कोणतीही भूमिका द्या, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा अन् आपल्या चतुरस्र अभिनयांनी रंगभूमी गाजवणारा एक गुणी कलाकार म्हणजे संजय मोने. संजय मोने दिसायला शांत, पण प्रचंड बोलकं व्यक्तिमत्त्व, मिश्कील, स्पष्टवक्तेपणा अंगात ठासून भरलेला. मराठी रंगभूमीवरचा ‘बाप माणूस’. त्यांनी नुकतीच दै. प्रहारच्या ‘गजाली’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी प्रहारचे संपादक डाॅ. सुकृत खांडेकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी मारलेल्या रंजक गप्पांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे उलगडत गेले.
रंगप्रपंचात मिश्किली शोधणारा संजय मोने
भालचंद्र कुबल
मित्रांच्या मुलाखती कशा घ्याव्यात हे अद्यापही मला कळलेले नाही. वाचकांना नेमका एखाद्या सेलिब्रिटीच्या कुठल्या विषयात रस असतो हे सुद्धा अद्याप समजलेले नाही. बरं नटी किंवा नट म्हटला की त्याला गाॅसिप हे च्युईंगगमसारखं चिकटलेलं असतं, ते नेमकं कुठल्या जागी चिकटतं ती जागाही मला सापडलेली नाही. मित्रांच्या मुलाखती घ्यायच्या म्हटल्यावर त्यांच्या बालपणापासून ते आतापर्यंतच्या सगळ्या खऱ्या खऱ्या गोष्टी माहीत असतानाही “किती म्हणून फेकशील?” ही सूज्ञ विचारणा इतर मित्रांकडून होणारच याबद्दल खात्रीही असते. त्यामुळे हे टाळावं, ते वगळावं, हे गाळावं किंवा ते उगाळावं हे सुद्धा जमलेलं नाही. एकंदरीत काय तर संजय मोने या अवघड मित्राची मुलाखत घेण्याचे अवघड काम अवघडलेल्या अवस्थेत पार पाडलेलं आहे याचा अंदाज पुढील मजकूर वाचून तुम्हाला येईलच.
संजय मोने हा परखड बोलणारा मित्र म्हणून सहन करावा लागतो. तो आणि मी मालवणला एका एकांकिका स्पर्धेला परीक्षक होतो. ठाम मत मांडण्याचा स्वभाव काही बाबतीत आवश्यक असतो, पैकी परीक्षक किंवा ज्यूरी किंवा समीक्षक म्हणून काम करणाऱ्यासाठी तो अत्यावश्यकच असतो. निर्णयाची बाजू लोकमान्यच असायला हवी असा सर्वसमावेशक विचार करणाऱ्यातला संजय नाही. त्यामुळे मी माझ्या सद्सदविवेक बुद्धीच्या जोरावर दिलेला निर्णय बरोबरच आहे हे तो ठणकावून सांगतो. जे पटत नाही आणि ज्याच्याशी पटत नाही ते त्याच्या दृष्टीने अस्तित्वहीन असते. वाद, वितंडवाद हे शब्द त्याच्या लेखी नाहीत. या सर्व गोष्टींचा अनुभव मला त्या मालवणच्या टूरमध्ये आला. तो सैद्धांतिकही नाही आणि व्यवहारी तर बिलकूल नाही.
