निवडणूक आयोगाचा निर्णय : पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला; जो न्याय शिंदे गटाला तोच अजित पवार गटाला
नवी दिल्ली : शिंदे-ठाकरे गटाच्या वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मधिल फुटीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. त्यानुसार अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षांतर्गत निवडणूक झाल्या नसल्याचे निरीक्षण नोंदवत शरद पवार गटाने उद्या (बुधवारपर्यंत) पक्षाचे नाव आणि चिन्ह सूचवावे असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे शरद पवार गटाच्या नेत्यांनी सांगितले.
जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी राज्यातील महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेना फुटीवर निर्णय देताना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या बाजूने निर्णय देत पक्षनाव आणि पक्षचिन्ह हे शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला होता. शिवसेना फुटीनंतर आज निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी फुटीवर निर्णय दिला आहे. अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट करत राष्ट्रवादीचे पक्षचिन्ह आणि पक्षनाव अजित पवार गटाला देण्याचा निकाल दिला आहे.
शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडल्याने हे प्रकरणही निवडणूक आयोगाकडे गेले होते. हे प्रकरण गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित होते. याप्रकरणी एकूण १० सुनावण्या घेण्यात आल्या. या प्रत्येक सुनावणीवेळी शरद पवार हे जातीने हजर होते. निवडणूक आयोगाला दोन्ही गटाकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती.
पक्षांतर्गत निवडणूक झाल्या नसल्याचे निरिक्षण नोंदवित अजित पवाराकंडील पक्ष हा खरा पक्ष आहे. पक्ष आणि चिन्ह अजित पवार गट वापरतील असे निर्देश आयोगाने दिले आहेत. यावेळी दोन खासदारांनी अजित पवार गटाच्या बाजूने तर ५ आमदारांनी दोन्ही बाजूंनी पत्र दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवारांसोबत महाराष्ट्रातील ४१ आमदार, नागालँडमधील ७ आमदार, झारखंडमधील १ आमदार, लोकसभेचे २ खासदार, विधान परिषदेतील ५ आमदार तर राज्यसभेतील १ खासदार आहेत. तर शरद पवारांसोबत राज्यातील १५ आमदार, केरळमधील १ आमदार, लोकसभेतील ४ खासदार, राज्यसभेतील खासदार आणि विधान परिषदेतील ४ आमदार आहेत.
जो न्याय शिवसेनेच्या शिंदे गटाला तोच न्याय आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाचा निकाल हा अजित पवार गटाच्या बाजूने लागला असून हा शरद पवार गटाला मोठा धक्का आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागणार आहे. अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादी चिन्ह आणि नाव गेल्यानंतर आता शरद पवार गटाला त्यांच्या नव्या पक्षाचे नाव आणि चिन्हाची सूचना ही बुधवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत द्यावी लागणार आहे.
शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मूभा
शरद पवार गटाला यावर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निकालाने येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र शरद पवार गटाचा कस लागणार असून त्यांना अजित पवार गटाच्या अनिल पाटलांचा व्हिप पाळावा लागेल, असे दिसत आहे.
शिवसेनेत ज्या काही घडामोडी घडल्या त्याच पद्धतीने घडामोडी या नंतरच्या राष्ट्रवादीमध्ये घडल्या. अजित पवारांनी भाजपला साथ दिल्यानंतर बहुतांश आमदार हे त्यांच्यासोबत गेले आणि राष्ट्रवादीचा वाद हा निवडणूक आयोगामध्ये पोहोचला. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला स्वतंत्र्य गट म्हणून मान्यता दिली आहे.






