संजय राऊतने मोदीसाहेब आणि शहासाहेबांना बोलून स्वतःच्या अकलेचे तारे तोडू नयेत
नितेश राणे यांचा हल्लाबोल
मुंबई : ठाकरे गटाचे (Thackeray group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे अनेकदा बेताल वक्तव्ये करत असतात. त्यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) चोख प्रत्युत्तर देतात. संजय राऊत यांनी स्वतःचाच पक्ष उद्धवस्त केल्याचा उल्लेख नितेश राणे वारंवार करत असतात. शिवाय पवार काका-पुतण्यामध्येही संजय राऊत यांनी वितुष्ट निर्माण केले. यानंतर संजय राऊत आता आणखी एक भांडण लावण्याच्या तयारीत आहेत, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे. छत्रपती पिता-पुत्रांमध्ये खासदारकीसाठी वाद निर्माण करण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न आहे, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला.
संजय राऊत आणखी एक भांडण लावण्याच्या तयारीत आहे. राज्यसभेची चौथी की सहावी जागा ही छत्रपती शाहू महाराजांना द्यावी, जेव्हा या कार्ट्याला स्पष्ट माहित आहे की माजी खासदार छत्रपती संभाजीराजे जे ‘स्वराज्य’ नावाचा पक्ष चालवतात आणि त्यांचं नाव खासदारकीसाठी सतत चालतंय. पण त्यांच्याच घरात जायचं आणि त्यांच्याच वडिलांचं नाव चालवायचं आणि छत्रपती घराण्यातही वाद लावायचे, अशा प्रकारचं घाणेरडं आणि गलिच्छ राजकारण हा संजय राजाराम राऊत करत आहे.
संजय राऊतने स्वतःच्या पनवती स्वभावाचं खापर आमचे मोदीसाहेब, आदरणीय अमित शहा साहेब आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर फोडू नये. इलेक्शन कमिशनने नुसती आमदार आणि खासदारांची संख्या बघितली नाही पण आज तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये जा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही जिल्हाध्यक्षाला विचारा, म्हणजे कळेल की त्या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना नेमकी कोणाबरोबर आहे. पण ज्याने स्वतःच्या हाताने स्वतःच्या मालकाचा पक्ष संपवला त्याने दुसऱ्यांबद्दल बोलण्याची हिंमत करु नये, असं नितेस राणे यांनी खडसावलं.
अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा? या प्रश्नाला अकेला देवेंद्र फडणवीस ही काफी है, हे उत्तर काल आमच्या ताईला मिळालं असेल, असं नितेश राणे म्हणाले.
संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राचा सूर्याजी पिसाळ
मोदी आणि अमित शहा या दोघांना महाराष्ट्राचा राग आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान खऱ्या अर्थाने मोदीसाहेब आणि अमित शहा यांनी राखला. २०१९ ला याच महाराष्ट्राच्या जनतेने भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बाजूने कौल दिला होता. मात्र, या जनतेच्या विरुद्ध जाऊन महाविकास आघाडी ही गद्दारांचा कारखाना तयार झाला. त्यामुळे खरं तर संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राचा सूर्याजी पिसाळ आहे. त्याने मोदीसाहेब आणि शहासाहेबांना बोलून स्वतःच्या अकलेचे तारे तोडू नयेत, असं नितेश राणे म्हणाले.