खादाडी आणि क्रिकेट हे त्याचे विकपाॅईंट्स. चवीच्या खाण्यासाठी स्वतःचा सेलिब्रिटी स्टेटस विसरून तो कुठल्याही गल्लीत, झोपडीवजा खानावळीत शिरायला तयार असतो. या गप्पांच्या ओघात कोविडकाळात त्याने फेसबुकवर स्वतःला एखाद्या हाॅटेलमधला आवडलेला पदार्थ व त्याच्या चवीचे वर्णन करून त्याच्या तमाम मित्र वर्गाला व्यक्त व्हायला सांगितले. बघता सकाळी सकाळी संजयची पोस्ट आली की तमाम मित्रवर्गाच्या प्रतिक्रिया धडाधड पडायच्या. मग कुठे कुठला पदार्थ चांगला मिळतो, यावर चर्चा झडायला लागायची. बरेच नामवंत या परिसंवादात भाग घेत असत. दुसऱ्या दिवशी दुसरा पदार्थ किंवा हाॅटेल. त्याच्या सोबत प्रवास करतानाही रस्त्याकडेला असलेल्या हाॅटेलांवर त्याचं लक्ष अधिक असतं. या हाॅटेलचा अमूक तमूक पदार्थ खा…! जबरदस्त…! अशी कमेंट सुद्धा तो देत असतो.
क्रिकेटबद्दल भरभरून बोलणे आणि मैदानातूनच क्रिकेट पाहणे ही त्याच्या दृष्टीने पर्वणी ठरते. सचिन, विनोद कांबळी आणि आचरेकर सरांच्या सर्व खेळाडूंचे नेटमागे उभे राहून क्रिकेटचे अवलोकन करणे हा त्याचा छंद आहे. विनय येडेकर, मकरंद देशपांडे हे अभिनेते असले तरी क्रिकेट उत्कृष्ट खेळतात म्हणून ते त्याचे जास्त आवडीचे आहेत. मी नट कसा झालो याबाबत बोलताना घडलेले अनेक गमतीदार प्रसंग त्यानी या गप्पांमध्ये शेअर केले. नाटक हे माध्यम तांत्रिकदृष्ट्या कितीही पुढारलेले असले तरी विदर्भातील झाडीपट्टी आजही एका माईकवर कशी चालते याचे विवेचन तर कुणालाही हसायला लावेल असेच होते. ज्युलिया राॅबर्ट्स ही संजयची आवडती नटी, म्हणून मुलीचे नाव ज्युलिया ठेवायचे हे उभयतांनी ठरवले होते. पण मुलगा झाला तर? डाॅक्टरांनी सांगितले होते की, कदाचित सीझर करावे लागेल म्हणून मग मुलाचेही नाव त्यांनी ज्युलियस ठरवले होते. हा विनोद त्यांच्या शैलीत ऐकताना गजालीतील प्रत्येक जण हसत होता. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाने गंभीर वाटणारा संजय मोने वृत्तीने अत्यंत सहज आणि सोप्पा आहे. तो क्लिष्ट किंवा गुंतागुंतीचा मुळीच नाही. जे आहे ते आहे, जे नाही त्याबाबत कसलाच पश्चाताप नाही. आंतरनाट्य या संस्थेतून त्याचा प्रवास जरी नायकाच्या भूमिकेतून सुरू झाला असला तरी पुढील नाटकात कपडेपट सांभाळण्याची जबाबदारी त्याने अगत्याने पार पाडली होती. दौऱ्यावर देखील संजय कपडेपट सांभाळण्यासाठी, सर्व नटांच्या कपड्याना इस्त्री करून देण्याचे काम तो एक ड्युटी म्हणून सांभाळायचा.
नाटक या माध्यमाबाबत मात्र त्याच्या काही अटी असतात आणि त्या निर्मात्यांना सांगायला तो कुठलीच भीड बाळगत नाही. कै. मोहन वाघांसारख्या बलाढ्य निर्मात्याला त्यांनी ३१ डिसेंबरला रात्री बाराचा प्रयोग मी करणार नाही, हे ठणकावून सांगणारा संजय मोने हा एकमेव नट असावा. दीपस्तंभ सारखे रंगभूमी गाजवलेले नाटक असो, ‘कुसुम मनोहर लेले’ किंवा अलीकडचे ‘शेवग्याच्या शेंगा’ असो प्रत्येक नाटकावर स्वतःची छाप सोडणारा हा चतुरस्र कलावंत आहे. त्याने लेखन क्षेत्रातही यशस्वी कामगिरी बजावली आहे. ‘हम तो तेरे आशिक है’, ‘सारखं छातीत दुखतंय’ या नाटकांनी तर आजच्या तरुण पिढीची मनं जिंकली आहेत. मधल्या काळात त्याने काही चित्रपट देखील लिहिले. लेखक, दिग्दर्शक, कलाकार या स्तरांवर आज त्याची पकड घट्ट बसली आहे. आपल्या स्वभावातील मिश्कीलपणा उघड करताना तो सहजगत्या म्हणून जातो की नट म्हणून लोकांना आवडेनासा झालो की कार्यक्षेत्र स्विच करण्यासाठी म्हणून निदान लेखनावर तरी पोट भरता यावे म्हणून हा रंगप्रपंच…!
