गौरव : प्रेमाची पोहोचपावती

Share

विशेष: किशोरी शहाणे

नुकतेच कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ सालचा मानाचा ‘महाराष्ट्रभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर करण्यात आला आहे. अशोक सराफ यांनी अशी ही बनवा-बनवीसह असंख्य मराठी चित्रपट आणि नाटकांतून आपल्या चतुरस्र अभिनयाने त्यांनी रसिकांवर अधिराज्य गाजवले. केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडवले आहे. मराठी चित्रपट सृष्टीचे लाडके अशोक मामा यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री किशोरी शहाणे आणि अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलेले मनोगत…

अशोकजी एखाद्या-दुसऱ्या माणसाला नव्हे तर संपूर्ण युनिटलाच सांभाळून घेतात. यामागे प्रोजेक्ट चांगले झाले पाहिजे, हाच उद्देश असतो. कॅमेऱ्याच्या मागे काय होते, हे त्यांच्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नसते. आजपर्यंत त्यांच्याइतका प्रामाणिक आणि कामाला चोख माणूस मी पाहिला नाही. अशा या ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तीला आणि मनस्वी अभिनेत्याला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले जाणे निश्चितच आनंददायी आहे.

अशोक सराफ हे नाव मराठी तसेच हिंदी चित्रसृष्टीत वेगळाच दबदबा राखून आहे. त्यामुळेच त्यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराने सन्मानित करणे हा शासनाचा उचित निर्णय आहे, असेच म्हणावे लागेल. त्यांच्या या गौरवाचा व्यक्तिश: मला अतिशय अभिमान वाटत आहे. हे कमाल व्यक्तिमत्त्व या पुरस्काराला पूर्णपणे पात्र आहे. अभिनेता म्हणूनच नव्हे, तर एक व्यक्ती म्हणूनही मी त्यांना जवळून पाहिले आहे. ‘प्रेम करू या खुल्लमखुल्ला’ या माझ्या पहिल्या चित्रपटात ते सहकलाकार होते, तर लक्ष्मीकांत बेर्डे माझे हिरो होते. त्यावेळी मी चित्रपटसृष्टीत अगदीच नवखी होते. पण ते दोघे मात्र सुपरस्टार होते. अशोक मोठे नायक होते, तर लक्ष्मीकांत उदयोन्मुख सुपरस्टार होता. या दोघांबरोबर काम करण्याची संधी मिळाली हे भाग्यच म्हणायला हवे. त्यावेळी मी १६ वर्षांची होते. त्यांनी मला चांगल्या प्रकारे सांभाळून घेतले. मला नवखेपणाची जाणीवही होऊ दिली नाही. खरे तर सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. पण माझ्या सहज लक्षात याव्यात, अशा पद्धतीने त्यांनी मला कामातले सगळे बारकावे शिकवले आणि आत्मविश्वास देऊ केला. ‘माझा पती करोडपती’ हा माझा दुसरा चित्रपटही त्यांच्याबरोबरच होता आणि त्यानंतरचे बरेच चित्रपटही त्यांच्याच बरोबर होते. थोडक्यात, अशोक सराफ आणि माझी जोडी चांगलीच गाजली. रसिकांना ती आवडली. त्यामुळेच मी अशोकबरोबर ‘चंगू मंगू’, ‘आत्मविश्वास’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ असे अनेक चित्रपट केले. इतकेच नव्हे, तर अलीकडे ‘जीवनसंध्या’ या चित्रपटामध्ये माझी आणि अशोकजींची जोडी होती.

