निसर्गवेद: डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
पुराणात जटायूबद्दल अनेक कथा आहेत. पुराणानुसार विष्णूचा वंशज म्हणजेच ब्रह्मा- मरीची- कश्यप- अरुण- जटायू आहे. गरुडाचा भाऊ अरुण त्याची पत्नी अरुणा म्हणजेच श्येनी यांचे पुत्र एक जटायू आणि दुसरा संपता. माझ्या अध्ययनानुसार, जटायू शब्दशः अर्थानुसार जटाधारी+ खूप आयुर्मान असणारे आणि दुसरी गोष्ट जटायूचे वर्णन, त्या काळात ऋषीमुनी तपश्चर्या आणि यज्ञ करीत असताना अनेक राक्षस त्यांना त्रास देत असत. जटायू यांना ऋषी निशाकर यांनी दंडकारण्यावर पहारा आणि रक्षण करण्याचे कार्य सोपविले होते. इक्ष्वाकुकुलीन अयोध्येचा राजा दशरथ जेव्हा शिकारीसाठी या अरण्यात गेले, तेव्हा ते जटायूचे परममित्र झाले. रामायणातील ‘अरण्य कांड’मधील अध्याय ५१मध्ये जटायू आणि रावणातील युद्धाचे सविस्तर वर्णन आहे. गरुड, गिधाडे आणि घारीसारखे उंच उडणारे पक्षी हे खूप शक्तिशाली आणि आक्रमक असतात. हा शक्तिशाली पक्षी असल्यामुळे यांची रामायणात याच गोष्टींसाठी निवड झाली.
जेव्हा रावण सीतामाईचे अपहरण करून तिला त्याच्या रत्नजडित रथात सोबत घेऊन आकाशात उडाला, तेव्हा जटायू नेहमीप्रमाणे सीतामाईचे संरक्षण करण्यासाठी पहारा देत होते. तेव्हा त्यांनी रावणाला अडविले. रावणाने त्याची शक्तिशाली अस्र, शस्त्र वापरून जटायूला घायाळ केले; परंतु जटायूने रावणाचा रथ, त्याची छत्री सर्व काही उद्ध्वस्त केले. जटायूने त्यांच्या मजबूत पंख आणि पंजांनी प्रहार करून रावणाचे रत्नजडित धनुष्य-बाण दोन्हीही तोडले. राक्षसी डोक्याच्या तीव्र वेगाने धावणाऱ्या घोड्यांना मारून टाकले. रावणाच्या दाही भुजा आणि चेहऱ्यावर जटायू प्रहार करीत होता; परंतु रावणाला परत भूजा येत होत्या. रावणाच्या पाठीत चोच खुपसून त्याला घायाळ करीत होता. शेवटी जखमी अवस्थेत जटायू रावणाला म्हणाला की, “रावणा, तू जे सीतामाईचे अपहरण करून पापकर्म करीत आहेस ते तुझा विनाश होण्यासाठीच. तू करीत असलेल्या तुझ्या पापामुळे तुझे सर्व नातेवाईक आणि तुझ्या प्रजेचा नाश होणार आहे. आता तरी तू सीतामाईला सोड. हे रावणा तुझ्या पापकर्माचा शेवट हा मृत्यूच आहे. तुला परमेश्वरसुद्धा आता वाचवू शकणार नाही.”
जटायूच्या उपदेशात अनेक न्याय, सज्जनता, नैतिक सिद्धांत, जीवनावश्यक कर्म यांचे वर्णन आहे. जटायूने उद्ध्वस्त केलेल्या रथाचा, सर्व शस्त्र आणि जटायूच्या उपदेशाचा रावणाला खूप राग आला. दुसरे कोणतेच हत्यार नसलेल्या रावणाने रागाने त्याच्याकडे असलेली तलवार उपसली आणि वृद्ध आणि थकलेल्या जटायूचे पंख छाटले. त्याला त्याच अवस्थेत सोडून रावण सीतामातेला घेऊन निघून गेला.
