
रांची : झारखंडमध्ये (Jharkhand) सध्या प्रचंड राजकीय उलथापालथी सुरु आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीने अटक केल्यानंतर चंपाई सोरेन (Champai Soren) यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करण्यात आलं. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र, जोपर्यंत फ्लोर टेस्ट पास होत नाही, तोपर्यंत झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वातील सरकारवरील संकट कायम होतं. चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वातील सरकारने आज झालेली बहुमत चाचणी जिंकल्याने हे संकट टळलं आहे.
आज झालेल्या बहुमत चाचणी दरम्यान सोरेन यांच्या सरकारच्या बाजूने ४७ मतं पडली असून २९ मतं विरोधात पडली आहेत. झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा आहेत. त्यामध्ये बहुमतासाठी ४१ सदस्यांचं संख्याबळ आवश्यक होतं. JMMच्या नेतृत्वाखालील युतीकडे ४८ आमदाराचं पक्कं बहुमत होतं. यामध्ये JMM चे २९, काँग्रेसचे १७, RJD आणि CPI(ML) यांच्या प्रत्येकी एक सदस्यांचा समावेश आहे. यापैकी सरकारच्या बाजूने ४७ मते पडली आहेत.