Thursday, May 1, 2025

कोलाजसाप्ताहिक

शुभस्य शीघ्रम...

शुभस्य शीघ्रम...

मनस्विनी: पूर्णिमा शिंदे

शुभकार्यास वेळ कशाला? कबिरांचा एक दोहा आठवतो, ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब कर.’ आपण काय करू शकतो, यादृष्टीने आपण स्वतःकडे पाहावे. शिक्षक दार उघडून देतो, पण आत प्रवेश तर तुम्हालाच करायचं असतो. एक चायनीज म्हण आहे, तुम्ही काय करू शकता, हे जगाला सांगू नका, तर करून दाखवा!! ध्येय संपादन करण्यासाठी योजना निश्चित करा. रोज नवनवीन योजना बनवा, योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला एक मिनिट ती योजना अमलात आणताना दहा मिनिटे वाचवतो.

झाड तोडण्यासाठी माझ्याकडे आठ तास असले, तर त्यातले ६ तास मी कुऱ्हाडीला धार लावण्यामध्ये घालवीन, असं अब्राहम लिंकन म्हणतो. वाट पाहू नका, सुरुवात करा. सुरुवात करण्यासाठी तुम्हाला अगदी हवी तशी वेळ कधीच येणार नाही! जिथे तुम्ही आहात, तिथून जी काही साधने तुमच्याकडे आहेत त्यांना घेऊन सुरुवात करा... आत्ता! सुरू ठेवा कार्य पूर्ण होईल. लक्षात ठेवा थकणे हा पर्याय नाही!! माणूस थकल्यानंतरही बरंच अंतर चालू शकतो; मेहनतीला पर्याय नाही. आयुष्यात जी गोष्ट तुम्हाला पाहिजे, तिची काहीतरी किंमत तुम्हाला द्यावीच लागते.

सलग १०० तास काम करून विक्रम नोंदविणारे लोकसुद्धा आहेत. होंडा नामक व्यक्तीबद्दल असं म्हटलं जातं की, तो इतका कामात व्यग्र असायचा की त्याची एकाग्रता भंग करणं अशक्यच... म्हणून तर हे नाव जगात सगळीकडे गेलं. ध्येयाच्या वेडाने ग्रस्त लोक कामात एवढे गढून जातात की, थकण्याची आठवणही त्यांना राहत नाही. आपण जर स्वतःच ठरवलं की, आपण एका तासानंतर थकणार, तर त्या एका तासाची वाट बघणार की सारखं तेच आठवण काढत राहणार? हेनरी डेव्हिड म्हणतो, “स्वतःच्या जीवनाचा स्तर स्वतःच्या मेहनतीने उंचावण्याची निर्विवाद योग्यता माणसाजवळ आहे.” यापेक्षा दुसरी प्रेरणादायी गोष्ट मला माहीत नाही.

चिकाटीची जागा जगात कुठलीच गोष्ट घेऊ शकत नाही. कुठलीच प्रतिभा बुद्धिमत्ता, विद्वत्ता नाही, तर चिकाटीसमोर कोणीही चिकाटीची तुलना सतत पडणाऱ्या पाण्याशी करता अतिकठीण दगडालाही ते झिजवून टाकते आणि निशाण करून जाते. यशस्वी होणारा माणूस कार्य सोडत नाही आणि सोडणारा माणूस कधीच यशस्वी होत नाही. त्यासाठी छोट्या-मोठ्या कारणामुळे यश सोडून चालणार नाही. ध्येयप्राप्तीपर्यंत सचोटी कसोटी हातोटी करावी लागते, हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

काम पूर्ण होईपर्यंत काम निरंतर सातत्याने अविरत अखंड अथक अटळ संपूर्ण शारीरिक, मानसिक शक्ती एका गोष्टीवर केंद्रित करा. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचताना प्रथम मनाला समजवा. कसोटीचा काळ हा सुनियोजन, प्रदीर्घ मेहनत, सातत्य, सराव, सहिष्णुता आणि सुयश असा क्रम हवाच. चला तर देर किस बात की... जब जागे वही सबेरा! आपल्या बकेट लिस्टला पूर्ण करण्यासाठी प्रेरणादायी बनवूया.

Comments
Add Comment