Tuesday, April 29, 2025
Homeताज्या घडामोडीNavra Maza Navsacha 2 : 'सरप्राईज!' म्हणत सचिन पिळगावकरांची मोठी घोषणा!

Navra Maza Navsacha 2 : ‘सरप्राईज!’ म्हणत सचिन पिळगावकरांची मोठी घोषणा!

‘नवरा माझा नवसाचा २’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; तब्बल १९ वर्षांनी येतोय दुसरा भाग

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील मोठं नाव म्हणजे सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar). त्यांचे अशी ही बनवाबनवी, गंमत जंमत, एकापेक्षा एक, आयत्या घरात घरोबा असे एक ना अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. त्यातील एक म्हणजे दोन दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेला चित्रपट ‘नवरा माझा नवसाचा’ (Navra Maza Navsacha). १९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे संवाद व गाणी आजही चाहत्यांना तोंडपाठ आहेत. या चाहत्यांसाठी सचिन पिळगांवकर एक खुशखबर घेऊन आले आहेत. तब्बल १९ वर्षांनी ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सरप्राईज!’ असं कॅप्शन देत सचिन पिळगावकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.

‘नवरा माझा नवसाचा’ हा एव्हरग्रीन चित्रपट २००४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील गाजलेलं पात्र म्हणजे अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी साकारलेला कंडक्टर. अशोक सराफ यांना नुकताच महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या चित्रपटाच्या दुसर्‍या भागाचा उल्लेख केला. शिवाय आपणही याचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे, यात शंका नाही.

‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात आपल्याला गणपती पुळेपर्यंतच्या एसटीच्या प्रवासातील अतरंगी प्रवाशांची मजेशीर गोष्ट पाहायला मिळाली आणि शेवटी बाप्पाचं दर्शन घडलं. आता नव्या भागात नवस फेडायला वॅकी नेमका कुठे जाणार? यामध्ये कोणकोणते ट्विस्ट असतील याचा उलगडा थेट चित्रपटगृहात होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटातील तगड्या स्टारकास्टची नावं समोर आली आहेत.

चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक तसेच प्रमुख अभिनेते सचिन पिळगावकर यांनी यासंदर्भात पोस्ट शेअर करून चित्रपटाची स्टारकास्ट जाहीर केली आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार अशी दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. आता हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याकडे मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांसह चित्रपटाच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -