Monday, August 25, 2025

Gajanan Maharaj : संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज

Gajanan Maharaj : संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज
  • गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला

भाविक भक्त वाचक मंडळी, यापूर्वीच्या लेखापर्यंत श्री गजानन महाराजांच्या या रसाळ चरित्राचे अमृतपान आपण केले. या लेखमालेतील सर्व चारित्र कथेचे लेखन हे संतकवी दासगणू महाराजांनी ओविबद्ध केलेल्या “श्री गजाननविजय” या ग्रंथाला आधारभूत मानून केले आहे. अत्यंत प्रासादिक आणि रसाळ भाषेत दासगणू महाराजांनी हे चरित्र आपणा सर्व गजानन भक्तांना उपलब्ध करून दिले, ज्याद्वारे महाराजांच्या जीवन चरित्राची माहिती आम्हा सर्वांना मिळाली.

तसे तर श्री गजानन महाराजांबद्दल माहिती महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा सर्व भक्तांना आहेच. अनेक भक्तांना तर श्री महाराजांची प्रचिती नेहमीच येते. भाविक वाचकांना हा ग्रंथ मनापासून आवडतो. दासगणू महाराजांनी या ग्रंथरचनेमध्ये अनेक अलंकारांची मांडणी विशेषत्वाने केली आहे. तसेच ग्रंथांमधून खूप चांगल्या प्रकारे उपदेशपर मार्गदर्शन देखील अनेक ठिकाणी केल्याचे दिसून येते. जसे : सन्नीतीला सोडू नका। धर्म वासना टाकू नका। शत्रू न माना एकमेका। तरीच शक्ती वाढेल ॥१४॥ ऐसे तुम्ही वागल्यास। येतील चांगले दिवस। या वऱ्हाड प्रांतास। हे कधीही विसरू नका॥१५॥ श्री गजानन महाराजांचे दर्शन आणि ग्रंथाचे पारायण याबद्दल दासगणू महाराज सांगतात : एकदा तरी वर्षातून। घ्यावे गजाननाचे दर्शन। एकदा तरी पारायण। करा गजानन चरित्राचे॥१६॥ हा एकवीस अध्यायांचा। श्री गजानन विजय नावाचा। नैवेद्य एकवीस मोदकांचा। गजाननासी अर्पा हो॥१७॥ वा अध्याय साचार। माना एकवीस दुर्वांकुर। पारायणरूपे निरंतर। वाहाव्या गजाननासी॥१८॥ सदभाव जो मानवाचा। तोच दिवस चतुर्थीचा। प्रेमरूपी चंद्राचा। उदय झाला पाहिजे॥१९॥ मग या ग्रंथाचे अक्षर। एकेक हे दुर्वांकुर। अर्थ शब्दांचा साचार। मोदक समजा विबुध हो॥२०॥ किती सुंदर आणि अलंकारिक लिहिलंय.

हा ग्रंथ वाचत असताना किंवा याचे पारायण करताना आनंद तर मिळतोच मिळतो, सोबतच सुंदर आणि दिव्य अनुभूती देखील येतात. महाराज हे अत्यंत कनवाळू आणि भक्त वत्सल आहेत. ब्रह्मांडात कुठेही असले तरी त्यांची कृपादृष्टी सर्व भक्तांवर निरंतर असते.

पुढे ग्रंथाचा महिमा वर्णीताना दासगणू महाराज म्हणतात : श्री गजानन स्वामी-चरीत। जो नियमे वाचील सत्य। त्याचे पुरतील मनोरथ। गजानन कृपेने॥२३॥

याची प्रचिती भक्तजनांना नेहमीच येते. जे काही मागावयाचे आहे ते आई - वडिलांजवळच मागितले जाते आणि आई-वडील सुद्धा अत्यंत प्रेमाने आपल्या बालकांचे ते लडिवाळ मागणे मोठ्या प्रेमाने पुरवितात. हाच भाव मनी ठेवून प्रेमाने, निष्ठेने आणि विश्वासाने श्री गजानन महाराजांना मागावे. गुरू गजानन माऊली ते परिपूर्ण करतात.

हा ग्रंथ केवळ चिंतामणी। चिंतीले फळ देईल जाणी। दृढतर विश्वास असल्या मनी हे मात्र विसरू नका ॥२७॥

इथे दासगणू महाराजांनी सांगितले आहे की, “हे स्वामी समर्थ गजानना, आपण जशी प्रेरणा केलीत तसेच मी लिहिले आहे. शेगावच्या मठात काही कागदपत्र होते, ते रतनसा या महाराजांच्या निस्सिम भक्ताने मला आणून दाखवले. त्यांच्या आधारे हा ग्रंथ लिहिला आहे. माझ्या कल्पनेचा कोणताही उपयोग मी केला नाही.

आणि म्हणून काही अधिक न्यून असेल, तर श्रीगजानन महाराजांनी मला क्षमा करावी ही विनंती.”शके अठराशे एकसष्ठात प्रमाथी नाम संवत्सरात चैत्र महिन्यातील शुद्धपक्षात वर्षप्रतीपदेच्या दिवशी श्री गजानन विजय हा ग्रंथ शेगाव येथे कळसास गेला.

शुभं भवतू। हरिहरारर्पणमस्तू॥

क्रमशः

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >