माझे कोकण: संतोष वायंगणकर
शिवसेना आणि कोकण यांचं एक अतुट असं नातं होतं. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना समर्थ साथ देत त्यांच्यासोबत उभा राहणारा कोकणवासीयच होता. मुंबईत शिवसेना बहरली ती कोकणातील ७०च्या दशकातील मुंबईकर तरुणांमुळेच. त्या काळातील शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक अशी एक वेगळी फळी शिवसेना वाढीचे काम करायची. महाराष्ट्राच्या मराठी मनाची अस्मिता असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कोकणवासीयांची नितांत श्रद्धा होती. अर्थात ती आजही शिवसेनाप्रमुखांप्रती श्रद्धा कायम आहे. शिवसेनाप्रमुखांचा शब्द शिवसैनिक तळहातावर झेलायचा. कारणही तसेच होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. मिनाताई ठाकरे शिवसैनिकांच्या ‘माँ साहेब’ शिवसैनिकांना तितकच जपत असत. प्रेम, आपुलकी, माया आणि विश्वास तसाच होता. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे शिवसैनिक अनेक होते. कोकणाचे आणि शिवसेनेचे त्याकाळी एक वेगळं नातं यामुळेच घट्ट झाले होते. कोकणातून मुंबईत नोकरी, व्यवसायासाठी आलेले असंख्य बेकार तरुण ‘जय महाराष्ट्र’ म्हणत शिवसैनिक झाले. कोकणातील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील तरुण शिवसेना या चार अक्षरांशी जोडला गेला. अनेकांच्या आयुष्याचा तो भाग बनला. कोकणातून मुंबईत जाऊन शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार अशा कितीतरी पदांवर विराजमान झालेले शिवसैनिक आपण पाहिले आहेत. मुंबई महानगरपालिकेतील त्यावेळच्या २७६ नगरसेवकांपैकी ८० टक्के नगरसेवक कोकणातील सामान्य कुटुंबातील होते. शिवसेनेचे त्याकाळचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे ब्रिद वाक्य होतं. रक्तदान हे तर शिवसैनिकांचं मोठं समाजकार्यच होतं आणि समाजाशी असलेली बांधिलकी ही रक्ताच्या नात्याशी होती. रात्री-अपरात्री कोणत्याही प्रसंगात मुंबई शहरात किंवा गावातील वाडी-वस्तीवर शिवसैनिक धावून जायचा.
शिवसेनेच्या शिबिरातून मराठी अस्मिता आणि सामाजिक काम यावर मार्गदर्शन व्हायचे. लोकाधिकार समितीच्या माध्यमातून हजारो तरुणांना बँकिंगसारख्या क्षेत्रात मार्गदर्शन देऊन काम दिलं गेलं. शिवसेनेत सामाजिक बांधिलकी आणि जाणिवेने काम करणारे दत्ताजी साळवी, प्रि. वामनराव महाडिक, मनोहर जोशी, दत्ताजी नलावडे, नारायण राणे, लीलाधर डाके, शरद आचार्य, मधुकर सरपोतदार, सुधीर जोशी, गजानन कीर्तीकर असे बिनीचे शिलेदार होते. यांची भाषणं म्हणजे विचारांचा अंगारा होता. शिवसेनेचे महाबळेश्वर येथील अधिवेशनापर्यंत शिवसेनेचा कारभार दृष्ट लागण्यासारखा होता; परंतु महाबळेश्वरच्या शिवसेनेच्या अधिवेशनात राज ठाकरेंना डावलून उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली आणि शिवसेनेत गटबाजीने डोकं वर काढलं. ते नंतरच्या काळात वाढत गेलं. याला खतपाणी घालणारे काही सावलीसारखे अवती-भवती असणारे होतेच. यामुळेच मधल्या काही काळात नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांनी शिवसेना सोडली पाहिजे अशी व्यूहरचना केली गेली. कंटाळलेले अनेकजण सोडून गेले.
स्वत:चं महत्त्व वाढवण्यासाठी निष्ठावंतांना डावलणे, त्यांच्यावर अन्याय करण्यात एक चौकड कार्यरत झाली. शेवटी व्हायचे तेच घडले. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार, अनेक नगरसेवक, पदाधिकारी यांची शिवसेना राहिली आणि पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांच्या (उबाठा) गटाची शिवसेना झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कोकणचं एक वेगळं नातं होतं. ते नातं नंतरच्या काळात उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊनही त्यांना टिकवता आले नाही. मुख्यमंत्री होऊनही उद्धव ठाकरे यांनी कोकणसाठी काहीही दिले नाही. मागच्या आठवड्यातच उद्धव ठाकरे यांनी कोकणचा दौरा केला. या कोकण दौऱ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची भूमिका काय आहे. कोकणच्या विकासात शिवसेनेच्या खासदार, आमदारांनी काय केलं आणि भविष्यात कोकणच्या विकासासाठी शिवसेना काय करणार? यावर बोलणं अपेक्षित होतं; परंतु खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, आ. भास्कर जाधव आणि दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांच्या भाषणात केंद्रीय मंत्री नारायण राणे व राणे परिवारावर टीका असा एकमेव कार्यक्रम या दौऱ्यात होता.
आ. भास्कर जाधव कणकवलीच्या जाहीर सभेत काय बोलत होते हे बहुधा त्यांचं त्यांनाच कळत नसावं. उबाठाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना बरं वाटावं म्हणून खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक आणि आ. भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका हा एककलमी कार्यक्रम नेहमीप्रमाणे पार पडला. खा. विनायक राऊत यांना गेल्या दहा वर्षांत कोणती विकासकामे केली हे सांगण्याची, मांडण्याची संधी होती; परंतु गेल्या दहा वर्षांत नारायण राणे यांच्यावर फक्त टीका हीच काय ती कामगिरी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, इतके हे वास्तव आहे. विकास प्रकल्पांना विरोध आणि स्वत: विकास प्रकल्प आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न नाहीत. त्यामुळे मग राणेंवर बोललं की, न्यूज व्हॅल्यू निर्माण होते. त्यामुळे ती कामगिरी अचूक पार पाडली. उबाठा सेनेच्या प्रमुखांचा उद्धव ठाकरेंचा हा दौरा ना कोकणवासीयांना भेटण्याचा झाला की ना कोकणवासीयांना आनंद देणारा ठरला. कार्यकर्त्यांना बळ देणे तर फार दुरचेच… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं असलेलं एक हृदयातलं नातं कायमच राहील. मात्र, या नात्यात उबाठाचे उद्धव ठाकरे कुठेच दिसत नाहीत.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…