रंगभूमीवरील चतुरस्र अभिनेता
वैष्णवी भोगले
संजय मोने हे उत्स्फूर्त आणि विविधांगी कला असलेले व्यक्तिमत्त्व आहे. ज्यांच्याबद्दल बोलू तेवढे कमीच आहे. त्यांचे पहिले प्रेम जरी क्रिकेट असले तरी रंगमंचावर रुळलेला चतुरस्र अभिनेता, तसेच उत्तम लेखक, दिमाखदार दिग्दर्शक, म्हणून संजय मोने यांच्याकडे पाहिले जाते. संजय मोने यांचे वाचन प्रचंड असल्यामुळे त्यांचा स्वभाव स्पष्ट आहे. हाच स्वभाव घेऊन सर्वत्र संचार असलेले आणि तेवढ्याच जबाबदारीने स्वीकारलेल्या प्रत्येक भूमिकेला न्याय देणारे अभ्यासू नट म्हणजेच संजय मोने. त्यांचे चित्रपट असो, मालिका किंवा रंगमंच प्रत्येक अभिनयात ते चपखल बसतात.
मराठी रंगभूमीबद्दल बोलायचे झाले तर मराठी रंगभूमी ही किती समृद्ध आहे हे काही कुणाला वेगळं सांगायची गरज नाही. कला, साहित्य, संस्कृती अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मराठी पाऊल हे नेहमीच पुढे आहे आणि राहील. खासकरून कला आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांसह मराठी रंगभूमी नेहमी श्रेष्ठच आहे. वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, वसंतराव देशपांडे, प्रभाकर पणशीकर, डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू अशा ज्येष्ठ रंगकर्मींमुळे ही मराठी रंगभूमी नावारूपाला आली आणि मोठी झाली.
पण गेली काही वर्षें मराठी रंगभूमीवरील नाटके म्हणावी तशी नावारूपास आली नाहीत. मराठी नाटक आता कितपत चालेलं, लोकं नाटक बघायला येतील की नाही अशी शंका वर्तवली जात आहे. काही अंशी ही गोष्ट खरी आहे कारण सिनेमा आणि आता फोफावलेले ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यामुळे प्रेक्षकांची आवड पूर्णपणे बदलली आहे. लोकांना सगळं झटपट हवंय मग ती आयपीएल क्रिकेट मॅच असो किंवा दीड तासांचा सिनेमा, लोकं आता वेळ काढून ३ अंकी नाटकं बघण्यापेक्षा टीव्हीच्या मालिका बघणं जास्त पसंत करतात.