अत्यंत पराक्रमी जटायू जखमी मरणासन्न स्थितीत पाहून राम-लक्ष्मणाला अतिशय वाईट वाटले. मृत्यूपूर्वी जटायूंनी रामाला सांगितले की, “रावण वायू मार्गे दक्षिणेकडे सीतेला घेऊन गेला आणि आता रावण वाचू शकणार नाही. त्याच्या कर्माचे फळ त्याला मिळेल”, असे म्हणून जटायूने आपला प्राण सोडला. दोन पराक्रमी योद्ध्यातील हे वर्णन वाचताना साक्षात युद्ध दिसायला लागते. एवढे सविस्तर वर्णन वाल्मिकींनी केले आहे. म्हणजे पंचवटीपासून ते आंध्रपर्यंत आकाशात युद्ध चालले होते. ज्याने जिथे युद्ध होताना पाहिले त्यांना तेथेच वाटले. खूप जखमी झाल्यामुळे आणि वृद्ध असल्यामुळे शेवटी हा पराक्रमी जटायू पंख कापल्यामुळे थकून लेपाक्षी येथे अत्यंत जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेत पडले, जेव्हा राम-लक्ष्मण-सीतेला शोधून न मिळाल्यामुळे परतले, तेव्हा त्यांना लेपाक्षी येथे जखमी अवस्थेत जटायू दिसले. कोणत्याही पक्ष्याचा कधीच दाहसंस्कार होत नाही. पण येथे राम आणि लक्ष्मणाने जटायूचा दाहसंस्कार केला. कारण जटायू सीतेसाठी एक पिता होते, एक देवपक्षी होते. आता जटायूचे ‘राष्ट्रीय उद्यान’ येथे आहे.
रामायणानुसार जटायू दिव्यशक्ती असणारा, त्याच्या भावना आणि संवाद साधणारा, पराक्रमी असा हा रामायणातील महत्त्वाचा देवपक्षी आहे. जटायू आणि संपाती भावाचे वर्णन काळे पंख, मजबूत-बाकदार चोच, टोकदार नखांचे पंजे असणारे शक्तिशाली गरुड म्हणूनच आहे. जेव्हा राम, सीता आणि लक्ष्मण यांनी पंचवटीत प्रवेश केला, तेव्हा हा शक्तिशाली पक्षी एका मोठ्या वडाच्या झाडावर बसलेला त्यांनी पाहिला. त्याचे पंख एवढे मोठे होते की, त्याने वडाचे पूर्ण झाड झाकून टाकले होते. म्हणजेच जटायू प्राचीन काळात किती भव्यदिव्य आणि शक्तिशाली असेल. (शिवाय येथील वर्णनात कुठेही पीस विरहित डोके आहे असे दिलेले नाही.) दुसरी महत्त्वाची गोष्ट मी जेव्हा गरुडाचे चित्र काढताना जे काही अध्ययन केले, त्यानुसार माझ्या मते, (गरुडाची पीस जी चोची पासून मानेपर्यंत जातात त्या सर्वांचा लांबटपणा हा वाढत जातो जो मानेपर्यंत आल्यानंतर एखाद्या जटेसारखा वाटतो. एकंदरीतच गरुडाच्या पिसांचा आकार हा लांबटच असतो आणि प्राचीन काळात, तर ही मानेवरील पिसं म्हणजे नक्कीच जटेसारखी दिसत असतील.)
