हवेचे प्रदूषण

  174

कथा: प्रा. देवबा पाटील


आपल्या पृथ्वीचे वातावरण’ प्रकरण शिकवणाऱ्या देशमुख सरांच्या सुस्वभावामुळे सर्वच विद्यार्थी सरांना सुयोग्य मान तर द्यायचे, पण मोकळेपणाने आपल्या अडचणी विचारायचे. “हवेचे प्रदूषण होते म्हणजे नक्की काय होते सर?” नरेंद्राने माहिती विचारली. “हवेत काही उपयोगी तर काही घातकी असे वायुघटक आहेत. त्यातही उपयोगी वायूंचे प्रमाण अतिशय जास्त आहे व घातकी वायूंचे प्रमाण खूपच कमी म्हणजे अत्यल्प आहे. या सर्व वायूंचे हवेत योग्य प्रमाणात संतुलन राहिल्यास सजीवांचे जीवन निरोगी राहते; परंतु काही कारणास्तव जर ते संतुलन बिघडले म्हणजे वातावरणाचा समतोल बिघडतो. त्यालाच हवेचे किंवा वातावरणाचे प्रदूषण झाले असे म्हणतात.” सरांनी सांगितले.


“ते प्रदूषण कशा कशामुळे होते सर?” वृंदाने प्रश्न केला. सर सांगू लागले, “हवेचे प्रदूषण हा फार मोठा प्रश्न संपूर्ण जगालाच भेडसावत आहे. हवेत धुराचे प्रमाण वाढले तर धुरातील जास्त प्रमाणात असलेल्या विषारी वायूंमुळे हवेतील वायूंच्या प्रमाणाचा समतोल बिघडतो. शहरात, मोटारी, कार, मोटर सायकल, रिक्षा, स्कूटर, एसटी बसेस, ट्रक वगैरे वाहनांची संख्या खूप वाढत चालली आहे. या वाहनांमधून कार्बन मोनोऑक्साईड हा विषारी वायू बाहेर टाकला जातो. फटाक्यांमधून तर खूपच प्रचंड प्रमाणात सल्फर डायऑक्साइड वायू बाहेर पडतो की, जो आरोग्यास खूप अपायकारक असतो.


जळणाऱ्या लाकडांतून बाहेर पडणाऱ्या धुरातही हे विषारी वायू असतात. ते आरोग्याला अतिशय घातक असतात. तसेच वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या विषारी रासायनिक वायूंमुळेही हवा खूप दूषित होत आहे. धुम्रपानामुळे तंबाखूचे ज्वलन होते व त्यातून निघणाऱ्या धुरातसुद्धा कार्बन मोनोक्साइड व इतर घातकी वायू असतात. त्यांचा आरोग्यावर खूपच हानिकारक परिणाम होत असतो. उघड्यावर घाण साचून ती कुजल्यामुळे त्यातून मिथेन व कार्बन मोनोऑक्साईड यासारखे वायू वातावरणात पसरतात. त्यामुळे हवेत विषारी वायूंचे प्रमाण जास्त वाढते. तसेच हरितगृहातील विषारी वायूंमुळेही हवेचे प्रदूषण खूपच वाढते. शेतात पिकांवर फवारण्यात येणारी कीटकनाशके तसेच इतरही अनेक प्रदूषके हीसुद्धा हवेच्या प्रदूषणास कारणीभूत होतात. दुर्दैवाने हवेच्या प्रदूषणाबाबत भारत हा जगातील सहाव्या क्रमांकाचा देश आहे.”


“हवेच्या या प्रदूषणाचे काय दुष्परिणाम होतात सर?” कुंदाने विचारले. “फारच महत्त्वाचा प्रश्न विचारलास बेटा तू.” सर म्हणाले, “वाहनांमधून धुरासोबत बाहेर पडणारा कार्बन मोनोऑक्सॉईड हा वायू आरोग्यास खूप घातक आहे. हवेच्या या प्रदूषणाने अनेक आजार वाढले आहेत व त्यांनी मानवी जीवन खूपच बेजार झाले आहे. श्वसनाचे आजार तर वाढले आहेतच; परंतु फुप्फुसांचे आजार, अस्थमा, दमा असे गंभीर विकारही वाढले आहेत. म्हणूनच आपण साऱ्यांनी हवेचे प्रदूषण टाळून हवा शुद्ध राखण्यासाठी झटले पाहिजे.” “हवा शुद्ध राखण्यासाठी झाडे लावायला पाहिजेत ना सर?” मंदाने प्रश्न केला.


“पण ती झाडे हवा शुद्ध कशी करतात सर?” त्वरित सुनंदाने विचारले. सर सांगू लागले, “निसर्गाने संपूर्ण सृष्टीचा समतोल राखला आहे. आपण श्वासावाटे हवा आत घेतो त्यावेळी हवेतील ऑक्सिजन वायू आत घेतो व उच्छवासाद्वारे शरीरातील कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. वनस्पतींची वाढ होण्यासाठी कार्बन डाय ऑक्साईडची गरज असते. निसर्गात वनस्पती या आपल्या अन्न बनविण्याच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेत हवेतील विषारी कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात व सूर्यप्रकाशात त्याचे विघटन करून प्राणवायू बाहेर सोडतात. अशा रीतीने हवेतील घातकी वायूचे प्रमाण कमी होऊन प्राणवायूचे प्रमाण विनासायास वाढते नि हवा आपोआप शुद्ध होते. या प्राणवायूशिवाय मानव व प्राणी जगूच शकत नाही. म्हणूनच तर आजच्या काळात हवेचे प्रदूषण टाळून हवा शुद्ध राखण्यासाठी वृक्षारोपण करणे, झाडांचे रक्षण व संवर्धन करणे अत्यंत फायद्याचे व अत्यावश्यक आहे.” तास संपला व त्यांनी आपली हजेरी, खडू व डस्टर उचलले आणि “मुलांनो, आजही आपला तास संपला. आपले प्रकरण अपुरेच राहिले. ठीक आहे आता राहिलेले प्रकरण आपण उद्या बघू.” असे म्हणून ते वर्गाच्या दरवाजाकडे चालू लागले.

Comments
Add Comment

रांगोळीचे किमयागार

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर गुणवंत मांजरेकर म्हणजे रांगोळीचे विद्यापीठ! अस्सल स्पष्टवक्ता मालवणी माणूस...! वरून कडक

बोल, बोल, बोल, जागेवाले की जय...

साक्षी माने  येत्या १६ ऑगस्टला देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होईल, तेव्हा शहरातील सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याचा

भांडण - बालपणाचे विरजण!

ओंजळ : पल्लवी अष्टेकर घर हे माणसाचे पहिले शिक्षणस्थान असते. घरात मिळालेला स्नेह, विश्वास, संवाद आणि प्रेमाची भाषा

गौरवशाली भारतीय शिल्पकला

विशेष : लता गुठे बदलत्या काळाबरोबर समाज बदलत असतो. त्याबरोबरच संस्कृती बदलते आणि संस्कृती बदलल्यामुळे समाजातील

“दिल मिले या न मिले...”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ताराचंद बडजात्यांचा १९६४ साली आलेला सिनेमा होता ‘दोस्ती’. त्या वर्षीच्या

सृष्टी निर्माता

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यापूर्वी हे सर्व विश्व पाण्यात बुडालेले