विजय पाठक
जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राज्यातील जागा वाटपांबाबतची चर्चा सुरू असून जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवण्याचा प्रस्ताव आला असता राष्ट्रवादी काँग्रेसने रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा लढवण्याबाबत तयारी दर्शवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा ल ढवण्यासाठी प्रथमपासून आग्रही असून या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नावाचा प्रस्ताव पक्षाकडे पाठवला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत पराभवाचा अनुभव घेतल्याने राष्ट्रवादीचे पवार गटातील जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी निवडणुक लढवण्यास नकार दिला आहे. वरून आदेश आल्याने विकास पवार आणि प्रमोद पाटील ही नावे राष्ट्रवादीने पाठवली असली तरी प्रत्यक्षात वेळेवर रावेरवरच हा पक्ष लक्ष केंद्रीत करू शकतो. त्यामुळे नाईलाजाने ही जागा ठाकरे गटाकडेजाऊ शकते.
रावेर लोकसभा मतदारसंघात २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकात भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे या विक्रमी मते मिळवून विजयी झाल्या होत्या. या संपूर्ण मतदारसंघात आज त्या घट्ट पाय रोवून उभ्या आहेत. मात्र यंदा रक्षा खडसे यांना परत संधी मिळेल काय, याबाबत अनिश्चितता आहे. भाजपातील गटबाजीचा त्या बळी ठरू शकतात, असे असले तरी जो उमेदवार दिला जाईल, त्याचा आपण प्रचार करू असे त्या सांगत आज भाजपात हिरीरीने कार्यरत आहेत.
रक्षा खडसे यांना परत तिकीट मिळाल्यास रक्षा खडसेविरूध्द एकनाथ खडसे असा सामना होऊ शकतो. सून विरूध्द सासरा ही लढत महाराष्ट्र पाहील. २०१४ मध्ये तत्कालीन खासदार हरीभाऊ जावळे यांना दिलेले तिकीट ऐनवेळी भाजपाकडून कापले जाऊन ते रक्षा खडसे यांना मिळाले होते . हा इतिहास असल्याने यावेळी असे काही घडू शकते,असे झाल्यास हरीभाऊंचे सुपुत्र अमोल जावळे यांचे नाव आघाडीवर आहे.