दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम
साधारण २५ ते ३० वर्षांपूर्वी केलेले लेखन प्रसिद्ध करण्यास मर्यादा होत्या. पुस्तके काढणे अनेकांना अशक्य असे आणि पुस्तक प्रत्येकाचेच निघत नसे. पुस्तक लेखनामध्ये आणि ते प्रसिद्ध करण्यामध्ये दर्जासुद्धा कायम राखला जात असे. हीच गोष्ट वृत्तपत्र लेखनामध्येसुद्धा असे. बातमी लेखनापासून ते लेख लेखनापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये दर्जा सांभाळला जात असे. त्याचे संपादन केले जात असे. त्यामुळे वाचकांसाठी मोजकेच आणि योग्य मर्यादित स्वरूपाचे लेखन समोर येत असे.
मात्र ही स्थिती गेल्या २५ वर्षांत खूपच बदलली आहे. कारण आता सोशल मीडिया अधिक सक्रिय झाला आहे. त्यामुळे कोणीही लेखक होऊ लागलाय, कोणीही बातमीदार होऊ लागलाय आणि या सगळ्याचा परिणाम साहित्य आणि वृत्तपत्र क्षेत्रांमध्ये अधिक होताना दिसून येतोय. कुणाचीही कविता आपल्या नावाने खपवून, कुठल्याही कवितेची तोडमोड करणं, कुणाचेही लेख, साहित्य आपल्या नावावर वापरणं, कुठल्याही प्रकारची मतं व्यक्त करणे, अभ्यास न करता बोलणं अशा अनेक गोष्टी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसू लागल्या आहेत. प्रत्येकालाच व्यक्त व्हायचं असतं. पण प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा आणि चौकटी समाजानेच घालून दिलेल्या आहेत. म्हणूनच समाजात कवी, लेखक, पत्रकार, विचारवंत यांना आतापर्यंत एक मानाचं स्थान होतं. त्यांनी मांडलेले विचार हे समाजमान्य विचार आहेत, असंच म्हटलं जायचं.
मात्र ही व्याख्या हळूहळू पुसट होतेय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यात हाती आलेले सोशल मीडियाचं हे शस्त्र दुधारी आहे. यातून अनेक चांगल्या गोष्टी होतात. मात्र त्याच वेळेला सर्वाधिक वाईट गोष्टी झालेल्यासुद्धा या सोशल मीडियामुळे पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर आलेले व्हीडिओ, मेसेजेस, त्यातून ठेवण्यात आलेले स्टेटस या सगळ्याच प्रकारातून समाज ढवळून निघाला. यापूर्वी आपल्या मनात येणारे योग्य, अयोग्य विचार यांना वळण लावण्यासाठी आपल्यासमोर विचारवंतांनी, लेखकाने मांडलेले मार्गदर्शक विचार पुस्तकातून, लेखातून उपलब्ध असायचे. त्यातूनच घरातले ज्येष्ठ मंडळी, आपले शिक्षक, प्रोफेसर यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आपण योग्य दिशेने विचार करतो आहोत की नाही, आपली मत योग्य दिशेने आपण व्यक्त करत आहोत की नाही याबाबत तरुण पिढीला समज मिळत असे. मात्र सोशल मीडियामध्ये हा मार्गच आता उपलब्ध नाही असं वाटतं.
‘फॉरवर्डिंग’ ही एक अत्यंत गंभीर प्रक्रिया सोशल मीडियाच्या या जगामध्ये पाहायला मिळते. आपल्या मोबाइलवर असलेल्या कुठल्याही सोशल मीडिया ॲपवर आलेला कुठलाही मेसेज, कुठलाही व्हीडिओ विचार न करता फॉरवर्ड केला जात आहे. वास्तविक आपण जे वाचतो, आपण जे पाहतो किंवा आपण जे ऐकतो आहोत ते दुसऱ्याला पाठवण्याआधी योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे; परंतु हा सोशल मीडिया अगदी बालवाडीत जाणाऱ्या मुलापासून वयोवृद्धांपर्यंत, अशिक्षितांपासून सुशिक्षितांपर्यंत, प्रौढांपासून आक्रमक विचारांच्या तरुणांपर्यंत सगळ्यांच्याच हातात आहे. त्यातही वयोगट, स्त्री-पुरुष अशा कोणत्याही गटांसाठी चाळण करून हे मेसेज फॉरवर्ड केले जात नाहीत.
अनेक मेसेज ॲपमध्ये वेगवेगळ्या विचारांची, वेगवेगळ्या मतांची, वेगवेगळ्या जातींचे धर्मांची माणसं ‘ग्रुप’ या नावाने एकत्र आलेली असतात. तेथे असे ‘फॉरवर्डेड मेसेज’ खूपच गोंधळ घालतात. अनेकदा त्या ग्रुपवर एखादा अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी, तरुण-तरुणी, स्त्री-पुरुष, वृद्ध मंडळी अशा प्रत्येक वयोगटातील ‘मेंबर’ असतो. त्याच्या हातातील मोबाइलवर ग्रुपमध्ये आलेला मेसेज प्रत्येकजण वाचतो आणि आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ काढून व्यक्त होत राहतो. अनेक मेसेज ॲपमध्ये त्यातही लोकप्रिय मेसेज ॲपमध्ये अशा ग्रुपमधून वादविवाद, भांडणं, अगदी गुन्हेगारीपर्यंतच्या अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत.
गेल्या १० ते १५ वर्षांत सोशल मीडिया अधिक सक्रिय झाला आहे. इतका की नावाजलेले लेखक, कवींपासून वृत्तपत्र, टीव्ही चॅनल्स, टीव्ही न्यूज चॅनल्स यांनीसुद्धा सोशल मीडियाला आपल्यासोबत घेतलं आहे. मात्र जसं वृत्तपत्र, एखादं पुस्तक, एखादं मासिक, वृत्तवाहिन्या यांच्यावर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख याच्या सत्यतेची जबाबदारी त्यांचे त्यांचे संपादक, लेखक घेत असतात, अशी कोणतीही जबाबदारी या ‘फॉरवर्डेड मेसेज’मध्ये कोणाचीच नसल्यामुळे या मेसेजेसची सत्यता कोणीच पडताळून पाहत नाही.
वास्तविक आपल्या मोबाइलवर येणारे प्रत्येक मेसेज खरे असतीलच असं नाही. त्याची सत्यता पडताळून घेण्याची जबाबदारी ज्याचा मोबाइल आणि ज्याने तो मेसेज वाचला त्याची आहे; परंतु आजकाल अशा जबाबदारीने वाचणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात दुर्मीळ झाली आहे. त्यामुळेच चुकीचे मेसेज फॉरवर्ड होऊन समाजमन दूषित होऊ लागलं आहे. अशा दूषित, गोंधळलेल्या समाज मनामुळे समाजातील एकी, मैत्री, नातेसंबंध या सगळ्यावरच मोठ्या प्रमाणावर परिणामसुद्धा होताना दिसत आहेत. यापूर्वी या समाजात अनेक जाती धर्माचे लोक आनंदाने राहत असत; परंतु सोशल मीडियाचा वापर अनेक विघातक संघटना, माणसं समाजात दुही पसरवण्यासाठी करताना दिसत आहेत. त्यासाठी फॉर्वर्डेड मेसेज फार महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतं आहे. अशा वेळी चुकीच्या गोष्टी पसरू नये यासाठी नेहमीप्रमाणे कुठल्याही सरकारला जबाबदार धरण्यापेक्षा आपण जे करतो आहोत, आपण जे बोलतो आहोत, आपण जे व्यक्त होत आहोत ते योग्य आहे का? हे तपासून बघण्याची जबाबदारी खरं तर प्रत्येकाचीच आहे.
अनेक वर्षांपूर्वी साक्षरता आणि सुशिक्षितपणा या गोष्टी खूपच दुरापास्त होत्या. समाजातील ठरावीक वर्गच उच्चशिक्षित होता. तरीही तेव्हा समाजात शांतता होती. मात्र आता प्रत्येकालाच शिक्षण दिलं जातं. त्यातून सगळेच सुशिक्षित होतील, असं नाही. मात्र प्रत्येक जण आता साक्षर झाला आहे. अशा वेळेला किमान समाजातल्या खूप मोठ्या वर्गाकडून अशा फॉर्वर्डेड मेसेजेसबद्दल जबाबदारीने वागणं, व्यक्त होणं, त्यातही तरुण वर्गाकडून या फॉरवर्डेड मेसेजवर व्यक्त होणं, मत मांडणे, जबाबदारीने वागणं ही अपेक्षा आहे, तर तरुण मनाला भरकटू न देण्याची जबाबदारी त्याच्या शिक्षक आणि पालकांवर निश्चितच आहे.
गेल्या काही दिवसांपासून समाजात होणाऱ्या अनेक विचलित करणाऱ्या घटनांचे परिणाम हे अशाच फॉरवर्डेड मेसेजमुळे होताना दिसत आहेत. त्यामुळेच आता शिक्षण पद्धतीतसुद्धा प्रत्येक वयोगटामध्ये सोशल मीडियावर आधारित एक तरी धडा असावा आणि त्या दृष्टीने जनजागृती करावी, अशीही अपेक्षा आहे आणि त्यातून आपणही विचाराने फॉरवर्ड व्हायला हवे हेही तितकेच खरे!
[email protected]