आमच्यामध्ये प्रथमपासून खूप छान केमिस्ट्री होती. त्यामुळेच आम्ही दोघेही कामाचा आनंद घेऊ शकलो आणि अभिनेता तसेच व्यक्ती म्हणून एकमेकांना चांगले समजून घेऊ शकलो. अशोकजी एखाद्या-दुसऱ्या माणसाला नव्हे तर संपूर्ण युनिटलाच सांभाळून घेतात. यामागे प्रोजेक्ट चांगले झाले पाहिजे, हाच उद्देश असतो. कॅमेऱ्याच्या मागे काय होते, हे त्यांच्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नसते. आजपर्यंत त्यांच्याइतका प्रामाणिक आणि कामाला चोख माणूस मी पाहिला नाही. आधी मी स्वत:साठी वेगळा डबा मागवत असे. पण अशोक मात्र केटरर देईल ते ताटभर खात असत. मग ते तेलकट असो वा तिखट… अर्थात त्यांचा आहार कमी आहे. पण वाढले जाईल ते खाणे ही त्यांची पहिल्यापासूनच सवय… स्वत:च्या वेगळ्या अशा काही मागण्या नाहीत. ‘ऐका दाजीबा’ या माझी निर्मिती आणि पतीचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटातही आम्ही त्यांच्या या स्वभावाचा अनुभव घेतला. आम्ही दोघेही त्यांना उशिरा येण्यास सांगायचो. त्यासाठी आधी अन्य कलाकाराचा सीन घेत असल्याचे त्यांना कळवले जायचे. पण तरीदेखील अशोकजी साडेआठच्या ठोक्याला सेटवर हजर असत. लवकर येण्यामागचे कारण विचारता “युनिट असलेल्या ठिकाणी वेळ घालवणे मला आवडते…” असे ऐकायला मिळायचे. असे समर्पण बघायला मिळणे आता अवघड झाले आहे. काम संपायला रात्रीचे १० वाजले तरी अशोकजींची कुरकुर नसायची. इतर सहकलाकार पॅक-अप कधी होतेय याची वाट बघत असताना हा माणूस मात्र शांतपणे काम करताना दिसायचा. खरे सांगायचे, तर यातच अशा माणसांचे मोठेपण सामावलेले असते. त्यांना दुरून न्याहाळले, त्यांची काम करण्याची पद्धत पाहिली तरी एखादी व्यक्ती मोठी कलाकार होऊ शकते, स्टार बनू शकते. शेवटी अभिनेता असण्याबरोबरच माणूस म्हणून तो कसा आहे ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरते.

माझ्यामध्ये अशोक आधी खूप मोठा आणि चांगला माणूस आहेत. म्हणूनच या सन्मानासाठी सर्वार्थाने पात्र आहेत. आजकालचे तथाकथित स्टार्स वा नामवंत कलाकार आपल्यावरच कॅमेरा कसा राहील, या विचारात असतात. आपल्यापेक्षा छोट्या कलाकारांकडे त्यांचे लक्षही नसते. मात्र अशोकजींनी कधीच असा विचार केला नाही. सीन चांगला कसा होईल, हा विचार करूनच त्यांनी प्रत्येक भूमिका पेलली. छोट्यातल्या छोट्या वा नवीन कलाकाराच्या तोंडी महत्त्वाचे वाक्य असेल, तर त्याला महत्त्व दिले गेले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. मोठ्या कलाकाराचे असे विचार अनेकांना प्रेरित करत असतात, घडवत असतात. म्हणूनच जशी एक लता मंगेशकर तसेच एकच अशोक सराफ आहेत असे मी म्हणेन. त्यामुळे त्यांना असे मोठे पुरस्कार मिळायला हवेत.

आज ‘चंगू मंगू’ चित्रपटाच्या वेळेचा एक प्रसंग आठवतोय. त्यात मी, निवेदिता, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे अशा चौघांचे एक गाणे होते. आम्ही दोघी रुसल्या असल्याने ते आमची समजूत काढत असल्याचा साधारण भाव होता. त्यात मी रागाने अशोकजींच्या पायावर पाय मारते, असा सीन होता. आधी सांगितल्याप्रमाणे नवखी असल्यामुळे किती जोरात पाय मारायचा हे समजलेच नाही. मी पायात उंच टाचांच्या चपला असताना त्यांच्या पायावर जोरात पाय मारला आणि तो बिचारा कासाविस झाला… पुढचे दोन दिवस सुजलेल्या पायानिशी तो गाणे पूर्ण करत होता.

अनावधनाने झालेल्या चुकीबद्दल मी क्षणाक्षणाला त्यांची माफी मागत होते, पण त्यांनी एकदाही मला काही जाणवू दिले नाही. उलट ‘असे होते’ म्हणत समजूत घालत राहिले आणि आता दुसरा पाय नको तोडूस… असे म्हणत वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला. आपला सीन नसतानाही दुसऱ्या एखाद्या सीनसाठी सल्ला देण्यासही अशोकजींनी कधीच काही हातचे राखून ठेवलेले आठवत नाही. कधी कधी आपल्याला एखाद्या भूमिकेचे सगळे पापुद्रे समजत नाहीत. अशा वेळी अशोकसारखा कलाकार ठरावीक पदर उलगडून दाखवतो व काम अधिक उजवे होण्यास मदत होते. अशोकजींसारख्या व्यक्तिमत्त्वाची ही करामत असते. त्यांचा उत्साह, आरोग्यजतन हे सगळेच शिकण्यासारखे आहे, घेण्यासारखे आहे. अशा या मोठ्या कलाकारासाठी महाराष्ट्रभूषण पुरस्कार अनुरूप आहे, याबाबत शंका नाही. (शब्दांकन : स्वाती पेशवे)

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

4 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

5 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

5 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

7 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

8 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

8 hours ago