नवी दिल्ली : ज्ञानवापी प्रकरणानंतर आता आणखी एका प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. महाभारतात उल्लेख असलेल्या ‘लक्षगृह’ च्या १०० बिघा जमिनीवर अतिक्रमण केल्याचा दावा करणाऱ्या मुस्लिम याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या ५३ वर्षांच्या खटल्याचा निकाल न्यायालयाने दिला. दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग), बागपत यांच्या न्यायालयाने सोमवारी मुस्लिम बाजूचे दावे फेटाळून लावले.
उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बर्नावा गावात हिंडन आणि कृष्णी नद्यांच्या संगमाला लागून असलेल्या एका प्राचीन टेकडीवर वसलेल्या, सुफी संत बदरुद्दीन शाह यांची समाधी तसेच कब्रस्तान असलेल्या जागेवर दीर्घकाळ विवाद होता. या वादातील ५० एकर जमीन एडीजे कोर्टाने हिंदू पक्षाला दिली.
हे स्थळ सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत संरक्षित आहे. १९७० मध्ये मुकीम खान यांनी न्यायालयात याचिका दाखल केली, ज्यामध्ये हिंदूंना जमिनीवर अतिक्रमण करणे, कबरी नष्ट करणे आणि हवन आयोजित करण्यापासून रोखावे, अशी मागणी केली. शिवाय लक्षगृह बदरुद्दीन शाहची कबर आणि कब्रस्तान असल्याचा दावा केला होता. त्यावेळी स्थानिक पुजारी कृष्णदत्त महाराज यांना या खटल्यात प्रतिवादी करण्यात आले होते. हिंदू बाजूने दावा केला की या जागेवर ‘लक्षगृह’ आहे, जो दुर्योधनाने पांडवांना जाळून मारण्याच्या भयंकर योजनेसाठी बांधलेला ‘लाख’ चा महाल आहे. या प्रकरणात सुमारे ५० एकर जमिनीच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात प्रकरण सुरू होते. हिंदू पक्षाच्या वतीने न्यायालयात पुरावे सादर करण्यात आले. न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला व पुरावेही सादर करण्यात आले.
महाभारतातही लक्षगृहाचा उल्लेख
१९५२ मध्ये एएसआयच्या देखरेखीखाली उत्खनन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक दुर्मिळ अवशेषही सापडले होते. येथे उत्खननादरम्यान ४५०० हजार वर्षे जुनी भांडी देखील सापडली होती. जी महाभारत काळातील असल्याचे सांगितले जाते. लक्षगृहाची कथा महाभारतातही वर्णन केलेली आहे. दुर्योधनाने पांडवांना जाळून मारण्याची योजना आखली होती. त्याच्या मंत्र्याकडून त्यांनी हे लक्षगृह बांधून घेतले होते.