Friday, March 21, 2025

समाधान…

संवाद: गुरुनाथ तेंडुलकर

आठवड्याच्या बाजारातून फिरता फिरता सायमन अचानक थबकला. कापडाच्या ठेल्यावर उभ्या पाठमोऱ्या व्यक्तीला पाहून स्वतःशीच दचकला. “अरे पण हा इथं कसा…?” “काहीतरी चूक होतेय.” तो पुन्हा स्वतःशीच म्हणाला. पण ती पाठमोरी व्यक्ती नेमकी कोण याची पक्की खात्री करून घेण्यासाठी वळसा घालून थोडा पुढे गेला आणि एका आडोशाला उभा राहून त्याने त्या माणसाचा चेहरा बघितला. होय तोच होता तो… पण हा इथं काय करतोय? उंची रेशमी कापडाच्या दुकानात…? सायमन लपत-छपत त्या व्यक्तीचा मागोवा घेऊ लागला.

‘त्या’ व्यक्तीनं रेशमी कापडाच्या दुकानात जाऊन झुळझुळीत वस्त्रं पाहिली. त्यांचे भाव विचारले. तिथून तो पुढे सरकला. उंची अत्तरं आणि सुवासिक तेलांच्या दुकानांवर जाऊन त्यानं तिथलं सामान पाहिलं. तिथून तो पिसांच्या टोप्यांच्या दुकानाकडे वळला. अमीर उमराव वापरतात तशा प्रकारच्या पिसांच्या टोप्या, लोकरीच्या टोप्या पाहिल्या. सायमन ‘त्या’ माणसाच्या मागावर होताच. तो माणूस आता सोन्याचांदीच्या पेढीवर गेला होता. तिथं ‘तो माणूस’ थोडा वेळ थांबून पुढे वळला… आठवड्याच्या बाजारात उंची जातीचे घोडे विकायला आले होते. तो माणूस घोड्यांच्या सौदागराजवळ गेला. घोडे नीट पाहिले आणि पुढे गेला. एक एक करीत तो सगळ्या बाजारातून हिंडत होता. तिथून ‘तो माणूस’ गेला उंची मद्याच्या दुकानाजवळ गेला…

आता मात्र सायमनचा संयम सुटला. कारणही तसंच होतं कारण, ‘तो माणूस’ कुणी सामान्य माणूस नव्हता. तो होता सॉक्रेटिस… थोर विचारवंत आणि तत्त्वचिंतक… सत्य शोधण्यासाठी धडपडणारा. अत्यंत साधेपणे राहाणारा. राजसत्तेनं देऊ केलेल्या पैशांच्या राशी नाकारणारा. सॉक्रेटिस! एवढा थोर माणूस, सगळं अथेन्स याला ऋषितुल्य मानतं. हा एवढा मोठा तत्त्वज्ञानी आणि इथं…? आठवड्याच्या बाजारात…? सायमन तरातरा पुढं आला आणि म्हणाला, “आपण…? इथं…? या बाजारात…?”

सॉक्रेटिस हसून म्हणाले, “हो. मी दर आठवड्याला इथं येतो. सगळा बाजार फिरतो. नवनवीन काय काय वस्तु बाजारात आल्या ते पहातो. उंची अत्तरं, सौंदर्य प्रसाधनं, शृंगारिक कपडे, दागिने, मद्य, उत्तमोत्तम खाद्यपदार्थ, उंची घोडे…! सगळं सगळं बघतो आणि घरी परततो.” “पण का?” सायमनच्या प्रश्नात काहीसा संताप काहीशी उत्सुकता होती. “अरे इथं बाजारात विक्रीसाठी ठेवलेला हा सगळा माल म्हणजे पैशांनी विकत घेता येण्याजोगी सुखाची साधनं आहेत, असं मला वाटतं. यातलं माझ्याकडे काहीही नसूनदेखील मी किती सुखी आहे याचा मी विचार करतो आणि अधिकच आनंदित होऊन घरी परततो…!” सॉक्रेटिसनं सायमनला दिलेलं उत्तर म्हणजे एक त्रिकालबाधित सत्य आहे.  कोणत्याही सुखाचा उगम हा जीवनाकडे पहाण्याच्या आपल्या दृष्टीत असतो, आपल्या स्वतःच्या मानसिकतेत असतो. आजच्या आपल्या सामाजिक जीवनाचा नीट आढावा घेतला, तर चैनीची साधनं आणि उंची वस्तू ज्याच्याजवळ मुबलक प्रमाणात आहेत तो माणूस अधिक सुखी असतो, असा समज आपण करून घेतलाय.

समाजातला बहुतांश वर्ग केवळ पैसा आणि त्या पैशातून विकत घेण्याजोग्या वस्तू यांनाच सुख मानतोय असं दिसून येतं. पण वस्तूंना सुख मानणारी ही सुखवस्तू माणसं हे विसरतात की, सुख हे निर्जीव वस्तूत कधीही नसतं. तसं असतं, तर सगळेच पैसेवाले सुखी झाले असते. पैशांनी सुख विकत घेता आलं असतं, तर मग अनेक पैसेवाल्यांची व्यसनाधीन तरुण मुलं संध्याकाळी दिवसभराचं टेंन्शन उतरवायला बिअरबारकडे वळली नसती. व्यसनाधीन झाली नसती. पैसा म्हणजेच सर्वस्व असतं, तर मग अनेक श्रीमंतांच्या बायका घरदार-संसार सोडून दुपारच्या वेळी किटीपार्टी आणि क्लबमध्ये पत्ते कुटायला गेल्या नसत्या.

