Monday, July 22, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीनामस्मरणापरते दुसरे हित नाही...

नामस्मरणापरते दुसरे हित नाही…

  • अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

एक गृहस्थ मला भेटले. ते म्हणाले, “मला देव पाहावासा वाटतो. तुम्ही पाहिला आहे का?” मी म्हटले, “पाहिला आहे.” त्यांनी विचारले, “तो मला दिसेल का?” मी म्हटले, “दिसेल, पण या डोळ्यांनी दिसणार नाही. देवाला पाहण्याची दृष्टी वेगळी आहे.” आज आमची विषयाची दृष्टी आहे. ती भगवंताची नाही. आपल्याला भगवंत पाहायचा असेल, तर त्याला एकच उपाय : भगवंताच्या नामात राहावे. नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. सगळ्यांना माझे सांगणे आहे; हे ऐकणे अत्यंत जरूर आहे. बरे! ऐकणे कशासाठी? तर मी बरोबर मार्गाने जातो आहे की नाही, ते कळण्यासाठी. पण नुसते ऐकून चालणार नाही. ऐकून कृती केली, तरच साधेल. ती तुम्ही करा. आचरणात आणलेले तेवढेच कामाला येईल. सगळ्यांनी नामस्मरण करा. नामस्मरणासारखा कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. जे सहज आपल्याजवळ आहे, अत्यंत उपाधिरहित आहे, जे कुणावर अवलंबून नाही, असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे. तेव्हा शुद्धतेने, शुद्ध आचरणाने जो ते घेईल, त्याचे राम खरेच कल्याण करील.

आपल्या गुरूने जे सांगितले ते सत्य मानावे. “या मार्गाने शंभर पावले गेलास, तर खजिना सापडेल.” असे गुरूने सांगितले, तर दुसऱ्या मार्गाने दोनशे पावले जरी गेला तरी त्याचा काय उपयोग? ‘मला सगुण साक्षात्कार व्हावा’ असे म्हणतो, पण प्रत्यक्ष बोलणारा, चालणारा सद्गुरू पाहून समाधान होत नाही, तर परमात्म्याचे दर्शन करून देऊन काय उपयोग? आंबा हवा असेल, तर कोय पेरल्याशिवाय कुठला मिळणार? सद्गुरूने जे सांगितले त्यापरते माझे काही हित आहे, हे मनातच येऊ नये. आपण खरोखरी सर्वस्वी त्याचे व्हावे. नामस्मरणापरते दुसरे हित नाही. माझ्या नामाने घरात आजारी पडलेला मनुष्य बरा व्हावा म्हणणे, म्हणजे त्या नामाचा विषयाकडे उपयोग नाही का केला? बरे झाल्यावर ज्याप्रमाणे आम्ही बाटलीतले औषध टाकून देतो, त्याप्रमाणे गरज संपली की आम्ही देवाला विसरतो. अमुक एक घडावे असे जिथे वाटते तिथे साधनात कमतरता आली. एका सद्गुरू वचनावर विश्वास ठेवला म्हणजे सुखदु:खाच्या गोष्टींचा मनावर परिणाम होत नाही. मोठा अधिकारी झाला तरी पोराबाळांबरोबर खेळताना ज्याप्रमाणे तो त्यांच्यासारखा होतो, त्याप्रमाणे व्यवहारात वागावे. आपण निर्लोभतेने वागावे. खेळात ज्याप्रमाणे आपण चुकू देत नाही, त्याप्रमाणे प्रपंचात करावे. प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा. त्याचा वास आत नसावा. आत फक्त भगवंताचा वास असावा.

गुरुचरणी अत्यंत विश्वास। आणि साधनाचा अखंड सहवास।
येथे प्रपंचाचा सुटला फास। हाच परमार्थाचा मार्ग आहे खास॥

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -