Sunday, August 31, 2025

प्रभू श्रीरामाच्या जयघोषात पहिली ‘आस्था’ अयोध्येला रवाना

प्रभू श्रीरामाच्या जयघोषात पहिली ‘आस्था’ अयोध्येला रवाना

मुंबई : प्रभू श्रीरामाच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात ‘आस्था ट्रेन’ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ५ फेब्रुवारीला रात्री अयोध्येला रवाना झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आस्था ट्रेन’ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘अयोध्येत राम मंदिर झाल्यानंतर तिथे जाणारे सर्व लोक हे फार भाग्यशाली आहेत. कारण त्यांना आता प्रभू रामाचे दर्शन घेता येणार आहे. मला अयोध्येला जाणाऱ्या सर्व राम भक्तांचा हेवा वाटतो. कारण त्यांना प्रभू रामाचे दर्शन हे माझ्याआधी घेता येणार आहे. यासाठी पाचशे वर्षे आपण जे स्वप्न बघितले, शेकडो लढाया लढलो. आज त्याच ठिकाणी रामलल्ला स्थापित झाले आहेत. कलंकाचा ढाचा हा ६ डिसेंबर १९९२ रोजी खाली आणला आणि रामलल्लाची मूर्ती आपण त्याठिकाणी स्थापित केली आहे’.

फडणवीस पुढे म्हणाले की, ‘आम्ही आज सर्व काँक्रीटच्या घरात राहतो आणि आपले आराध्य दैवत मातीच्या घरात राहते. त्यामुळे आमचा सर्वांचा एकच नारा होता ‘रामलल्ला हम आयेंगे, भव्य मंदिर बनायेंगे...’. मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. कारण त्यांच्यामुळे हे स्वप्न पूर्ण झाले. रामलल्लाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून ती मूर्ती पाहिल्यानंतर प्रत्यक्षात प्रभू रामाची अनुभूती येते. ती मूर्ती म्हणजे १४० करोड जनतेच्या आशा आणि आकांक्षाची पूर्ती आहे.’

फडणवीस पुढे म्हणाले की, ‘मुंबईमध्ये काहीजण फेक रामभक्त फिरत आहेत. ते जोरजोरात मोठमोठ्याने भाषणे करत आहेत. स्वतःला रामभक्त म्हणून सांगत आहेत. इतकेच नाही तर बाबरी आम्हीच तोडली असेही सांगत आहेत. तर हे तेच लोक आहेत जेव्हा ढाचा खाली आला, तेव्हा हे सर्व आपल्या घरामध्ये घाबरून लपून बसले होते. हे लोक आम्हाला आता शिकवायला लागले आहेत. कलंकाचा ढाचा आम्ही खाली आणला याचा आम्हाला अभिमान आहे. आता त्या ठिकाणी मंदिर तयार झाले. आता तुम्ही त्या मंदिराकडे कूच करत आहात’.

Comments
Add Comment