Sunday, April 20, 2025
Homeसाप्ताहिककोलाजमासिक पाळीचा अनुभव सुखद करणारी ‘अवनी’

मासिक पाळीचा अनुभव सुखद करणारी ‘अवनी’

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

गेल्या वर्षी घडलेल्या एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. एका मुलीच्या कपड्यावरील रक्ताचे डाग पाहून तिचा भाऊ संतापला. त्याला वाटले की, आपल्या बहिणीचे कोणासोबत तरी संबंध आहे. रागाच्या भरात त्याने आपल्या बहिणीचा खून केला. नंतर कळलं की, ते रक्ताचे डाग मासिक पाळीच्या रक्ताचे होते. मासिक पाळीविषयी समाजात असणाऱ्या अगाध ज्ञानाचे हे जिवंत उदाहरण आहे. सुदैवाने महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान घेतल्या जाणाऱ्या काळजी व निगा याविषयी जनजागृती होत आहे. २०१५-१६ मध्ये राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षण झाले. या सर्व्हेक्षणात आढळून आले की, भारतात १५ ते २४ वयोगटातील ५८ टक्के महिला या मासिक पाळीविषयी सजग आहेत. २०१९-२१ मध्ये केलेल्या सर्व्हेक्षणात हेच प्रमाण ९० टक्क्यांवर गेले. मात्र तरीसुद्धा या क्षेत्रात काम होणे गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन एका तरुणीने मासिक पाळीदरम्यान काळजी घेणाऱ्या उत्पादनांची निर्मिती करणारी कंपनी सुरू केली. ही तरुणी म्हणजे ‘अवनी’ या महिलांच्या वेलनेस ब्रँडची संस्थापिका सुजाता पवार.

महिलांच्या आरोग्यावर काम करण्याची प्रेरणा सुजाताला तिच्या किशोरवयात मिळाली. त्या काळात मिळणारी मासिक पाळीची उत्पादने तिला अनुरूप नव्हती. अनेक वेळा या उत्पादनांचा लाभ होण्याऐवजी तिला त्रासच व्हायचा. सुजाता म्हणते, “माझी मासिक पाळी येत असतानाचा माझा अनुभव आणि समस्या मला आठवल्या आणि ठरवले की मला आलेला मासिक पाळीचा त्रासदायक अनुभव इतर स्त्रियांसाठी चांगला आनंदमयी करायचा आहे.” या निकडीमधून आज ‘अवनी’ हा एक स्वदेशी ब्रँड निर्माण झाला आहे. हा ब्रँड किफायतशीर आणि पर्यावरणास अनुकूल असे मासिक पाळीची
उत्पादने तयार करतो.

यामध्ये सॅनिटरी पॅड, इंटिमेट वाइप्स, मासिक पाळीचे कप, पुन्हा वापरता येण्याजोगे कपड्याचे पॅड्स, डाग स्वच्छ करणारी पावडर अशा उत्पादनांचा समावेश आहे. ही उत्पादने आरोग्य तज्ज्ञ, डॉक्टर्स यांच्या देखरेखीखाली विकसित केली जातात. त्यानंतर अवनीच्या विश्वसनीय अशा महिलांची प्रशिक्षित टीम ही उत्पादनांची निर्मिती करते. प्रत्येक उत्पादनाची प्रयोगशाळेत तपासणी होते. उत्पादनाचा दर्जा तपासला जातो. त्यानंतर ही उत्पादने आधुनिक अशा ठिकाणी साठवण्यात येतात. शेवटी ग्राहकांच्या मागणीनुसार ही उत्पादने पोहोचवली जातात. या सर्व प्रवासात उत्पादनाच्या दर्जाची आणि स्वच्छतेची काटेकोरपणे काळजी घेतली जाते. अवनीने कित्येक महिलांना रोजगार दिला आहे.

सुजाता पवारची अवनी ‘प्रोजेक्ट दाग’ (Destroying Accessibility and Acceptance Gap) नावाचा एक आऊटरीच प्रोग्राम देखील चालवते, ज्यात दरवर्षी महिलांचे प्राबल्य असणाऱ्या क्षेत्रात मासिक पाळी दरम्यान महिलांना येणाऱ्या आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. अवनी सुरू करण्यापूर्वी सुजाताने आरोग्यसेवा क्षेत्रात सात ते आठ वर्षे काम केले. मर्क सेरोनो, सनोफी आणि एमएसडी इंडिया यासारख्या औषध कंपन्यांमध्ये काम केले. एनएमआयएमएस, मुंबई येथून एमबीए तर मुंबई विद्यापीठाशी संलग्न डॉ. एलएच हिरानंदानी कॉलेज ऑफ फार्मसीमधून बीफार्मा ही पदवी मिळवली. ‘अवनी’ या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये धरणी माता असा आहे. “धरणी माता स्त्रीत्वाचे प्रतीक आहे आणि आपण मासिक पाळीला स्त्रीत्वाचा अविभाज्य भाग म्हणून प्रतिष्ठा दिली पाहिजे, हा अनुभव सुखद करण्यासाठी अवनी कार्यरत आहे”, असे सुजाता म्हणते.

सुजाताच्या या व्यवसायात तिचा पती अपूर्व अग्रवाल हा व्यावसायिक भागीदार म्हणून देखील साथ देत आहे. सुजाता प्रमाणे अपूर्वचीसुद्धा आरोग्य क्षेत्राची पार्श्वभूमी आहे. या दोघांच्या कल्पकतेमुळे आणि मेहनतीमुळेच अवनीची घोडदौड सुरू आहे. सुजाता इतर महिलांना उद्योग क्षेत्रात उतरण्याचा सल्ला देते. “स्त्रिया अनेक आव्हानांवर मात करण्यास सक्षम आहेत. त्या उत्तम उद्योजिका घडू शकतात. उद्योजकता आपल्याला जमणार नाही हा न्यूनगंड त्यांनी काढून टाकला पाहिजे. आजकाल महिला उद्योजकांना समाजात पूर्वीपेक्षा खूप जास्त पाठिंबा मिळत आहे”, असं आवर्जून सुजाता सांगते. अवनीच्या माध्यमातून सुजाता पवारने कित्येक महिलांना रोजगार दिला आहे. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मासिक पाळीचा तो क्षण सुखद केला आहे. मासिक पाळी एक नकोसा अनुभव न वाटता तो सुखद वाटावा, ही अवनीच्या निर्मितीमागची भावना यशस्वी झाली आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -