Saturday, June 29, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीसंसार गोड झाला पाहिजे...

संसार गोड झाला पाहिजे…

  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै

“पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे
कामक्रोध लोभ निमाले ठायीच, सर्व आनंदाची सृष्टी झाली
आठव नाठवे गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग
तुका म्हणे भाग्य या नाव म्हणिजे, संसारी जन्मिजे याचलागी”
शेंदे नावाचे जे फळ असते ते पिकते, तेव्हा गोड होते. ते आतून पिकते ना!!! बाहेरून पिकणे खरे नाही. ते आरोग्यालाही वाईट आहे. आतून पिकणे महत्त्वाचे. आतून पिकण्यासाठी काय केले पाहिजे? साधना आतून केली पाहिजे. संतांनी त्यासाठीच देवाचे स्मरण करायला सांगितले. संतांनी सांगितले आहे, “स्मरण देवाचे करावे”. स्मरण देवाचे करावे म्हणजे कोणाचे करावे हा प्रश्न आला. खरा परमार्थ कठीण होऊन बसलेला आहे. त्याचे कारण हेच आहे की, प्रत्येक शब्दाचा अर्थ बऱ्याच लोकांना माहीत नसतो. म्हणूनच परमार्थ कठीण होऊन बसलेला आहे. संसारात पडलेली माणसे जेव्हा परमार्थाच्या वाटेला जातात, तेव्हा त्यांची वाट लागते. म्हणून आम्ही काय सांगतो, “संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ”. संसार सुखाचा करणे म्हणजे पिकणे, गोड होणे. संसार गोड झाला पाहिजे. “पिकलिया शेंदे कडूपण गेले” गोड झाला पाहिजे. “एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणताती”. गोड म्हणजे God.

घाटावरचे लोक गोडला ग्वाड म्हणतात. तो शब्द जास्त बरोबर आहे. God कसा आहे? गोड आहे. तो गोड आहे हे कळायलासुद्धा त्याची प्रचिती यायला लागते. त्याची प्रचिती येण्यासाठी “स्मरण देवाचे करावे, नित्य नाम जपत जावे”. असे स्मरण नित्य होण्यासाठी नाम. नाम हे स्मरणासाठी आहे हे लक्षात ठेवायचे. असे नामाने स्मरण सोपे जाते.

किंबहुना नाम व स्मरण हे एकरूप आहेत. नाम घेतल्याबरोबर स्मरण होते व स्मरण झाल्याबरोबर नाम येते. बघा तुम्ही नाम घेतल्याबरोबर स्मरण आणि स्मरण झाल्याबरोबर नाम लगेच येते. ते एकरूप झालेले आहेत. सांगायचं मुद्दा देवाचे स्मरण केल्याशिवाय कसे होईल? देवाचे स्मरण कसे करायचे, किती करायचे, का करायचे हे सद्गुरू शिकवितात. सद्गुरू जे शिकवितात ते तू केले पाहिजेस. सद्गुरू जेव्हा शिकवितात तेव्हा तुम्हाला देवाचे स्मरण सहज होते. याचे कारण सद्गुरू जे शिकवितात ते सहज असते. साधना पण सहज असते.

ही साधना सद्गुरूंकडून शिकायची की नाही हे तू ठरव कारण, “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -