Wednesday, July 9, 2025

नवी मुंबईतील ४५०० अनधिकृत बांधकामांवर महापालिका चालवणार बुलडोझर

नवी मुंबईतील ४५०० अनधिकृत बांधकामांवर महापालिका चालवणार बुलडोझर

३१ डिसेंबर २०१५ पूर्वी बेकायदा बांधकामांच्या सर्वेक्षणाचे उच्च न्यायालयाचे आदेश


नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. नेरुळ सेक्टर १६ मधील पार्क प्लॉटवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारती पाडण्याचे काम नुकतेच नमुंमपाकडून करण्यात आले आहे. २०१५ नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कायदेशीर कारवाई करता यावी यासाठी ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी आणि नंतर किती बेकायदा बांधकामे झाली आहेत, याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला दिले आहेत.


नवी मुंबईत सुमारे ४५०० अनधिकृत बांधकामे असून ती पुन्हा एकदा पाडण्यात येणार असल्याची आणि शहरातील बेकायदा बांधकामांबाबत नोटीस बजावल्या ३२ दिवसात ही बांधकामे हटवली नाहीत, तर ती पाडण्याचे काम पालिका करेल अशी माहिती अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी दिली आहे.


यासंदर्भात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी बांधकाम परवानगीशिवाय पूर्ण झालेली बेकायदा बांधकामे तसेच नवी मुंबईत सुरू असलेल्या काही बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. किशोर शेट्टी यांनी नवी मुंबई शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत दाखल केली होती.


या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने महापालिकेला ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी नमुंमपाकडे किती अर्ज सादर करण्यात आले आहेत याचा तपशील देण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई सुरू करण्यात आली असून, महापालिकेने सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे.


महापालिका कार्यालयातील बेकायदा बांधकामांबाबत विचारणा केली असता, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिका विभागाचे अधिनियम १९६६ च्या कलम ५३, ५४ अंतर्गत ४ हजारांहून अधिक बेकायदा बांधकामे आहेत. किती बांधकामे झाली, किती बेकायदा इमारती सुरू आहेत, याची माहिती पालिकेला मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बेलापूरपासून दिघापर्यंत अनेक मूळ गावे आहेत. तर गावठाण विस्तार परिसरात हजारो बेकायदा बांधकामे आहेत. या गावांच्या आसपास उभ्या राहिलेल्या बेकायदा इमारतींमधील घरे इतर ठिकाणच्या घरांपेक्षा स्वस्त आहेत. याशिवाय भूमाफिया आणि बेकायदा बांधकाम व्यावसायिकांनी शहरात अशा अनेक इमारती उभ्या केल्या असून, बेकायदा बांधकामांमुळे येथील गावांची प्रतिमाही मलीन होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा