Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Mumbai-Goa Highway : सावित्री पुलावर टायर फुटून बसला भीषण आग; सुदैवाने जिवीत हानी नाही

Mumbai-Goa Highway : सावित्री पुलावर टायर फुटून बसला भीषण आग; सुदैवाने जिवीत हानी नाही

महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Goa Highway) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी (Ratnagiri) येथून मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या औदुंबर छाया ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने अचानक पेट घेतला. बसच्या उजव्या बाजूकडील मागील टायर फुटून आग लागल्याने संपूर्ण गाडी जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


दरम्यान चालकाने प्रसंगावधान राखून गाडीतील १९ प्रवासी व अन्य कर्मचारी मॅनेजरना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान या घटनेची माहिती समजताच महाड एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच एमआयडीसी फायर स्टेशनने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळविले.


याचवेळी या संबंधित कंपनीची रत्नागिरीकडे जाणारी बस या मार्गावर असताना त्या गाडीतून परतीच्या प्रवासासाठी अपघातग्रस्त गाडीतील प्रवाशांना पोलिसांनी बसवून मुंबईला पाठवल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती आंधळे यांनी दिली.


सुमारे सात वर्षांपूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याने झालेल्या दुर्दैवी अपघातामध्ये ४० पेक्षा जास्त प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. काल मध्यरात्री झालेल्या या अपघातानंतर सात वर्षांपूर्वीच्या या कटू आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. या अपघाताच्या घटनेमुळे सावित्री पूल पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला.

Comments
Add Comment