाट आहे. अनंत ऊर्जा आहे. शिवसैनिक म्हणून तुम्हाला हे सांगण्याचा पूर्ण अधिकार मला आहे, असे मी समजतो.
|| जीवेत शरदः शतम ||
शतायुषी व्हा! शतायुषी व्हा!! शतायुषी व्हा…!!!
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…