कथा: रमेश तांबे
एक होतं झाड. तेच होतं पक्ष्यांचं गाव. चिमण्या, कावळे, कबुतरे, पोपट साळुंक्या, मोर! असे कितीतरी पक्षी यायचे. जमायचे, कलकलाट करायचे. तिथेच त्यांची घरे होती. तेथेच त्यांची शाळा होती. रात्रीचा मुक्कामदेखील तिथेच करायचे. पहाट झाली की पक्ष्यांच्या कलकलाटाने जागे व्हायचे झाड! झाडाला यायची लालचुटूक फळं. पक्षी तीच फळं मिटक्या मारीत खायची. झाडांच्या बिया साऱ्या रानात टाकायची. त्यामुळे त्या झाडासारखी अनेक झाडं जंगलात होती. पण पक्ष्यांची गर्दी मात्र याच झाडावर असायची. झाडाला खूप आनंद व्हायचा. ते इतर झाडांना म्हणायचं, “बघा बघा माझ्या अंगाखांद्यावर किती पक्षी. किती कलकलाट!” मग बाकीची झाडं हिरमुसली व्हायची.निराश व्हायची. आपल्याला असं सुख का नाही असं साकडं देवाला घालायची. खरे तर ते एकच झाड पक्ष्यांना का आवडायचे. याचं कारण ना पक्ष्यांना ठाऊक होतं ना झाडाला. पण झाड मात्र स्वतःवरच खूश होतं.
असेच अनेक दिवस गेले. आता झाडाला नुसता आनंद होत नव्हता, तर त्याला अहंकारदेखील होऊ लागला. ते झाड इतर झाडांना हिणवू लागलं. त्यांचा उपहास करू लागलं. इतरांची टिंगल-टवाळी करू लागलं. खरं तर झाडाला असं करण्याची काहीच गरज नव्हती. पण म्हणतात ना एकदा का यश डोक्यात शिरलं, तर मग इतरांना तो कमी लेखू लागतो. तसंच या झाडाचं झालं. झाडाचा अहंकार त्याच्या वागण्या, सळसळण्यातून, त्याच्या पानाफुलांतून, लालचुटूक फळांतून डोकावू लागला आणि एके दिवशी का कुणास ठाऊक पक्ष्यांना वाटले, आपण सारे एवढे जण एकत्र राहतो. हेच आपले गाव. गावाचा कारभार पाहण्यासाठी आपण गावाची पंचायत नेमली पाहिजे. मग पंचायतीत कुणाला घ्यायचं यावर निवडणूक हाच पर्याय सर्वांच्या समोर आला.
मग काय, एकदा का राजकारणाचं वारं डोक्यात शिरलं, तर ते सर्व वातावरणच बिघडून टाकतं. झालं, वेगवेगळ्या पक्ष्यांच्या वेगवेगळ्या पार्ट्या बनल्या. आपापले उमेदवार उभे केले गेले. प्रचार झाला. एकमेकांची उणी-दुणी काढली गेली. आमचाच उमेदवार कसा चांगला हे ठासून सांगितलं गेलं. कावळे, कबुतरांची संख्या जास्त असल्याने त्यांचेच उमेदवार निवडून आले. पंचायतीत कावळे, कबुतरे आणि एखादा पोपट सोडल्यास कुणालाच स्थान मिळाले नाही. बाकीचे पक्षी नाराज झाले. निवडून आलेले उमेदवार स्वतःलाच श्रेष्ठ समजू लागले. मग आपोआपच पक्ष्यांच्या एकीला तडा गेला. या झाडावर आपण आता राहायचे नाही असा विचार इतरांनी केला आणि एके दिवशी ते सारे पक्षी उडून गेले. कावळे आणि कबुतरे तेवढी शिल्लक राहिली. झाडाला कळेना असे कसे घडले? मग एके दिवशी कावळे आणि कबुतरेही झाड सोडून गावात निघून गेले अन् झाड ओस पडले.
आता झाड विचार करू लागलं, असं कसं झालं? निवडणुकीमुळे पक्ष्यांमध्ये फूट पडली की माझ्या मनात अहंकार आला, मी इतरांचा दुस्वास करू लागलो म्हणून असे घडले! आता झाड बिचारं एकटंच आहे जंगलात. पक्ष्यांविना त्याचं जगणं बेसूर अन् एकदम हरवल्यासारखं झालंय. या घटनेमुळे झाडाने अगदी विनम्र भावनेने, मनोमन जंगलदेवतेची माफी मागितली अन् झाड पूर्वीसारखंच परत निर्मळ झालं! आता जंगलात एकच बोंब झालीय. म्हणे काही पोपट त्या झाडावर राहायला गेलेत!