नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे
कविवर्य सुरेश भट हा मराठी कवितेच्या अवकाशात सतत चमचमणारा तारा! जेव्हा माणसाला निराशा घेरू लागते, मनाचे आकाश अंधारून येते, तेव्हा सुरेश भटांच्या कवितेचे तेज अधिकच जाणवू लागते, मनाला ऊब देते. हा माणूस कवींमधील एक अवलियाच होता. अत्यंत सकस कवितांचे किमान ९ संग्रह नावावर असलेल्या सुरेश भटांचे नाव प्रामुख्याने गझलांशी जोडले गेले असले तरी त्यांचे वेगळेपण आहे ते त्यांच्या कलंदर, बंडखोर आणि निर्भय स्वभावात! मूळ पिंडच बंडखोर असूनही त्यांच्या अनेक कविता टोकाच्या रोमँटिक, हळुवार आणि शृंगारिकही आहेत.
एल्गारसारखा कवितासंग्रह लिहिणारा हा माणूस “मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग”सारखे नितांत रोमँटिक सिनेगीत लिहितो, ते ज्या सिनेमात आहे त्याच ‘सिंहासन’मध्ये त्यांचे “अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली”सारखे क्रांतीगीतही असते! पुन्हा ‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे’सारखी शृंगारिक कविताही ते लीलया लिहितात. या भाषाप्रभूचे वेगळेपण हे की, ‘चेतवून अंग अंग’ या शब्दातून सूचित होणारा शृंगार युवामनाला भावला तरी तो अश्लीलतेकडे झुकल्यासारखा वाटत नाही. इतके उत्कट, तरल, शृंगारिक प्रेमकाव्य लिहू शकणारा हा माणूस केवळ मनस्वी होता असे नाही, तर खूप चिंतनशील होता. त्यांच्या मनात सतत चिंतनही सुरूच असायचे.
एका कवितेत ते म्हणतात –
‘जगत मी आलो असा की,
मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की,
मग पुन्हा जुळलोच नाही!’
आपल्या आयुष्याची परवड आपणच आपल्या स्वभावामुळे करून घेतली अशी प्रांजळ कबुलीही यातून सूचित होते. वरून बंडाची भाषा करणारा हा कवी अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षणही करतो.
त्यांच्या मनस्वी कविता पाहून कुणालाही वाटेल या कवीने जीवनाचा बेधुंद आनंद घेतला असावा. पण अशी अतिसंवेदनशील आणि बुद्धिमान मने आतून उलट खूप एकटी असतात, दु:खी असतात. याच कवितेत त्यांची ही व्यथा व्यक्त झाली आहे –
“सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!”
या कलंदर कवीने रसिकांसाठी अनेक सुंदर गझला सादर केल्या, सिनेगीते लिहिली. पण त्यांचे स्वत:चे ‘अंतरीचे गुज’ त्यांना कधी व्यक्त करता आले नाही अशी काहीही धक्कादायक कबुलीही त्यांनी एका ठिकाणी दिली आहे –
‘वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत
सुचत गेली रोज गीते, मी मला सुचलोच नाही!’
आपल्याला जे सांगायचे होते ते लोकांना समजले नाही, तर दु:ख होतेच. पण जे सांगायची मनोमन इच्छा होती ते आपणच सांगू शकलो नाही हे दु:ख केवढे तरी जास्त वेदनादायी असते! आयुष्याशी कधीच जुळवून न घेऊ शकलेल्या या बंडखोर कवीला हे सत्य उमगले होते. मात्र त्याने ते खूप खिलाडूपणे स्वीकारले. ते स्पष्ट करणाऱ्या त्यांच्या दोन ओळी कुणाही संवेदनशील वाचकाला
अस्वस्थ करतात –
‘सूर मागू तुला मी कसा?
जीवना तू तसा, मी असा!’
शेवट जवळ आला की कवीचे संवेदनशील मन अस्वस्थ होते! जीवनाचा उत्कट, तरल, रसरशीत अनुभव आता घेता येणार नाही. तो देऊ शकणारे तारुण्य केव्हाच निघून गेले आहे. त्यामुळे येणारी रितेपणाची भावना सुरेशजींनी जितक्या चित्रमय शब्दांत व्यक्त केली तशी क्वचितच कुणी केली असेल –
‘देखावे बघण्याचे वय निघून गेले…
रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले…’
आता रंग, रूप, सूर, गंध यांनी मोहून टाकणाऱ्या जगाचे सौंदर्य पाहण्यात रुची राहिली नाही ही जाणीव कवीला अंतर्मुख करते आणि खिन्नही! आता या नयनरम्य जगात मन रमत नाही आणि कुणाची रंगतदार साथ मागावी, असेही वाटत नाही. गेला तो सहजीवनाच्या सोहळ्याचा काळ!
