अनेक आया आपल्या बाळाला वाईट नजरेपासून वाचविण्यासाठी काळा तिट लावतात. काळा रंग हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. जेव्हा आई काळजीने बाळाला टिका लावते तेव्हा प्रेम, काळजी यांसह एक सकारात्मक कवच म्हणून ती त्याकडे पाहात असते. जेव्हा कुणीतरी बाळाकडे वाईट नजरेने पाहते तेव्हा हा टिका संरक्षण कवच म्हणून काम करतो असे म्हटले जाते. वाईट नजरेवर काळा रंग प्रभावी ठरतो. हे सर्व येथे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गुरुवारी राज्यसभेत बोलताना देशाच्या प्रगतीला नजर लागू नये यासाठी काँग्रेसने काळा टिका लावल्याचा जोरदार टोला लगावला. मोदी सरकारने ज्या ज्या वेळी चांगल्या योजना, प्रकल्प आणले त्या प्रत्येक वेळी काँग्रेसने त्यांना विरोध केला. प्रसंगी कडाडून टीकाही केली आणि या योजना कशा तकलादू आहेत हे सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. काँग्रेसच्या नरात्मकेवर मोदींनी हल्लाबोल केला. त्याचवेळी डॉ. मनमोहन सिंग यांचे त्यांनी कौतुकही केले.
अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगल्याचे सतत पाहायला मिळत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दोन्ही गटांकडून जोरकसपणे आपली बाजू मांडली जात आहे. राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या भाषणावरील आभार प्रस्तावाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरूंवर चौफेर हल्ला केला. त्या आनुषंगाने त्यांनी काँग्रेसला लक्ष्य करीत चहुबाजूंनी घेरले. त्याचवेळी राज्यसभेत कार्यकाळ संपलेल्या ५६ खासदारांचा निरोप समारंभ गुरुवारी पार पडला. त्यानिमित्ताने या खासदारांच्या आभार प्रदर्शनाची चर्चा सभागृहात पार पडली. या चर्चेमध्ये दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांच्या बाबतीत आभारप्रदर्शन करताना आपापली भूमिका मांडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे भरभरून कौतुक केले. मोदी म्हणाले की, जेव्हा जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल, तेव्हा तेव्हा मनमोहन सिंग यांची खूप आठवण येईल. आम्हाला मनमोहन सिंग यांचे मार्गदर्शन मिळाले.
मनमोहन सिंग हे एका सजग खासदाराचे उदाहरण आहेत. खासदार अनमोल असा वारसा सोडून जातात. मनमोहन सिंग यांचे या सभागृहात विशेष योगदान आहे. खासदारांचा कधीच निरोप होत नाही. मनमोहन सिंग हे ६ वेळा राज्यसभा खासदार राहिले. वैचारिक मतभेद होते पण त्यांचे योगदान मोठे आहे. सभागृहाला त्यांनी अनेकदा मार्गदर्शन केले आहे. जेव्हा खासदारांच्या योगदानाचा उल्लेख होईल तेव्हा मनमोहन सिंग यांची चर्चा होईलच. डॉ. मनमोहन सिंग यांनी दीर्घकाळ सभागृह आणि देशाला मार्गदर्शन केले आहे. यासाठी ते कायम स्मरणात राहतील. देशासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. त्या आधी पीएम मोदींनी राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ४० जागाही जिंकणे कठीण असल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच राष्ट्रपतींच्या भाषणावरील आभार प्रस्तावाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि काही प्रमाणात इंदिरा गांधी यांच्यावरही टीका केली होती. पण आज राज्यसभेत मात्र वेगळेच आणि सुखावणारे चित्र पाहायला मिळाले. कारण मोदींनी ज्येष्ठ खासदार मनमोहन सिंग यांच्याबाबत गौरवोद्गार काढले.
पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंग हे व्हीलचेअरवर बसून राज्यसभेत आले होते त्या प्रसंगाचाही यावेळी आवर्जुन उल्लेख केला. डॉ. मनमोहन सिंग हे व्हीलचेअरवरून मतदानासाठी आले, त्यांनी मतदान केले. लोकशाहीला ताकद देण्यासाठी ते आले होते. एक खासदार आपल्या जबाबदाऱ्यांसाठी किती जागरूक आहे याचे हे प्रेरणादायी उदाहरण होते, अशा शब्दांत मोदींनी त्यांचे मोठेपण विषद केले. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपाकडून या प्रकारावर ‘याद रखेगा देश, काँग्रेस की ये सनक’, अशा परखड शब्दांत टीका करण्यात आली होती. काँग्रेसने आपली बेईमान आघाडी जिवंत ठेवण्यासाठी एका माजी पंतप्रधानांना रात्री उशिरापर्यंत अवघडलेल्या स्थितीत व्हीलचेअरवर बसवून ठेवले… असा शब्दिक हल्ला त्यावेळी करण्यात आला होता. मात्र, मोदींनी राज्यसभेत मनमोहन सिंग यांच्या या कृतीबाबत, लोकशाहीला ताकद देण्यासाठी ते आले होते अशा शब्दांत गौरवोद्गार काढले. काँग्रेसने त्या कालखंडात आम्हाला खूप काही शिकवले. कधी कधी फॅशन परेडचे दृश्यही बघायला मिळाले. काळ्या कपड्यांमध्ये खासदारांची फॅशन परेड बघायला मिळाली. जेव्हा कोणतेही चांगले काम होते तेव्हा काळी तिट लावली जाते, अशी मिश्कील टीका त्यांनी केली. कार्यकाळ संपणारे खासदार नव्या आणि जुन्या संसद भवनाच्या आठवणी घेऊन जात आहेत.
कोरोना काळात कोणत्याही खासदाराने देशाचे काम थांबू दिले नाही. सदनात येऊन चर्चा केली आणि देशाची सेवा केली. सद्गुणी लोकांसोबत राहून आपल्यातील गुणही वाढले आहेत. नद्यांमधील पाणी जोपर्यंत वाहत राहते तोपर्यंतच ते पिण्यायोग्य राहते. पण नदी कितीही गोड असली तरी समुद्राला मिळताच ती पिण्यास अयोग्य होते, हा संदेश प्रत्येकासाठी प्रेरणादायी असेल असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. लोकसभा दर पाच वर्षांनी नव्या रंगात सजते. पण राज्यसभा दर दोन वर्षांनी नव्या सदस्यांच्या येण्याने एक नवी ऊर्जा प्राप्त करते. त्यामुळे दर दोन वर्षांनी या सभागृहातून सदस्य बाहेर पडताना अनेक चांगल्या आठवणी मागे सोडून जातात. काही सदस्य सभागृह सोडून जात आहेत. असे होऊ शकते की काही लोक परत येण्यासाठी जात आहेत. तर काही लोक कायमचे जात असतील. पण आपल्या या सहकाऱ्यांचे योगदान ध्यानी घेऊन त्यांच्यावर कधी टीका केली असेल तर ते विसरून कौतुकाचा वर्षाव करणे हे जिवंत लोकशाहीचे लक्षण असल्याचे मोदींनी आपल्या कृतीने यावेळी अधोरेखित केले, असेच म्हणावे लागेल.