काय आहे निवडणूक आयोगाचा नियम?
नवी दिल्ली : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी (Political Parties) कंबर कसली आहे तर निवडणुकीची तारीख जाहीर होताच जोरदार प्रचारालाही सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) प्रचारासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यात एक महत्त्वाचा नियम आखून देण्यात आला आहे. या नियमानुसार, कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लहान मुलांचा प्रचाराच्या कामांसाठी वापर करता येणार नाही. तसे आढळल्यास बालमजुरी (Child Labor) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
आज निवडणूक आयोगाने एक पत्रक जारी केले. यात लहान मुले आणि अल्पवयीन मुलांना निवडणूक प्रचारात सहभागी न करण्याच्या कडक सूचना जारी केल्या आहेत. लहान मुले किंवा अल्पवयीनांनी प्रचार पत्रिका वाटताना, पोस्टर्स चिकटवताना, घोषणाबाजी करताना किंवा पक्षाचे झेंडे आणि बॅनर घेऊन फिरताना दिसू नये, असे यात सांगण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, मुलांना निवडणुकीशी संबंधित कामात किंवा निवडणूक प्रचाराच्या कामात सहभागी करुन घेणे खपवून घेतले जाणार नाही. या सूचनांमध्ये लहान मुलांना कोणत्याही प्रकारच्या राजकीय प्रचारात, मग ते कविता वाचणं, गाणी, घोषणा इत्यादींमध्ये सामील न करण्यास सांगितले आहे.
आयोगाने म्हटले की, कोणत्याही पक्षाच्या निवडणूक प्रचारामध्ये मुलांचा सहभाग असल्याचे आढळले, तर बालमजुरीशी संबंधित सर्व कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. याबाबत कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी व रिटर्निंग अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. दरम्यान, मुलगा त्याच्या पालकांसोबत तिथे असेल, तर याला मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन मानले जाणार नाही.