हे टिकवायचे असेल आणि मराठी रंगभूमीसाठी चांगला अभिनेता, लेखक, दिग्दर्शक होण्यासाठी वाचन करणे गरजेचे आहे. तसेच नाटकांमधील एखादी संहिता किंवा एखादी व्यक्तिरेखा ठरवताना मराठीचा अभ्यास करूनही भूमिका चांगल्या होत नाहीत. त्यामध्ये अत्यंत थिटे संघर्ष असतात आणि त्यातून नाटक रंगवलेले असते. नाटकातील एखाद्या संहितेमध्ये संघर्ष जास्त असेल तितकेच एखादे नाटक आपली उंची गाठते. त्यामुळे हल्लीच्या नाटकांमध्ये संघर्ष फारच कमी असतात. सध्या नाटकांमध्ये मोठ्या भूमिकांसाठी, लेखन केले जात नाही. त्यामुळे पूर्वीसारखे मोठमोठे नट आताच्या पिढीत क्वचितच बघायला मिळतात. सध्या मराठी नाटकांमधील विखार वाढत चालला आहे. मराठी रंगभूमीत कलावंत, लेखक, दिग्दर्शक होण्यासाठी नवीन पिढीला वाचन करणे महत्त्वाचे आहे. शब्द भांडार या क्षेत्रात आपल्या जवळ असणे गरजेचे आहे. हल्लीच्या नाटकांमध्ये अनेक त्रुटी आढळतात. मराठीमध्ये एकाच वाक्यामध्ये अनेक शब्द दोनदा वापरले जातात. त्यामुळे त्या लेखनातील वैचारिकपणा ठरविला जातो. उदा. म्हणजेच ‘पायांमध्ये चपला आणि बूट शोभत नसून या पायामध्ये घुंगरू शोभतात’ असे न लिहिता या ‘पदांमध्ये चपला आणि बुट शोभत नसून पायांमध्ये घुंगरू शोभतात’ असे वाक्य लिहिल्यास ते जास्त आकर्षक वाटते. मुळात मराठी चांगले आणि वाईट यातच अनेकांची गफलत होत आहे. त्यामुळे उत्तम कलावंत, दिग्दर्शक, लेखक होण्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे.
आज मराठी रंगभूमी वाचविण्यासाठी अनेक संमेलने घेतली जातात. बालगंधर्व यांच्या काळात ब्रिटिश सरकारने पैसेसुद्धा दिले नव्हते. तेव्हा मराठी रंगभूमी जिवंत ठेवण्याचे काम संस्थानिकांनी, आश्रयदात्यांनी केले होते. पण आता जी सुरुवातीला नाटकांमध्ये काम करण्याची मज्जा होती ती राहिली नाही. पूर्वी नाटक करताना, बाहेर नाटकांचा दौरा व्हायचा. तेव्हा फार गोष्टींची सोय नव्हती. पण आता सगळ्या सोयी असल्या तरी नाटके बघण्याची गंमत कुठेतरी हरवत चालली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मराठी नाटकांमध्ये चांगल्या संहिता निर्माण करून प्रेक्षक रंगभूमीकडे परत येतील अशा पद्धतीचे नव्या दमाच्या नटांना घडविण्याची, नवनवे प्रयोग करण्याची जास्त गरज आहे, असे संजय मोने म्हणाले.
‘बाप’ अभिनेता
सीमा पवार
तुमचं बाळ मृत जन्माला आल्याचा निरोप मिळाल्यानंतरही बाळाची आजी खात्री करून घेण्यासाठी बाळाला पाहण्यासाठी गेली. तेव्हा त्या बाळाची हालचाल आजीला दिसली. आजीने ताबडतोब डॉक्टरांना कळवलं आणि २१ मे या दिवशी जन्माला आलेलं हे बाळ २७ तारखेला पहिल्यांदा रडलं. ते बाळ म्हणजे आजचे प्रख्यात अभिनेते, लेखक, दिग्दर्शक संजय मोने. या कलाकाराने त्यानंतर रंगभूमीवर आपल्या अभिनयाने अनेकांना हसवलं, रडवलं आणि आपल्या अभिनयाच्या प्रेमात पाडलं. रंगभूमीवर मुखवटा चढवून भूमिका साकारणारा हा कलाकार खऱ्या आयुष्यात खूप वेगळा आहे. नाटक गाजवत असतानाच संजय मोने यांच्या संसाराच्या रंगभूमीवर प्रवेश झाला पत्नी सुकन्या आणि लेक ज्युलिया यांचा. विविध भूमिका साकारणारा हा अभिनेता आयुष्यातील पात्रही जीवापलीकडे जपतो. त्यामुळे प्रहार गजालीमध्येही गप्पा मारताना ज्युलियाचं नाव ज्युलिया का? आणि या लेकीचं आमच्या आयुष्यात काय स्थान आहे हे सांगायला ते विसरले नाहीत.
