
नेमकी काय चूक घडली?
सोलापूर : विद्यापीठात परिक्षांच्या वेळापत्रकात तसेच गुणपत्रिकेत चुका झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Solapur university) ओंगळ कारभाराची एक घटना समोर आली आहे. ५० गुणांच्या परिक्षेत विद्यार्थ्यांना चक्क ९० गुण किंवा ५० हून अधिक गुण मिळाल्याचे निकालात (Exam results) दिसत आहे. बीएससी सेमिस्टर तीनच्या (BSC Semister 3) निकालातील हा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थीही चक्रावले.
सोलापूर विद्यापीठाकडून १३ डिसेंबर २०२३ पासून २२ डिसेंबरपर्यंत बीएससी सेमिस्टर ३ च्या परीक्षा पार पडल्या. याचा निकाल समोर येताच सर्वजण चकीत झाले. काही विद्यार्थ्यांना ५० गुणांच्या परीक्षेत एका विषयाला ५० हून अधिक गुण दिले गेले. या निकालामध्ये विद्यापीठाने ४० गुणांचा लेखी पेपर तर १० गुणांची असाइनमेंट अशी एकूण ५० गुणांची परीक्षा घेतली होती.
या परीक्षेचा ५ फेब्रुवारीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, या निकालात झालेल्या चुकांमुळे विद्यार्थी गोंधळून गेले. क्लेरीकल चुकीमुळे हे घडल्याचं समोर आलं आहे. चूक लक्षात येताच विद्यार्थ्यांना गुणपत्रिका बदलून दिल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. दरम्यान, क्लेरीकल चुकीमुळे केवळ चार विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा प्रकार घडल्याची विद्यापीठ प्रशासनाने कबुली दिली आहे.