‘गेले ते उडून रंग,
उरले हे फिकट संग,
हात पुढे करण्याचे वय निघून गेले…’
जेव्हा जीवनाचा आनंद घेण्याची उत्कट इच्छा होती, तेव्हा मनात स्वत:ची एक प्रतिमा होती. ती जगाला सिद्ध करून दाखवायची जिद्द होती! आता मात्र सगळे व्यर्थ वाटते. जगणे हे केवळ ‘जिवंत राहणे’ झाले आहे. शेक्सपियरने म्हटले तसे जगाच्या रंगमंचावरील जीवनाच्या नाट्यात एखादी भूमिका घेणे, त्या भूमिकेत रमणे, संपले आहे, ही खंत कवीच्या संवेदनशील मनाला सतावते –
‘कळते पाहून हेच,
हे नुसते चेहरेच,
चेहऱ्यांत जगण्याचे वय निघून गेले…’
तरुणपणी आशा-आकांक्षा असतात, प्रेम, आकर्षण, सहवासाचा आनंद, शृंगारातली धुंदी सगळे भावविश्व घेरून टाकते, आता मात्र कशानेच आनंद लाभत नाही. कशाबद्दल उत्सुकता वाटत नाही, कसली आस शिल्लक नाही. सगळ्या रामरगाड्यातून माघार हाच स्वभावधर्म बनला आहे.
तारुण्यात नव्याचा शोध होता, चित्तवृत्ती उल्हासित करणारा प्रवास होता, रोज नवा परिचय होता. आता कसलीच उत्सुकता शिल्लक नाही –
‘रोज नवे एक नाव,
रोज नवे एक गाव,
नावगाव पुसण्याचे वय निघून गेले…’
यापुढे आयुष्यात नवे काही घडणार नाही. घडावे अशी इच्छाही नाही. थकलेल्या श्रांत मनात केवळ आठवणीचे मेघ दाटून येत राहतात. जुन्या, घडून गेलेल्या घटनांच्या स्मृतींचे मेघ दिवसभर रिमझिमत राहतात. जीवनाच्या वेगवान प्रवाहात शिरायचे, चिंब भिजायचे धाडस पुन्हा होणे नाही. जगण्याच्या रसरशीत अनुभवापासून दूरच राहावे, असे वाटते-
‘रिमझिमतो रातंदिन,
स्मरणांचा अमृतघन,
पावसात भिजण्याचे वय निघून गेले…’
वयानुसार शरीर थकले तरी मन तरुण आहे. तरी पूर्वी कुणाची ओढ लागल्यावर ते जसे झुरायचे, मिलनाच्या नुसत्या कल्पनेनेही झंकारायचे, तसे आता होत नाही.
‘हृदयाचे तारुणपण,
ओसरले नाही पण,
झंकारत झुरण्याचे वय निघून गेले…’
आजूबाजूला जीवनाचा उत्सव सुरू आहे. आपण त्यात सहभागी होऊ शकत नाही याची रुखरुख कविमनाला अस्वस्थ करते आहे –
‘एकटाच मज बघून,
चांदरात ये अजून,
चांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले…’
आता तर आयुष्याचा शेवट जवळ आला आहे. यापुढे आनंदाचा एक क्षणही टिपता येणार नाही, भावणार नाही! मग कवी आर्तपणे विचारतो, ‘माझ्या अवतीभोवती सृजनशीलतेचा हा सोहळा का सुरू आहे?’
‘आला जर जवळ अंत,
का हा आला वसंत,
हाय! फुले टिपण्याचे वय निघून गेले…’
भटांची कविता एकसुरी नाही. ते आपल्या शेवटाबद्दलही दुसऱ्या एका कवितेत किती आशादायी, आत्मविश्वासपूर्ण भाष्य करतात ते पाहिले की कळते सुरेश भट हे रसायनच
वेगळे होते –
“विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही,
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही…”