अधिक पैसे असले की अधिक सुख मिळालं असतं, तर पैसा आणि त्यातून विकत घेण्याजोगी सर्व साधनं दिमतीला उपलब्ध असूनदेखील घरी जाणं जीवावर येणारे कॉर्पोरेट सेक्टरमधले बिझी मॅनेजर दिसले नसते. शेतकऱ्यांनी कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या केल्या, तर त्या आपण समजू शकतो. पण मुबलक पैसा असूनही बडेबडे श्रीमंत व्यापारी आत्महत्या करतात त्यामागची कारणं नेमकी कोणती असतात…? पैसा म्हणजेच सर्वस्व असतं, तर श्रीमंत वर्गातले सुशिक्षित लोक स्वतःच्या प्रापंचिक अडचणी सोडविण्यासाठी एखाद्या बुवा-बापू-बाबाच्या नादाला लागले नसते. एक ना अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या आजूबाजूला सापडतील.

पैसे फेकून विकत घेता येतात ती फक्त निर्जिव साधनं. त्या साधनांचा योग्य तो वापर करून आपलं राहणीमान अधिक सुसह्य होऊ शकेल. दैनंदिन जीवनातला शारीरिक त्रास थोडा कमी होईल. पूर्वी पाट्या-वरवंट्यावर वाटण-घाटणाचे कष्ट आता मिक्सरमुळं कमी झालेत. दळणवळणाची साधनं वाढल्यामुळं प्रवासाची दगदग कमी झालीय. पूर्वीच्या पिढीला उपलब्ध नसलेल्या वस्तू आज आपल्यापाशी आल्यामुळं आपला वेळ आणि श्रम यांची बचत होतेय. ही वस्तुस्थिती मान्य करूनही असं आढळतं की, पूर्वीच्या तुलनेनं आपलं सामाजिक राहणीमान उंचावूनदेखील आजची पिढी अधिक व्यथित आहे, अधिक दुःखी आहे. विज्ञानानं दररोज नवनवीन शोध लागताहेत. तरीही…? याचं कारण म्हणजे पैशातून केवळ वस्तूच विकत घेता येतात.

पैसे असतील, तर माणूस उत्तम पलंग आणि गादी विकत घेऊ शकतो. पण झोप विकत घेऊ शकत नाही.
पैसे असतील, तर माणूस हॉटेलमधली उत्तम पक्वान्नं विकत घेऊ शकतो. पण भूक विकत घेऊ शकत नाही.
पैसे असतील, तर माणूस उत्तम चश्मा विकत घेऊ शकतो. पण दृष्टी विकत घेऊ शकत नाही.
पैसे असतील, तर माणूस तंबोरा विकत घेऊ शकतो. पण उत्तम गळा विकत घेऊ शकत नाही.
पैसे असतील, तर माणूस लेखणी विकत घेऊ शकतो. पण प्रतिभा विकत घेऊ शकत नाही.
पैसे असतील, तर माणूस औषधं विकत घेऊ शकतो. पण आरोग्य…?
पैसे असतील, तर माणूस पुस्तकं विकत घेऊ शकतो. पण ज्ञान…?
पैसे असतील, तर माणूस भ्रष्ट मार्गानं आपल्या वाह्यात मुलाच्या नावाचा विद्यापीठाच्या पदवीचा कागद विकत घेऊन देऊ शकतो. पण त्या मूर्ख मुलाला अक्कल विकत घेऊन देता येत नाही.
पैसे असतील, तर माणूस दिमतीला नोकर ठेवू शकतो. पण मित्र विकत घेता येत नाही.
पैसे असतील, तर माणूस दाई ठेवू शकतो. पण आई कधीही विकत घेता येत नाही.
जगातलं जे जे उत्तम, उदात्त आणि उन्नत आहे ते पैशांनी कधीही खरेदी करता येत नाही. कारण, त्या गोष्टी मुळात विक्रीसाठी बाजारात येतच नाहीत. त्या मिळवाव्या लागतात. स्वतः निर्माण कराव्या लागतात…!
हे सगळं ठाऊक असूनही आपण सुख शोधण्यासाठी साधनांच्या मागेच धावतो. हे हवं ते हवं आणखी तेही हवं. जोवर बसने जाण्याइतपत खिशात पैसे नव्हते, तेव्हा बसने जाणं म्हणजे सुख असं वाटायचं आता स्वतःच्या मालकीची एअर कंडिशन गाडी असूनदेखील परदेशी बनावटीची गाडी हवी असा हव्यास धरणारे आपल्याला आढळतात. जोवर घरात पंखा नव्हता, तोवर पंखा हवासा वाटायचा.

आता एअर कंडिशन असूनही जीवाची काहिली शमत नाही. वस्तूंच्या उपभोगाला कधीच अंत नाही. म्हणूनच सॉक्रेटिस बाजारात फिरून सगळ्या वस्तूंकडे पाहून म्हणायचा, “या सगळ्या वस्तू माझ्याकडे नसूनदेखील मी किती सुखी आहे.”
याच सॉक्रेटिसला एका शिष्यानं विचारलं होतं. “माणसाला खऱ्या अर्थानं सुख लाभण्यासाठी काय काय हवं?”
सॉक्रेटिसनं या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात दिलं होतं… “समाधान…!”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -