Tuesday, April 22, 2025

विवाह

नक्षत्रांचे देणे: डॉ. विजया वाड

“विवाह खूप गोड असतो.” मंदाकिनी म्हणाली.
“कसलं गोड? रोज उठून तेच ते अन् तेच ते!” सुशमा बोलली.
“म्हंजे गं सुशे?” ऋजुतानं विचारलं.
“अगं धसमुसळ गं!” सुशी उत्तरली
“त्याचीच नं?” ऋजुतानं विचारलं.
“हो त्यांचीच, अगदी न चुकता! हिशेबनीस कसे हिशेब तपासतात रोज रोज तस्सं रोज रोज तेच एक कर्म!” सुशी करकुरली.

“तुला आवडत नै का ती धसमुसळ? नौरोजींची?”
“तशी आवडते गं.” सुशीनं कबूल केलं. “पण रोज रोज कंटाळा येतो त्या जवळिकीचा! शिवाय गंजीफ्रॉकचा वास नको वाटतो मला.”
“मग तो चुरगळा करून फेकायचा ना!”
“काम झाल्या झाल्या त्याला लागतो ना घालायला.”
“हं!” मंदी, ऋजुतानं होकार भरला.
ऋजुताचं लग्न ठरलं होतं. मंदी नि सुशी याबाबतीत ऋजुताला सीनियर होत्या. नाही म्हटलं तरी ऋजुताला धडकी भरली.
आपण पहिल्या रात्रीच स्ट्रिक्ट राहायचं. वाटेल तशी धसमुसळ खपवून घेतली जाणार नाही, असा चक्क खणखणीत इशारा द्यायचा. म्हणजे तो घाबरेल नि मग… जपून करेल काय करायचं ते.

“ऋजू, पहिली रात्र जपून काढ गं बाई.” ऋजूची आई काळजी करीत म्हणाली. तिला लेकीची काळजी वाटणं किती साहजिक होतं ना!
“हो गं आई नको काळजी करू. एवढे विवाह रोज होतात. नि निभतात सुद्धा.” ती आईला म्हणाली.
विवाह संपन्न झाला. त्याने हलकेच एक चिमटा काढला. तशी ती कळवळली.
“काय हा रानटीपणा?” तिनं रागावून म्हटलं.
“सॉरी गं खूप खूप सॉरी.” त्याचं अगदी गरीबंड कोकरू झालं. त्याचा उतरलेला चेहरा बघून नव्या बायकोला वाईट वाटलं.
“रागावलास?” ती लाडानं म्हणाली.
“नर्व्हस झालो. मी पटकन् उतरतो.”
“उतरतो म्हणजे?”
“उतरतो म्हणजे, लग्गेच नर्व्हस होतो.”
“बरं बरं! पुन्हा नाही रागावणार.” नवरा नवाकोरा होता ना! तिनं समजुतीनं घेतलं. लाजाहोम, सप्तपदी सारे विधी यथासांग पार पडले. विवाहविधीचे उरले-सुरले काम संपले.

“प्रभा, आपण कुठे जातोय?”
“कुठे म्हणजे?”
“चाळीत?”
“हो. चाळीतच. तू चाळकरीच पसंत केलास ना?”
“अरे मधुचंद्राला म्हणते मी.”
“मधुचंद्र?”
“हो. हनिमून! निदान माथेरान तरी वारी करूया रे.”
“मला का हौस नाही? अगदी निकम्मा समजू नकोस मला तू.”
“निकम्मा नाही समजत. बस् सुकम्मा समजते.” ती उत्तरली
“हे बघ, लग्न कर्ज काढून केलं आहे.”

“काय कर्ज?”
“तुझा हट्ट होता ना! निम्मा करू खर्च! निम्मा तुम्ही नि निम्मा आम्ही.”
“ते योग्य आहे ना पण?”
“पण मला झेपलं नाही गं ते. मी तुझ्यापासून काय लपवू आता?
“श्री शिल्लक शून्य आहे. आपल्याला चाळीतच जावे लागणार आहे.”
“मख्खड आहेत तू. भावनाशून्य!”
“पैशाची सोंग आणता येत नाहीत.”
“अरे पण कर्ज काढायचं ना!”
“नि ते फेडणार कोण?”
“तू? दुसरं कोण?”

“मी? माझा अख्खा पगार घरखर्चात जातो. त्यातून तुझा पगार तू माहेरी देणार.”
“काय करू रे? एकदम चाळीस हजार रुपये कमी झाले तर, माहेर माझं उपाशी राहिलं. मी आधीच कबूल करून घेतलंय सारं!”
“घेतलंयस ना!”
“का कबूल झालास?”
“आज ना उद्या तू मूलबाळ झाल्यावर कबूल होशील सासरघरी पैसे द्यायला.”
“आणि कधीच नाही झाले तर?”
“तर मी एक वेळचाच जेवेन.”
“अरे का रे हा आततायीपणा?”
“हे बघ, मला तू आवडलीस एकदम. बायको मटेरियल म्हणून पसंत पडलीस. विवाह करावा अशी स्त्री वाटलीस म्हणून…”
“बरं. समजलं!” ती एकदम शहाणी झाली.
“शहाणी माझी बाय ती!” ज्याचा विवाह दोन शहाण्या माणसांप्रमाणे संपन्न झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -