साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासह १० ठराव मंजूर
अमळनेर (पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी) : पूज्य साने गुरुजी आणि निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर ‘भारतरत्न देण्यात यावा यासह विविध १० ठराव ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मांडण्यात आले. २ तारखेपासून सुरू झालेल्या संमेलनाचे रविवारी सायंकाळी सूप वाजले. समारोपाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन हजेरी लावली. खान्देशला साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे. समाजात साहित्याचे स्थान हे कायम आदरणीय आणि पूजनीय राहिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ९७व्या साहित्य संमेलनाचा रविवारी सायंकाळी यशस्वी समारोप झाला. समारोपप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे ऑनलाईन लाईव्ह उपस्थित होते. संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.रवींद्र शोभणे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महामंडळाच्या अध्यक्षा डॉ.उषा तांबे, उपाध्यक्ष रमेश वंसकर, कार्याध्यक्षा उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक, मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या कारभारावर बारीक लक्ष ठेवताना डोळ्यांनाही ताण पडला. त्यामुळे त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. म्हणून उपस्थिती देऊ शकलो नाही, अशी खंत व्यक्त करत त्यांनी साहित्यिक व कादंबरीकार यांना राजकीय कादंबरी लिहिण्यासाठी आजसारखे पोषक वातावरण व संधी त्यांना कधी उपलब्ध होणार नाही, असे सूचक वक्तव्य करत त्यांना राजकारणावर लिहिण्याचे सांगितले.
साहित्य संमेलनाला मुख्यमंत्री यांनी उपस्थिती द्यावी ही प्रथा व संस्कृती आहे, मात्र नाईलाज असल्याने आपण खानदेशातील या मराठी साहित्य संमेलनाला अनुपस्थित राहिलो. खानदेशातील साने गुरुजी, कवयित्री बहिणाबाई चौधरी या महान विभूतींचा स्पर्श झालेला आहे व त्या ठिकाणी मराठी भाषेचा कुंभमेळा भरला होता. अमळनेर येथे ९७ वे साहित्य संमेलन पार पडत असताना शंभरावे साहित्य संमेलन हे जागतिक स्तरावर भव्य दिव्य आयोजित केले जाईल. महाराष्ट्र शासन शंभराव्या साहित्य संमेलनाला परिपूर्ण सहाय्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली व यावेळी आपले सरकार राहील, असेही त्यांनी सूचक वक्तव्य केले.
खानदेशभूमीमधील विशेषतः जळगाव व अमळनेर या ठिकाणी वाल्मीक ऋषि, महर्षी व्यास, संत सखाराम महाराज व अनेक संतांनी स्पर्श झालेली भूमी आहे. यातच वाल्मिक ऋषी यांचे नाव अयोध्येचे विमानतळाला देऊन खानदेश व अयोध्या यांची एक नाद जोडली गेल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी समारोप भाषणात केला.