संजय मोने यांनी अभिनय, नाटकाच्या क्षेत्रात यायचं ठरवलं, तेव्हा आताच्या सारखे अनेक पर्याय नव्हते. पण त्यांच्या पालकांनी त्यांना यापासून रोखलं नाही. ते नेहमी सांगायचे, तुला जे करायचं आहे ते तू कर, पण लक्षात ठेव की, त्याचे जे काही बरं-वाईट भोगायचं आहे, तेही तुलाच भोगायचं आहे. ही त्यांची स्पष्ट भूमिका होती. संजय मोने यांचे वडील आणि आई दोघं नाटकात काम करायचे. त्यामुळे त्यांच्या घरी सतीश दुभाषी, मधुकर तोरडमल, मोहन तोंडवळकर, डॉ. काशिनाथ घाणेकर अशी मोठी कलाकार मंडळी नेहमीच असायची. या सगळ्यांचा विशेष प्रभाव त्यांच्यावर होत असे. त्यामुळे रंगभूमीचं आकर्षण निर्माण झाल्याने मोने रंगभूमीकडे वळले.
सुरुवातीला कॉलेजमध्ये असताना अतिशय लाजाळू असणारे, कुणाशी बोलायलाही संकोच वाटणारे संजय मोने यांनी रंगभूमीवर ‘ती फुलराणी’, ‘तो मी नव्हेच’, ‘कुसुम मनोहर लेले’ अशा नाटकांमधून भूमिका साकारल्या आणि त्या जगवल्याही. हा प्रवास करताना अनेक चढ-उतार त्यांच्या आयुष्यात आले. प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ येते. पण त्यावेळी ‘हेही दिवस जातील’ हे पालकांचे शब्द कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी खूप मोठा आधार असतो. भरपूर अपमान पचवले, ते प्रत्येकालाच पचवावे लागतात. उलट ज्या दिवशी अपमान झाला नाही, त्या दिवशी, प्रश्न पडायचा असे कसे झाले.
प्रत्येक अनुभव आपल्याला शिकवत असतो, हेच यातून शिकायचं असे ते ठामपणे सांगतात. आपलं पात्र रंगभूमीवर उभं करताना संजय मोने यांनी ते आपल्या सहकलाकारापेक्षा वरचढ नसलं तरी ते तितक्याच तोडीचं हवंच हा नियम प्रत्येक नाटकात जपलायं. अनेक नाटकं, चित्रपट, मालिकांमधून त्यांनी कामं केली आहेत. विनोदी नाटकांमधून फारसा न रमणारा हा चेहरा आपल्या खऱ्या आयुष्यात मात्र बराच विनोदी असल्याचे जाणवतं.
मोने यांची ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकात सुकन्या कुलकर्णी यांच्याशी भेट झाली. त्यानंतर विवाह झाला. ते म्हणतात, मी पालक झाल्यानंतरचा तो काळ माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता. ज्युलियाच्या जन्माआधीपासून मुलगीच व्हावी अशी त्यांची इच्छा होती. कारण मुलींना खूप माया असते, त्या अतिशय प्रेमळ असतात. जेव्हा कधी काम आटोपून घरी यायला मला उशीर होतो, तेव्हा ज्युलिया माझ्यासाठी जागी असते. मी आल्यावर बाबा तू जेवलास का? असा प्रश्न असतो. नसेल जेवलो तर मला वाढते. हे सगळं अनुभवणं खरोखरच खूप सुखद असतं असे सांगताना ते भावुक होतात.
संजय मोने आपल्या ज्युलियाबद्दल भरभरून बोलत होते. तिचं कौतुक करताना ते सांगतात, हल्लीची मुलं फार हुशार आहेत. कारण ही पिढी मुळात तंत्रज्ञानाच्या काळातच जन्माला आली आहे. त्यामुळे मी स्वतः या गोष्टी ज्युलियाकडून समजून घेतो. ज्युलियाचा बाबा असलो, तरी पालकत्वाची प्रमुख जबाबदारी आणि निर्णय सुकन्याच घेत असते. एका माणसाच्या मताप्रमाणे घर चाललं पाहिजे, असं मला वाटतं. आपण दोघं वेगवेगळं बोलणार, त्यात मुलगी गोंधळून जाणार, हे मला योग्य वाटत नाही. त्यापेक्षा तिला एकाकडूनच सगळ्या गोष्टी कळाव्यात, ही माझी त्यामागची भूमिका आहे.
सुकन्या अत्यंत उत्तमपणे ही सर्व जबाबदारी सांभाळून घेते, याचं मला विशेष कौतुकही वाटतं. ज्युलिया खूप शांत आणि विचारी मुलगी आहे. आम्ही सांगितलं आणि ज्युलियानं ते केलं नाही, असं शक्यतो कधी होत नाही. त्यामुळं तिला रागावण्याचे प्रसंग फारसे आले नाहीत. आम्ही तिघं घरात खूपच साधं, सरळ आणि सामान्य वागतो. प्रत्येकजण आपापले निर्णय स्वतःच घेतो. मी आणि सुकन्या दोघं आमच्या कामानिमित्त बाहेर असतो त्यावेळी ज्युलिया एकटी घरी राहते. म्हणून आम्ही सतत एक गोष्ट केली, की दोघांपैकी एकानं कायम तिच्याजवळ राहायचं. ज्युलियाला ज्या ज्या वेळी आमची गरज होती, त्या प्रत्येक वेळी आम्ही तिच्याबरोबर होतो.
तेवढ्यासाठीच आम्ही एकत्र काम करत नाही. मुलांबरोबर आई-वडिलांपैकी एकानं असायलाच हवं, असं माझं ठाम मत आहे. हल्ली फोन, व्हीडिओ कॉल यांसारखे पर्याय आहेत; पण ही साधनं आई-वडिलांची जागा भरून काढत नाही. पालक म्हणजे जो मुलांच्या बरोबरीनं जातो. जो विचारानं मुलांच्या पुढं असतो. अनुभवाने मोठा असतो. आपल्याला आलेले अनुभव मुलांना सांगावेत. पालकांनी प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात मुलांबरोबर राहावं. संजय मोने यांचे हे विचार सर्वच क्षेत्रातील लोकांनी पालकत्व कसं जबाबदारीने पेलावं याचे मार्गदर्शकच आहेत. आपल्या लेकीसाठी हा बाप अभिनेता पहाडासारखे उभा राहील, यात शंका नाही.
अष्टपैलू मोने…
गजालींसाठी
आले संजय मोने,
पण आत्मकथनात
रमून गेले मोने…
प्रत्येकाच्या मनात थबकलेल्या
प्रश्नांना सहज
सोडवून गेले मोने…
बोलके मोने,
धीरगंभीर मोने…
हसरे मोने, बोचरे मोने…
विस्कटलेले मोने;
गबाळे मोने…
रोखठोक मोने,
तितकेच संयमी मोने…
हजरजबाबी मोने,
विनोदी मोने…
शांत भासणारे मोने,
एकपात्री करणारे मोने…
प्रेमळ मोने, हळवे मोने…
हसविणारे मोने, अल्वार डोळे ओले करणारे मोने…
भडाभडा बोलणारे मोने, टोकणारे मोने…
मातापित्यांची थोरवी
कथन करताना,
थोरा-मोठ्यांच्या साथसंगतीचे गमक
सांगणारे मोने…
सुकन्याची महती सांगता सांगता, कन्या ज्युलियाची किमया, लीलया
सांगून गेले मोने…
असे अष्टपैलू मोने, सर्वांनाच दिवाने करून गेले मोने…
– दीपक परब.