त्या क्षणाला त्यांना तरी जटायू साक्षात राक्षस वाटला; परंतु रामाला त्याने स्वतःची ओळख सांगताना सांगितले की,
“अकाक्षेदविजस्तस्मैकुलमात्मनमेवच
जटायूरितम्विधिश्येनिपुतरामरिन्दमा”
याचा अर्थ की, “मी जटायू आहे. कृपया हे समजून घ्या की, मी श्येनीचा पुत्र आहे. जर तुम्हाला जंगलात राहताना कोणताही त्रास झाला, तर मी कायम तुमची मदत करीन आणि जर तुम्ही बाहेर गेला, तर मी सीता मातेचे रक्षण करीन.” ‘जटा’चा अर्थ संरक्षण असाही होतो. रामायणात ग्रुध्रराज जटायूला म्हटले आहे, कारण ग्रुध्रराज नावाचा एक पर्वत होता जो गरुडाच्या आकाराचा आहे. गरुड हा सूर्यवंशी होता म्हणजेच राजवंशी. तेव्हा तो गिधाड कसा असेल? गरुड गिधाडांपेक्षा नक्कीच कठोर नाही. कारण, वर्णनामध्ये जटायूची भाषा कोमल म्हटली आहे. आजही वैज्ञानिक आणि पंडितांमध्ये जटायू हा गरुड की गिधाड यात संभ्रम आहे. अध्यात्म आणि शास्त्र याच्या संगमाने मी माझ्या अध्ययनानुसार एवढेच माझं मत मांडू शकते की, माझ्या वाचनाप्रमाणे जटायूच्या आईचे वर्णन हे गिधाड प्रजातीतील असून वडिलांचे वर्णन हे गरुड पक्ष्याचे आहे. कदाचित यांच्या संगमाने निर्मित झालेला हा जटायू पक्षी असू शकतो. गिधाडाच्या पुढच्या लेखामध्ये मी ही माहिती तुम्हाला अजून देईन.
एकंदरीतच जटायूच्या वर्णनावरून इमानदार, विश्वसनीय, निस्वार्थी, आधारयुक्त, दयाळू, नम्र आणि संरक्षक अशी ही गरुड असतात. खरं तर कोणताही पशू किंवा पक्षी याला तुम्ही जीव लावला, तर तो तुमचा संरक्षकच होतो. आपल्या हिंदू धर्मात असणाऱ्या सर्व महापुराणे, ग्रंथ, महाकाव्य यात असणाऱ्या सर्व घटना या मानवाला मानवाच्या जीवनासाठी प्रतीकात्मक आहेत. सर्व स्त्रियांचा आदर आणि संरक्षण करणे हे आवश्यकच आहे. रावणासारखे काही दुराचारी जे या जगात आहेत, त्यांचा विनाश होणे निश्चितच आहे. आताच्या अराजकतेमध्ये स्त्री अपमान करणारे हे रावणच आहेत. आज आपल्या पुराणातील प्रत्येक कथा आपल्याला जीवन जगायला शिकवितात. हे प्रत्येकाने सकारात्मकपणे घेऊन लक्षात ठेवावे. भारतीय हिंदू संस्कृती, संस्कारांमध्ये जेवढी महाकाव्य, महापुराणे आहेत त्या सर्व ग्रंथांमध्ये निसर्ग, पशू-पक्ष्यांसह जीवसृष्टीतील प्रत्येक घटक ही महत्त्वाची भूमिका निभावत आहे. परमेश्वराचे वाहनसुद्धा पशू-पक्षीच असतात. प्रत्येक सण- उत्सवांमध्ये आपल्याला निसर्ग, पशू-पक्षी हे पूजनीय आहेत.
आपल्याकडे समाजात जसे कायदे असतात, तसे जंगलात पण असतात. जंगलात हे नैसर्गिक कायदे असतात आणि त्या कायद्याप्रमाणेच प्रत्येक जीव हा चालत असतो. तो नैसर्गिक कायद्याविरुद्ध कधी जात नाही कारण, नैसर्गिक कायद्याविरुद्ध गेलेल्याचा नेहमी अंतच होतो. पूरक पंचतत्त्वामुळे मिळणाऱ्या शारीरिक आणि मानसिक पूरक आहारामुळे जंगलातील सर्व जीवसृष्टी ही सशक्तच असते. जंगलात नैसर्गिक साखळी ही नैसर्गिकरीत्याच चालत असते आणि वन्यजीवांचे संतुलन त्याचबरोबर होत असते. नैसर्गिक रचनेनुसार जर यांना अन्नाची गरज असेल, तर उंच उडणाऱ्या पक्ष्यांना तेवढं तीक्ष्णदृष्टीचं आणि मजबूत राहावंच लागेल, कारण त्यांना जमिनीवरील शिकार करायची असते. त्यासाठी तीक्ष्ण दृष्टी आणि आक्रमकता हे नैसर्गिकरीत्या परमेश्वराने बनवलेले आहे. प्राचीन काळातील आपल्या संस्कृती आणि संस्कारांमुळे पंचतत्त्व खूप सुदृढ होती. त्यामुळे सर्व जीवसृष्टी ही सुदृढ आणि सशक्तच होती. त्या काळात निसर्गाबरोबरच मानवासकट सर्व जीवसृष्टी सशक्त आणि आरोग्यवंत होती. आत्ताच्या काळातील गरुड उंटाचे पिल्लू उचलू शकते, तर त्या काळातील गरुड हा किती विशालकाय आणि अवर्णनीय शक्तीचा असू शकतो? म्हणजेच त्या काळात असलेल्या प्रत्येक जीवाची शारीरिक क्षमता ही किती सुदृढ आणि मजबूत असेल, याचा विचार करा.
सर्व आज गिधाडांनाच जटायू म्हणत आहेत; परंतु हे चुकीचे आहे. गिधाड जटायू नाही. पर्यावरणपूरकता नसल्यामुळे सर्व भव्यदिव्य आणि विशालकाय जीवसृष्टी मुळातच नामशेष झालेली आहे. त्यामध्ये जटायू हा पक्षीसुद्धा पूर्णपणे नामशेषच झाला आहे. आता पण प्रगतीच्या नावाखाली जो काही विद्ध्वंस करीत आहोत, त्यामुळे निसर्ग कमकुवत झाला आहे. त्याचप्रमाणे जीवसृष्टीचीसुद्धा निर्मिती होत आहे. म्हणजेच आपलेसुद्धा आयुष्य कमी होत आहे आणि आपणसुद्धा कमकुवतच होत आहोत. निसर्गनिर्मिती आणि जीवसृष्टी ही एकमेकांवर अवलंबून असते.
खरं तर गरुडांची संख्या कमी झालेली आहे. त्याची कारणे रासायनिक खते. ज्यामुळे अन्न-धान्य, खाल्लेले पशुपक्षी विषारी होतात. प्रदूषण, वृक्षतोड अशी अनेक कारणे आहेत. गरुड जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यांची संख्या वाढावी, यासाठी विविध उपक्रम भारत सरकारने केले आहेत. हिंदूंनीच एकमेकांविरुद्ध जाणं आणि आपल्या धर्माच्या विरुद्ध बोलणं म्हणजे आपलं हिंदुस्तान कमकुवत करण्यासारखं आहे. हिंदू धर्म हा श्रेष्ठ आहेच आणि कायमच राहणार. त्याचे कारण म्हणजे शास्त्रीय आणि आध्यात्मिकतेचा संगम हा उच्च प्रतीचा असून संस्कार आणि संस्कृती ही अतिशय श्रेष्ठ आहे, जी या निसर्गाला आणि या जीवसृष्टीला सुदृढ करणारी आहे. ब्रह्मांडापासून ते जीवसृष्टीपर्यंत असणारी संरक्षितता आणि सुरक्षितता सर्व काही या महापुराणांमध्ये, वेदांमध्ये, मंत्रांमध्ये प्रत्येकांत आहे. परमेश्वराची व्याख्या म्हणजे निसर्ग आहे. निसर्गावर प्रेम करा निसर्गाची भक्ती करा. आता तरी सर्वांनी डोळे उघडा आणि या निसर्गदेवतेची पूजा करा. म्हणजे नक्की काय करावे लागेल, हे तुम्हाला सांगावयास नको!
dr.mahalaxmiwankhedkar @gmail.com