ग्रंथालये : परिवर्तनाच्या वाटेवरील क्रांतिदूत

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर


ग्रंथालये हा आपल्या समाजाचा श्वास आहे, ही जाणीव टप्प्याटप्प्यावर मला होत राहिली आहे. लहानपणी माझ्या विक्रोळीच्या उदयाचल शाळेत सुसज्ज ग्रंथालय होते. आमची शाळा आठ तासांची होती, त्यामुळे मधल्या सुट्टीत किंवा वाचनाच्या तासालाच तिथे जाण्याकरिता वेळ मिळायचा. पुढे सोमैया महाविद्यालयातले दोन मजली ग्रंथालय, तिथली आवडती जागा नि पुस्तकांची भरलेली कपाटे यांना माझ्या आयुष्यात फार मोठे स्थान आहे. १९६० सालापासूनच्या या ग्रंथालयात अगणित पुस्तके आहेत. मुक्तपणे कपाटे पाहता येतात, हे या ग्रंथालयाचे वैशिष्ट्य, त्यामुळे हव्या त्या विषयावरची पुस्तके मनसोक्तपणे शोधता येतात.  पुढे एम.ए.साठी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला.


राजाबाई टॉवरमधील विद्यापीठाच्या ग्रंथालयाची वास्तू अविस्मरणीय आहे. तिथल्या ग्रंथालयात दिवसभर अभ्यास करण्यात अवर्णनीय आनंद असायचा. याच काळात दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची ओळख झाली. वृत्तपत्रीय कात्रणे, मासिके यांचे दुर्मीळ संदर्भ सापडले की, अमाप आनंद व्हायचा. माझ्या डॉक्टरेटच्या अभ्यासात ग्रंथालयांचे योगदान मोठे आहे.  या सर्व ग्रंथालयांची आठवण आली, ती ठाणे जिल्ह्यातील ग्रंथालयांच्या अधिवेशनानिमित्ताने. ठाण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय या अधिवेशनाच्या आयोजकांच्या प्रमुख भूमिकेत होते. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात रंगकर्मी सुहास जोशी यांचे भाषण ऐकले. रंगभूमीविषयक पुस्तकांमुळे होणारे संस्कार किती मोलाची भूमिका बजावतात, हे या भाषणातून त्यांनी सहज उलगडले. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रदीप कर्णिक होते. रूपारेलसारख्या प्रथितयश महाविद्यालयाचे ग्रंथपाल, मराठी संशोधनपत्रिकेच्या संशोधनाचा अनुभव नि व्यक्तिमत्त्वाला व्यासंगी अभ्यासकाचे परिमाण यामुळे कर्णिकांचे भाषण ऐकण्याची उत्सुकता होती.


ग्रंथालय सेवकांची उपेक्षा नि त्यांना मिळणारे तुटपुंजे वेतन याकडे कर्णिक यांनी लक्ष वेधले. शासनाच्या प्रस्तावित ‘मराठी विद्यापीठा’त ग्रंथालये व ग्रंथालयशास्त्र, तसेच त्याविषयीचे अभ्यासक्रम यांना महत्त्वाचे स्थान असले पाहिजे हा मुद्दा मांडला. अनेक ग्रंथालयांची आजमितीला दुरवस्था झालेली आहे. धुळीने कपाटे भरली असतील, तर ग्रंथालय सेवकांना त्रास होऊ शकतोे म्हणून त्यांनी आपली योग्य काळजी घ्यावी, असे मत साहित्यिक-समीक्षक डॉ. अनंत देशमुख यांनी आवर्जून व्यक्त केले. ग्रंथालये क्रांतीचे दूत बनून समाजात काम करतात. मात्र आपल्या समाजात त्यांचे मोल समजून घेतले जात नाही. वाचक आहेत तिथे ग्रंथालये अपुरी पडतात, तर ग्रंथालये आहेत तिथे वाचक नाही, अशी परिस्थिती आज आहे. कल्पक ग्रंथपाल वाचकांना वाचनाकडे आकृष्ट करतात.


विद्यार्थ्यांमध्ये वाचनप्रेम रुजवणाऱ्या अतिशय मेहनती ग्रंथपालाशी नुकतीच माझी भेट झाली. परितोष पवार मुलुंडच्या केळकर महाविद्यालयात कार्यरत आहेत. वाचनकट्टा, बातमीपत्र, ग्रंथालयाची वेबसाइट, विशिष्ट विषयावरील पुस्तकप्रदर्शन, ई - वाचनस्त्रोतांचा उचित उपयोग एक ना दोन असंख्य उपक्रम परितोष राबवत आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने एखादा विषय त्यांच्यासमोर मांडणे व त्या प्रकल्पाकरिता अनेक संदर्भांचा शोध ग्रंथपालांनी घेणे, हे पवार सर सातत्याने करत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज वाचनासाठी अनेक दिशा उपलब्ध आहेत. परितोष पवारांसारखा ग्रंथपाल याकरिता प्रयत्न करतो. ग्रंथपाल कल्पक नसेल, तर ग्रंथालयाची दुर्दशा होते. त्यामुळे नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या व अद्ययावत समकालीन ज्ञान असणारे ग्रंथपाल ही काळाची गरज आहे.

Comments
Add Comment

मराठी साहित्याचा विश्वास

९९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड यंदा

मोदींची दूरदृष्टी: मिशन कर्मयोगी

सार्वजनिक प्रशासनाच्या क्षेत्रात भारत काहीतरी अभूतपूर्व करण्याचा प्रयत्न करत आहे. तो केवळ अधिकाऱ्यांच्या

बालेकिल्लाही भाजप विचारांचा होतोय

तरुण मतदारांच्या अपेक्षा रोजगार, शिक्षण व उद्योजकतेशी निगडित आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी अजूनही पारंपरिक

नाशिक इंडस्ट्रियलची डेस्टिनेशनकडे वाटचाल

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट टेस्टिंग लॅब ही ऊर्जा मीटर्स ट्रान्सफार्मसी ऑइल इन्सुलेशन प्रयोग शाळा, केबल,

निकालात गरुडभरारी, अ‍ॅडमिशनचे काय?

दहावी-बारावीचे निकाल लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा सावित्रीच्या लेकीच हुशार ठरल्याने मुलांहून त्यांचा

ऑपरेशन सिंदूर : आधुनिक युद्धतंत्रातील निर्णायक विजयश्री

जॉन स्पेन्सर भारताने ऑपरेशन सिंदूर समाप्त झाल्याचे अद्याप जाहीर केलेले नाही. मोहिमेमध्ये घेतलेला एक संवेदनशील