Share

प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ

सकाळी उठल्यावर पातेल्यावरची ताटली बाजूला केली आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहू लागला. सासूने विचारले,
“सकाळी सकाळी इतकी मस्त
हसते आहेस आणि स्वतःशीच! स्वप्न आठवले वाटतं…”
मी उत्तरले,“बघा की इडलीचं पीठ कसे छान फुलून आलंय.”
आणि माझ्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद त्यांच्याही चेहऱ्यावर परावर्तित झाला. त्यांचाही चेहरा सकाळी सकाळी त्या फुललेल्या इडलीसारखाच फुलून आला.

माझ्या घरातला हा छोटासा प्रसंग. असे प्रसंग घरोघरी घडत असतात. लहान-सहान गोष्टींत किती मोठा आनंद सामावलेला आहे पाहा. जेव्हा भिजवलेल्या कडधान्याला छोटेसे मोड येतात. केक आणि ढोकळा शिजल्यावर तो पुरेसा स्पाँजी बनतो. म्हणजे त्याचा मऊपणा आणि ओलेपणा दोन्ही टिकून राहतो. कढी शिजवताना थोडेसे दुर्लक्ष झाले, तर ती फुटते. पण जेव्हा ती पूर्णपणे शिजल्यावर एकसंध राहते. तेव्हा आनंदाची बाग आतून फुलून येते. अशा कितीतरी छोट्या-छोट्या गोष्टींनी बाई आनंदाने फुलून येते. तिचा फुललेला चेहरा पाहून घरातल्यांनी भले आनंद व्यक्त करू नये.

पण तिने स्वतःच्या हाताने आणि मेहनतीने केलेला तो पदार्थ खाल्ल्यावर तो ‘चांगला झालाय’ हे सांगितले, तर तिच्या चेहऱ्यावरचा तो फुललेला आनंद आपण दिवसभर नक्कीच टिकवून ठेवू शकतो, असे मला वाटते. दिवसभरात काही ना काहीतरी हसण्यासारखे घडतेच. तेवढा वेळ मनसोक्त हसून घ्यावे. कुठेतरी वाचले आहे की, हसण्यामुळे सेरोटोनिन संप्रेरक बाहेर पडते आणि यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. यामुळे संसर्गाशी सुद्धा लढण्यास मदत होते. सेरोटोनिन संप्रेरक फक्त हसतानाच बाहेर पडते. त्यामुळे साहजिकच हसणं खूप महत्त्वाचं आहे. हसण्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

आमच्या योगक्लासमध्ये आम्ही एक दिवस हास्ययोगासाठी ठेवला आहे. एक दिवस शर्माकाका आम्हाला येऊन हास्ययोग शिकवतात. या हास्ययोग प्रकारांची नावेच अशी आहेत की, ती घेतल्यावरच आम्ही हसायला सुरुवात करतो. ‘एक मीटर हास्य’, ‘फुगा हास्य’, ‘मोबाइल हास्य’, ‘पतंग हास्य’, ‘सहमुद्रा हास्य’, ‘कारंजी हास्य’, ‘मंथन हास्य’, ‘बुलबुल हास्य’, ‘टाळी हास्य’, ‘गोफण हास्य’, असे विविध हास्य प्रकार घेतले जातात. असे एकूण १०० ते १५० हास्य प्रकार आहेत. त्यापैकी साधारण पाच-सहा हास्याचे प्रकार आम्ही दहा मिनिटांत करतो. या हास्ययोगाची नावे वाचून हसलात की नाही, खरं खरं सांगा बरं.

मी तर म्हणते हसा… काही कारण असेल, तर हसा किंवा कारणाशिवायही हसा. हसण्यासारखा सर्वांगसुंदर प्रकार नाही. आपण हसलो की समोरचा हसतोच! आपण विचार करतो की तो हसला, तर हसूया पण आपण हसलो, तर काय बिघडलं? आपण हसल्याक्षणी तो हसतोच ना! हसल्यामुळे चेहऱ्यावरच्या स्नायूंमध्ये रक्त प्रवाह वाढून चेहरा तजेलदार होतो. गंमत म्हणून सांगते. एखाद्या व्यक्तीचे नाकी-डोळी नीटस असतात; परंतु तो माणूस सुंदर दिसत नाही.

पण एखाद्या व्यक्तीला कदाचित रेखीव अवयव मिळाले नसतील तरीही ती व्यक्ती खूप सुंदर दिसते. फक्त अशी व्यक्ती आठवून बघा. मग विचार करा जर एखादा व्यक्ती हसतमुख असेल, तर आपल्याला निश्चितपणे आवडतो मग आपण स्वतः हसतमुख का राहू नये? नक्कीच आपण कोणाला तरी आवडून जाऊ. टीव्हीवर एक व्याख्यान पाहत होते. कोणीतरी मोटिवेशनल स्पीकर होता आणि तो स्त्रियांना व्याख्यान देत होता. त्यांनी सांगितले की, “तुम्ही हसा, मनमोकळे हसा अगदी किडके दात दिसले तरी हसा.” हे ऐकून मी खूप खळखळून हसले. लाटा जशा एकामागून एक येत राहतात, त्याप्रमाणे हास्याच्या लाटासुद्धा दिवसभरात एकामागून एक येत राहिल्या पाहिजेत. शेवटी इतकेच सांगायचे आहे की, दुसऱ्यांवर हसू नका, दुसऱ्यांच्या दुःखावर हसू नका. स्वतःवर हसा, स्वतःशी हसा आणि शक्य असेल तर स्वतः हसताना इतरांना आपल्या हास्यात समाविष्ट करून घ्या!
pratibha.saraph@gmail.com

Recent Posts

काश्मीर खोऱ्यात लपले आहेत ५६ विदेशी अतिरेकी, सूत्रांची माहिती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…

28 minutes ago

OTT: या आठवड्यात फक्त ओटीटीवर अ‍ॅक्शन दिसणार, हे १२ चित्रपट प्रदर्शित होतील..

नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अ‍ॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…

33 minutes ago

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…

2 hours ago

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप..

मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…

3 hours ago

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

4 hours ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

5 hours ago