विशेष: निशिगंधा वाड
सर्वप्रथम मामांना नमस्कार आणि ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराचे मानकरी झाल्याबद्दल त्रिवार अभिनंदन! अभिनयाचे चालते-बोलते जिवंत विद्यापीठ म्हणजे अशोकमामा! अभिनयाचे अत्यंत सूक्ष्म अध्ययन करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या परिघात येणे हेच परिसाला स्पर्श करण्यासारखे आहे. माझे भाग्य हे की, सात दिवसांच्या अंतराने प्रदर्शित झालेल्या ‘एकापेक्षा एक’ आणि ‘शेजारी शेजारी’ या दोन्ही चित्रपटांत मला मामांची नायिका होण्याची संधी मिळाली. मामा आणि लक्ष्मीकांत ही द्वयीच होती. त्यांनी अत्यंत यशस्वी चित्रपटांची लाट आणली. त्या लाटेत काही शिंपले वर उचलले गेले आणि काही मोतिया क्षण आमच्या नशिबात आले. म्हणूनच आमची कारकीर्द किनाऱ्यापर्यंत पोहोचली. केवळ अभिनेता म्हणून नव्हे, तर व्यक्ती म्हणून उंची गाठणारा, संस्कृतीची पाळेमुळे घट्ट धरून राहणारा हा विलक्षण माणूस आहे. तो विद्वान आहेत. मामांचे संपूर्ण कुटुंबच शिक्षणाची कास धरून आहे.
व्यक्ती म्हणून असणारी माणसांची समृद्धी आयुष्याच्या विद्यापीठात आपण किती माणसे वाचतो यावर अवलंबून असते, असे मला नेहमी वाटते. या पार्श्वभूमीवर एकीकडे आयुष्याचा प्रवास, तर दुसरीकडे भूमिकांतर्फे जगलेले वैविध्यपूर्ण आयुष्य… यात किती भूमिकांचा अभ्यास, किती लोकांबरोबर काम करून तावून सुलाखून निघालेले हे व्यक्तिमत्त्व… त्याची लकाकी निश्चितच वेगळीच असणार! त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने मानाचा सन्मान देऊन त्यांना पुरस्कृत केले याबाबत कृतज्ञ वाटत आहे. इथे एक किस्सा सांगते. ‘टोपीवर टोपी’ हा चित्रपट आम्ही कोल्हापूरला चित्रित करत होतो. त्यातील एका गाण्यासाठी एका उंच क्रेनवर बसलो होतो. पाहतो तो खाली प्रचंड जनसमुदाय जमलेला दिसला. मला त्याचे कारण काही समजेना. सहजच मी मामांना कारण विचारले, तर ते शांतपणे म्हणाले, “पंचवीस वर्षे झाली ना!”
“…कशाला?” माझा पुढचा प्रश्न…
“माझ्या कारकिर्दीला…” त्यांचे तेवढेच शांत उत्तर.
इतक्या उंचीवर पोहोचल्यानंतरही दिसणाऱ्या त्यांच्या स्थितप्रज्ञ भावनेचे आणि स्वभावाचे मला आश्चर्य वाटले. मी याविषयी विचारले असता ते म्हणाले, “यावर काय बोलायचे. मी नेटाने काम करण्यावर विश्वास ठेवतो. किती वर्षं काम केले, हे मी कधीच मोजत नाही.” या मोजक्या वाक्यातूनच त्यांची संपूर्ण मानसिक बैठक समजते. खरे पाहता त्या क्षणी ते माझ्यासारख्या नवख्या मुलीसमोर शेखी मिरवू शकले असते. पण हा माणूस नाही, तर त्यांचे काम बोलते. अशोकमामांकडील ही बाब प्रत्येकाने शिकण्यासारखी आहे. आजकाल कोणीही स्वत:बद्दल बोलण्याची एकही संधी सोडत नाही. सगळे प्रसिद्धीलोलूप झालेले दिसतात. पण या दुर्गुणाचा स्पर्शही न झाल्यामुळेच ही माणसे मोठी आहेत, असे मला वाटते. या गुणवैशिष्ट्यांमुळेच ती अजूनही टिकून आहेत. त्यांना असे अनेक पुरस्कार मिळोत,
हीच शुभकामना. (शब्दांकन : स्वाती पेशवे)