शिक्षणशास्त्रात शिकवलं जातं की, ‘कळणाऱ्या गोष्टीतून न कळणाऱ्या गोष्टीकडे, सोप्याकडून कठिणाकडे शिक्षकाने विद्यार्थ्यांना न्यावं. या पद्धतीमुळे अवघड वाटणारी शिकवण सहजसोपी होते. ज्ञानदेव हेच कार्य ‘ज्ञानेश्वरी’तून करीत आहेत अविरतपणे! ‘कळणं’ आणि ‘वळणं’ अशा दोन पायऱ्या असतात. ज्ञानदेव श्रोत्यांना ‘कळेल’ असं सांगतात. ते ‘वळेल’ म्हणजे त्यांच्या कृतीत उतरेल अशा पद्धतीने मांडतात.
‘कोशकिडा आवेशाने आपले घरटे बांधू लागला म्हणजे ज्याप्रमाणे आपल्यास बाहेर निघण्याला किंवा आत प्रवेश करण्याला वाट आहे किंवा नाही इकडे लक्ष न देता आत कोंडला जातो,’ (ओवी क्र. २८१)
‘अथवा आपण दिलेले भांडवल वसूल होईल किंवा नाही हा पुढील विचार न पाहता मूर्ख मनुष्य चोरास कर्जाऊ पैसे देतो..’ (ओवी क्र. २८२)
‘कां दिधलें मागुती येईल।
कीं नये हें पुढील।
न पाहाता दे भांडवल।
मूर्ख चोरां ॥’
हा दाखला देत आहेत आपले माऊली. किती आश्चर्य वाटले ना! ज्ञानेश्वरीतील सोळाव्या अध्यायात दैवी संपत्ती सांगितल्यानंतर ज्ञानदेव वळतात ‘आसुरी संपत्ती’च्या वर्णनाकडे. श्रीकृष्णमुखातून अर्जुनाला याविषयीचा उपदेश करताना आलेला हा व्यावहारिक दाखला आहे. हा दृष्टान्त केवळ अर्जुनापुरता राहात नाही, तर आपण साऱ्या वाचकांना शहाणं करतो, अर्थभान देतो, अर्थज्ञान देतो. ज्ञानेश्वर कवी म्हणून एकीकडे निसर्गातील सुंदर, तरल दृष्टान्त देतात. त्याचवेळी संसार न करता सांसारिक, व्यावहारिक दाखला देतात. हे त्यांचे कवी म्हणून, तत्त्वज्ञ म्हणून, समाजसेवक म्हणून सामर्थ्य आहे.
हा दाखला आला आहे ‘अशुचि’ किंवा ‘अपवित्रता’ या दोषाचं वर्णन करताना! मूळ भगवद्गीतेत याविषयी व्यासमुनींनी लिहिलेलं आहे ते. मराठीत त्याचा असा अर्थ – ‘आसुरी संपत्तीच्या लोकांना कोणते काम करावे आणि कोणते करू नये हे समजत नाही. त्यांच्या ठिकाणी शूचिर्भूतपणा, आचार व सत्यही नसतात.’ माऊली याविषयी काय लिहितात? तर, ‘पुण्य करण्याविषयी प्रवृत्ती आणि पाप न करण्याचा निषेध याविषयी त्यांच्या अंतःकरणात काळोख असतो? ओवी क्र. २८१. काळोख किंवा अंधार या दाखल्यातून ज्ञानदेव अज्ञानी जनांची अवस्था नेमकी साकारतात.
पुढे येणारा दृष्टान्त कोशकिड्याचा! तो किती नेमका आहे! कोशकिडा हा अत्यंत लहान असा किडा, कोशात राहणारा! हे आसुरी लोक जणू किड्याप्रमाणे क्षुद्र जीव! किडा ‘जसा कोशात खूश’ तसे हे त्या वाईट मार्गात आनंदात आहेत. कोशातून बाहेर येणं कठीण त्याप्रमाणे माणूस एकदा आसुरी मार्गाकडे वळला की त्यातून निघणं कठीण! म्हणून जाऊच नये या मार्गाला! हे यातून सुचवलेलं आहे.
हा अविचार स्पष्ट करण्यासाठी दिलेला पुढचा दाखला आपण आधी पाहिला. तो आहे मूर्ख माणसाचा. चोराला पैसे कर्जाऊ देणं हा किती वेडेपणा आहे हे सामान्यांना सहज कळतं. ह्या दोषांच्या आहारी जाणं तितकंच मूर्खपणाचं. म्हणजे एका कळणाऱ्या सोप्या दृष्टान्तातून ज्ञानदेव वाचकांना कुठे नेतात? तर आसुरी संपत्ती (दोष) या लक्षणाकडे!
हीच तर ज्ञानदेवांची खासियत आहे. आसुरी संपत्ती किती वाईट, ही केवळ वर्णन करून कळणारी गोष्ट नाही. अशा व्यावहारिक दाखल्यामुळे हे दोष किती नुकसानकारक आहेत हे स्पष्ट होते. केवळ स्पष्ट होत नाही, तर ते ऐकणाऱ्यांच्या मनात ठसते.
आपण म्हणतो ‘कळणं’ आणि ‘वळणं’ अशा दोन पायऱ्या असतात. ज्ञानदेव काय करतात? श्रोत्यांना ‘कळेल’ असं सांगतात. ते ‘वळेल’ म्हणजे त्यांच्या कृतीत उतरेल अशा पद्धतीने मांडतात. शिक्षणशास्त्रात शिकवलं जातं की, ‘कळणाऱ्या गोष्टीतून न कळणाऱ्या गोष्टीकडे, सोप्याकडून कठिणाकडे शिक्षकाने विद्यार्थ्यांना न्यावं. या पद्धतीमुळे अवघड वाटणारी शिकवण सहजसोपी होते. ज्ञानदेव हेच कार्य करीत आहेत अविरतपणे! ‘ज्ञानेश्वरी’तून!
म्हणून आधी वंदू ‘ज्ञानदेवा’!?
manisharaorane196@gmail.com
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…
सध्या आयपीएलचा सीझन रंगात आला आहे. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून क्रिकेटप्रेमी टीव्ही किंवा मोबाईलसमोर ठाण मांडून…
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे मत मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI)…
मुंबई : शिक्षकांसाठी ड्रेसकोड ठरवण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा विचाराधीन आहे. प्रत्येक जिल्ह्याला…
काही दिवसांपूर्वी २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण झालं. त्यानंतर…